*
⚪
पुष्प ={५५},
⚪
*
*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची....*
आजवर महाराजांनी डॉक्टरांच्या थोड्या का परिक्षा घेतल्या होत्या ?
डॉक्टरांना पहिला मुलगा झाला आणि लगेच गेला. दुसरा मुलगा झाला तोही सोयरातच गेला. पुत्रजन्माचा आनंद व्हावा न व्हावा तोच पुत्रशोक नशिबाला येत होता. मुलांची आई तर पार खचून गेलीच पण धीरगंभीर वृत्तीचे डॉक्टारही उदास झाले. सगळ्या घरावरच दु:खाची छाया पसरली.
महाराजांच्या कानावर ही वार्ता गेली तेव्हा ते नगरला आले. डॉक्टरांच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाले, "तुझा मुलगा गेला. आला आणि गेला. एवढंच ना ? चल. आपण एक सत्यनारायण करू."
डॉक्टर दिङमूढ होऊन महाराजांच्या तोंडाकडे पाहतच राहिले! त्यांना वाटलं, महाराज नशेत तर नाहीत ना ? की आपल्या ऐकण्यात काही चूक झाली ?
"अरे, बघतोस काय असा ? पूजेची तयारी कर."
डॉक्टर काही बोलले नाहीत. पण त्यांच्या वडिलांना, भाऊंना राहावलं नाही. ते पोटतिडकीनं म्हणाले, "भलतंच काय बोलता, महाराज ? अहो, माझ्या नागेशचा मुलगा गेलाय. पोटचं पोर मरणं ही काय आनंदाची गोष्ट आहे! या अरिष्टाचं निवारण कराल या आशेनं आम्ही तुमच्याकडे पाहत होतो, तर तुम्ही आम्हाला सत्यनारायण करायला सांगता ?"
"निवारण, निवारण करणंच तर चाललंय!" महाराज गंभीरपणानं म्हणाले.
"काय म्हणता आणि काय करता ते तुम्हीच जाणे!" असं म्हणत भाऊ रागानं तिथून निघूनच गेले.
डॉक्टर बोलले नाहीत तरी त्यांनासुद्धा हे रूचलं नव्हतं. ते उदासवाणे होऊन बसून राहिले होते. महाराज त्यांच्याजवळ जाऊन त्यांची समजूत घालीत, म्हणाले, "हे बघ डॉक्टर, भाऊला वाटतंय आम्ही तुझ्यासाठी काहीतरी करावं. पण तुला खरं सांगतो बेटा, अशक्य ते शक्य करण्याची शक्ती अंगी असली तरी असा माणूससुद्धा नियतीच्या व्यवस्थेत बाधा आणीत नाही. ढवळाढवळ करीत नाही. 'प्रारब्ध' हे ज्याचं त्यालाच भोगून संपवावं लागतं. आता तुम्ही म्हणाला की काही साधूसंत मेलेली माणसं उठवतात, त्याचं काय ? पण ते सुद्धा त्याच्याच पुढच्या जन्मातलं आयुष्य त्याला या जन्मी देतात. आपल्या पदरचं काही देत नाहीत."
'मग सदगुरुचा काय उपयोग ?' असा प्रश्न येतो तुमच्या मनात. होय ना ? भाऊला नाही कळायचं. पण तू डॉक्टर आहेस. तुला कळेल आमचं बोलणं. मला सांग. तुम्ही रोग्याचं मरण चुकवता का ? नाही. कृत्रिम श्वाससुद्धा त्याचे श्वास शिल्लक असेपर्यंतच चालतो. मग तुम्ही काय करता ? तर रोग्याला त्याच्या रोगाचा जोर कमी करणारी औषध देऊन तर केव्हा त्याला वेदनाशामक गोळ्या देऊन त्याचे क्लेश कमी करता.
आमचंही तसंच आहे डॉक्टर. आम्ही तुमच्यावर येणाऱ्या आपत्ती तुम्हाला सुसह्य व्हाव्यात म्हणून तुम्हाला आंतरिक बळ देतो. तुमच्या प्रारब्धभोगातले काही हिशेब इकडेतिकडे करतो, एवढंच!"
डॉक्टरांनी सत्यनारायण करायचं ठरवलं. सगळ्यांचा विरोध होता पण डॉक्टरांच्या लेखी गुरूआज्ञा म्हणजे वेदवाक्यच होतं. पत्नी तिच्या माहेरी होती हे त्यांच्या पथ्यावर पडलं होतं. महाराजांच्या मुखातून आलेला हा ईश्वरी आदेश आहे अशा श्रध्देनं डॉक्टरांनी सव्वा पायलीचा प्रसाद करवून घेतला. स्वतः महाराजांनी सत्यनारायणाची पूजा केली. आरती झाल्यावर महाराजांनी डॉक्टरांच्या हातावर प्रसादाची एक मूद ठेवून म्हटलं, "घे. खा. आता होणारा मुलगा जगेल तुझा."
भरल्या डोळ्यांनी डॉक्टरांनी प्रसाद तोंडात घातला. दु:खाच्या आवंढ्याबरोबर कसाबसा गिळला!
महाराजांची वाणी खरी ठरली. त्यानंतरची डॉक्टारांची मुलं जगली. आणि याच त्यांच्या मोठ्या मुलाची जन्मवेळ सांगायला तो लाहोरचा पीरभक्त वाट वाकडी करून डॉक्टरांच्या घरी आला होता.....क्रमशः ...
*लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी*
No comments:
Post a Comment