Monday, 14 January 2019

Tale 28

 *❗❗⚪पुष्प = {६४},⚪❗❗*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*


  एकदा महाराज बापूला म्हणाले, "चल बाप्या, माईकडे जायचंय."
  "हो. मग टांगा आणतो."
  "नको. तुझी सायकल काढ. आम्ही दांडीवर पुढे बसतो."
  माई म्हणजे संगीतसूर्य भास्करबुवा बखले यांच्या घराण्यातील प्रसिद्ध गायिका विदुषी यल्लूबाई माने. या कधी आपल्या मिरजेच्या वाड्यात राहात, तर कधी पुण्यात राहात. स्वभावानं सज्जन. धनदौलत असूनही गर्व नाही. गायिका म्हणून नावलौकिक मोठा असून ताठा नाही.
  माईंची आणि महाराजांची पहिली भेट झाली ती नृसिंहवाडीला. उपाध्ये जोशी यांचे घरी. खरं म्हणजे माई वाडीला गेल्या होत्या त्या आपल्या अस्वस्थ मनाला शांती मिळावी म्हणून. कारण अलीकडे त्यांचं मन कशातच लागत नव्हतं. नशिबानं घातलेला जीवघेणा घाव काही केल्या भरून येत नव्हता. त्यांनी पतिनिधनाचं दु:ख मुलाकडे पाहून धीरानं सोसलं होतं. पण आता तोच त्यांचा मुलगा त्यांचं 'मरण'च पोरकं करून गेला होता. त्याच्या हातून पाणी पिऊन डोळे मिटायचे तर त्यानंच आधी डोळे मिटले होते. आता माईंच्या आयुष्यात रसच उरला नव्हता. दुसरं कुणीही गेलं तरी असं असह्य दु:ख होत नाही बाईला, पण पुत्रशोकासारखी दुसरी यातना नाही. कारण पोटचं पोर हे बाईच्या तनामनाचाच एक अविभाज्य भाग असतो.
  श्रीमती यल्लूबाईंसारखी प्रसिद्ध गायिका गावात आल्याचं कळलं तेव्हा काही गानप्रेमी मंडळींनी त्यांची मैफिल ठेवायचं ठरवलं. मंडळींनी त्यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली तेव्हा त्या म्हणाल्या, "मी इथे आल्ये आहे ती देवाची सेवा करायला. काही उपासना करायला."
  "अहो, मग देवासमोर गाणं ही त्याची सेवाच आहे."
  "तरी पण माझं मन नाही लागत कशात - गाण्यातही. आपण मला क्षमा करा."
  "बाई, तुमची मन:स्थिती ठीक नाही म्हणूनच तुम्ही गा. संगीतासारखं दुसरं औषध नाही मनाच्या दुखण्यावर." उपाध्ये जोशी बाईंची समजूत घालीत म्हणाले, "वाटलं तर तुम्ही भजनं म्हणा. पण नाही म्हणू नका. मी तुम्हाला हा आग्रह का करतो आहे सांगू का ? आमच्या घरी एक महाराज येणार आहेत. अवधूत आहेत. अवलिया आहेत. फार मोठ्या ताकदीचे आहेत. त्यांना गाणं फार आवडतं. त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर पडली तर तुमची ही वाडीची यात्रा सफळ होईल. संसारातल्या            दु:खातूनच नव्हे, तर या        संसारदु:खातून - भवदु:खातून मुक्त व्हाल तुम्ही ! कुणाचा कसा योग असतो काय माहित ? दत्तप्रभूंनी यासाठीच तुम्हांला इथे आणलं असेल कदाचित !"
  यल्लूबाईंना त्यांचं म्हणणं पटलं, म्हणाल्या, "गाईन मी."
  महाराज आतल्या खोलीत बसले होते. उपाध्यांनी यल्लूबाईंना आत नेलं. महाराजांशी त्यांची ओळख करून दिली. त्यांना निरखीत महाराज म्हणाले, "संगीत ही साधना आहे. सतत चालू ठेव, माई."
  "माई !" 'माई' या हाकेनं यल्लूबाईंच्या काळजाला स्पर्श केला. त्यांचा बाबू त्यांना 'माई'च म्हणत असे. त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनीच महाराजांना नमस्कार केला आणि त्या बैठकीत आल्या.
  जरीच्या निळ्या काठापदराची सफेद रेशमी साडी त्यांनी परिधान केली होती.  डोक्यावर घेतलेल्या पदरातूनही त्यांचा कुरळ्या केसांचा मानेवर रूळणारा भरदार अंबाडा दिसत होता. कानांत मोत्यांच्या मोठ्या कुड्या होत्या. निमगोऱ्या मुद्रेवरचा सात्त्विक भाव भाळावर लावलेल्या बुक्क्यामुळे अधिकच शोभून दिसत होता. मध्यम उंचीच्या, सडपातळ बांध्याच्या, प्रौढ वयाच्या सात्त्विक यल्लूबाईंनी प्रथमदर्शनीच सर्वांना आपलंसं केलं.
  तानपुरे लावले गेले. तबला-डग्गा सुरात बोलू लागले. यल्लूबाईंनी प्रथम दत्तगुरुंच्या छायाचित्राला वंदन केलं. मग श्रोत्यांना हात जोडले. डोळे मिटून त्यांच्या गानगुरूंचं स्मरण केलं आणि 'षडज' असा काही दमदारपणानं लावला की सारं वातावरण त्या आकारानं भारून गेलं. कोमल ऋषभाला किंचित स्पर्श करून त्या मंद्रसप्तकातल्या कोमल धैवतावर जरा स्थिरावल्या. असं भैरव रागाचं दर्शन घडवून त्यांनी बैरागी ख्यालाला सुरवात केली.
  "दीजो दरस महेस त्रिपुरारी त्रिलोचन।
   तुम जानत मेरे मन की बात ॥"

