Monday, 14 January 2019

Tale 2

‼पुष्प = {३८},‼💢*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*

  महाराजांच्या या भेटीनंतर ताईसाहेबांच्या जीवनाला वेगळं वळण लागलं. त्यांच्या विचारांची दिशा बदलली. सांसारीक सुखासाठी आसावलेलं त्यांचं मन अंतर्मुख झालं. त्या दिवशी त्या परत निघता निघता महाराजांनी उच्चारलेले शब्द त्यांना पुन:पुन्हा आठवू लागले. खरं तर त्यांच्याकडे न पाहता कुठेतरी अंतराळी पाहत महाराज म्हणाले होते, "प्रारब्ध भोगावंच लागतं. सुखदुःख येतच राहतं. आम्ही त्यांत ढवळाढवळ करीत नाही. आम्ही एवढं मात्र करतो-माणसाला आनंदाची वाट दाखवतो-सुखदुःखापलीकडे नेणारी."
  ताईसाहेबांची खात्री होती की हे त्यांनी आपल्यालाच सांगितलं आहे. त्यांना वाटू लागलं, 'आपल्या दैवात इतरांसारखं संसारसुख नसेल. आईपणही नसेल कदाचित, पण तेवढाच का माणसाच्या जन्माचा अर्थ? नाही. त्याहूनही काही अधिक आहे. महाराज म्हणाले तशी प्रारब्धानं मिळालेल्या सुखदुःखापलीकडे नेणारी वाट निश्चित आहे. ती आपण शोधली पाहिजे.'
  त्या मग दादामहाराजांच्या प्रवचनाला नियमितपणानं जाऊ लागल्या. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करू लागल्या. सरदार मिरीकर, श्री प्रधान, नूरी आणि शंकरमहाराजांच्या इतर अनेक शिष्यांच्या रावसाहेबांच्या बरोबर होणाऱ्या अध्यात्माच्या चर्चा उत्सुकतेनं ऐकू लागल्या. त्यावर चिंतन करू लागल्या. ताईसाहेबांमध्ये झालेल्या या परिवर्तनानं रावसाहेबही सुखावले. पतिपत्नीत सुसंवाद निर्माण झाला. मनं जवळ आली.
  एकदा बोलता बोलता रावसाहेब सहज ताईसाहेबांना म्हणाले, "पद्मावती, तुला लागलेली ही ज्ञानेश्वरीची गोडी पाहून वाटतंय की महाराजांचे बोल लवकरच खरे होणार."
  "म्हणजे ? मी नाही समजले !"
  "मी पहिल्यांदा महाराजांना भेटलो तेव्हा ते म्हणाले, 'धीर धर. तुझी वास्तू ज्ञानेश्वरीच्या रसानं भरून जाणार आहे. मला वाटतं, हे तुझ्यामुळेच होणार आहे."
  "अहो, पण मी तर आत्ताशी कुठे अभ्यासाला सुरुवात केलीय. मला ही गोडी लागणार हे त्यांना आधीच कसं कळलं ?"
  "त्यांना भूत, भविष्य, सगळं कळतं. ते जसे दिसतात तसे ते नाहीत. माउलीनं ज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगताना 'अमानित्वं' या त्यांच्या गुणाचं वर्णन असं केलंय-
"वाचास्पतीचेनि पाडें। सर्वज्ञता तरी जोडे।
 परी वेडिवेमाजीं दडे। महिमेयेणें॥१३-१९१॥"
"चातुर्य लपवी। महत्त्व हारवी। 
 पिसेपण मिरवी। आवडोनि॥१३-१९२॥"
  "महाराज, अगदी तसेच आहेत. वेड्याचं सोंग आणतात. विक्षिप्त वागतात. असंबद्ध, अर्वाच्य बोलतात. पण अंतरंगात ते निराळे आहेत. परमज्ञानी आहेत. कर्तुमकर्तुम् अशी दैवी शक्ती आहे त्यांच्या अंगात !"
  "हे मात्र अगदी खरं हो ! काहीतरी विलक्षण शक्ती आहे त्यांच्या शब्दात, त्यांच्या स्पर्शात. त्यांच्या सहवासात. माणूस कसं झपाटून जातं !"