  बाईंच्या स्वरातून भक्तिभाव उचंबळत होता. मध्यमावरून ऋषभावर येताना त्यांनी घेतलेली मींड काळजाचा ठाव घेत होती. प्रभुदर्शनाची लागलेली ओढ त्यातून व्यक्त होत होती. त्या म्हणत होत्या, स्वामी, आपली संगत जन्मोजन्मीची आहे.
  आता भैरवी अवतीर्ण झाली. भैरवी मुळातच रसवंती, मधुर आणि त्यात मीराबाईंच्या मनातली आर्तता यल्लूबाईंच्या स्वरातून तितक्याच उत्कटतेनं प्रकट होऊ लागली. 
"जोगी मत जा, मत जा, मत जा। पांव पडूं मै तोरे। 
 अगरचंदन की चिता जलाऊँ। अपने हाथ जला जा॥"

  जोगी, नको रे जाऊस, नको रे जाऊस मला सोडून... आणि जायचंय असेल तर माझ्या चितेची राख फासून जा... अशा अर्थाचे हे पद म्हणता म्हणता 'यल्लूबाई' स्वतःच 'मीराबाई' झाल्या. 
  स्वर थांबले, पण त्याचा दरवळ कितीतरी वेळ मैफिलीला सुगंधित करीत राहिला.
  मैफिल संपवून बाई आत गेल्या, तेव्हा महाराज अत्यंत आनंदात होते. त्याच प्रसन्नतेनं त्यांनी त्यांच्या चरणापाशी वाकलेल्या यल्लूबाईंच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत करूणेनं ते म्हणाले, "माई, तुला सरस्वतीचं वरदान आहे. तुझं मन प्रेमानं ओथंबलेलं आहे. जे आपल्या हातात नाही त्याचं दु:ख करीत हा मोलाचा जन्म वाया घालवू नकोस. नादब्रह्माची उपासना करीत राहा. तो श्यामसुंदर घुंघटपट निश्चित दूर करील."
  महाराजांच्या त्या प्रेमळ स्पर्शाने आणि बोलण्यानं यल्लूबाईंची व्यथा एकदम दूर झाली. त्या मनातून सर्वार्थानं महाराजांना शरण गेल्या. कारण महाराजांनी त्यांच्याकडे केवळ गाणारी बाई म्हणून पाहिलं नव्हतं, तर त्यांच्यातलं माणूसपण ओळखून, त्यांचं दु:ख जाणून त्यांना आपलं म्हटलं होतं. 'माई' म्हटलं होतं. आणि का कोण जाणे, पण त्या एका शब्दानं त्यांनासुद्धा महाराजांकडे पाहून मायेचा उमाळा आला होता. आपला बाबूच पुन्हा भेटल्यासारखं वाटलं होतं......क्रमशः ...

 *🔆 लेखन श्रीमती मृणालिनी जोशी 🔆*

No comments:

Post a Comment