  एवढं बोलून ताईसाहेब गप्प बसल्या. त्यांच्या मनात आलं, आपलं परवाचं स्वप्न सांगावं का यांना ? कदाचित त्या स्वप्नाचा महाराजांनी केलेल्या भविष्यवाणीशी काही संबंध असायचा.
  ताईसाहेबांची विचारमग्न मुद्रा पाहून रावसाहेबांनी विचारलं, "कसल्या विचारात पडली आहेस एवढी ? काही विशेष ?"
  "म्हटलं तर विशेष आहे. आणि म्हटलं तर नाही. कारण अखेरीस ते एक स्वप्न होतं, म्हणूनच मी तिकडे दुर्लक्ष केलं होतं. पण आत्ता आपण सांगितलेले महाराजांचे शब्द ऐकून वाटतंय, त्या स्वप्नाचा काहीतरी संबंध आहे त्या बोलण्याशी."
  "असं स्वप्न तरी काय पडलं ?"
  "परवा रात्री मला श्रीगणरायाचं दर्शन झालं. आपल्या माहेरच्या उपास्यदैवताचं दर्शन झालं म्हणून मला खूप आनंद झाला. बालपणापासून मला त्याच्याविषयी प्रेम वाटायचं. त्याच्याबरोबर आई पार्वतीही होती. मी त्या दोघांचीही भक्तिभावानं यथासांग पूजा केली. त्यानं जणू मंगलमूर्ती प्रसन्न झाली. तिनं मला आपल्या सोंडेनं कुरवाळलं. आणि नवल म्हणजे त्या दिवशी महाराजांनी माझ्या कंठाला जिथे स्पर्श केला होता ना, अगदी तिथेच स्पर्श करून मला आशीर्वाद दिला. बाप्पा म्हणाला, 'तुला अमृतवाणी लाभो. तुझ्या जिव्हेवर सरस्वती बसो.'
  आई पार्वतीनंही माझ्या मस्तकावरून हात फिरवला. अजूनही- अजूनही त्या दोघांचा स्पर्श मला जाणवतो. ते स्वप्न इतकं खरं होतं-"
  "छे... छे, ते साधं स्वप्न नव्हतं, पद्मावती." रावसाहेब मधेच म्हणाले, "तो होता दृष्टान्त ! साक्षात्कार. वरप्रसाद. अगं, त्या ओमकारस्वरूप शब्दब्रह्मानंच तुझ्या मस्तकावर वरदहस्त ठेवलाय. गुरुकृपेनं शिवशक्ती प्रसन्न झालीय तुला."
  "खरं म्हणता ?"
  "अगदी खरं. त्रिवार सत्य."
  तो दृष्टान्तच होता याचा दाखला त्या दोघांना त्या दिवशीच मिळाला. संध्याकाळी प्रवचनानंतर श्रीदादामहाराजांनी त्यांना थांबवलं, म्हणाले, "माउलीनं ताईसाहेबांना आज एक भेट दिलीय."
  "मला ?"
  "होय. ही भावार्थदीपिका त्यांनी प्रसादभेट म्हणून दिली आहे. घ्या. आणि माउलीनं विशद केलेला भावार्थ भाविकांना उलगडून सांगा."
  "पण... पण हे मला कसं जमणार, महाराज ? मला स्वतःलाच अजून धड काही कळत नाही. मी काय सांगणार कुणाला ?"
  "तुम्ही स्वतः सांगणार नाही. तुमच्या मुखातून माउली बोलेल. तुमच्या 'हृदयी'चा सदगुरुच सारं काही वदवून घेईल. ताईसाहेब, अहो, प्रवचनं करायची नसतात. ती यदृच्छया उत्स्फूर्तपणे होत असतात."
  "अशा गोंधळू नका. चला, आपण आजच 'श्रीगणेशा' करू या. उघडा ज्ञानेश्वरी."
  दादामहाराजांच्या या अनपेक्षित आज्ञेनं त्यांना काही सुचेनाच. रावसाहेबांनी त्यांची मन:स्थिती ओळखून हलकेच म्हटलं, "हा तुझ्या दृष्टांताचा प्रत्यय येतो आहे. नि:शंक मनानं, विश्वासानं वाचायला सुरूवात कर."
  ताईसाहेबांनी होकारार्थी मान हलवली. प्रथम त्यांनी दादामहाराजांना वाकून नमस्कार केला. आणि मग आपल्याला मागंपुढं उभं राहून मायेनं सांभाळणाऱ्या पतीलाही त्यांनी वंदन केलं. मनोमनी शंकरमहाराजांचंही स्मरण केलं आणि त्या वाचू लागल्या -
"ओम नमो श्रीआद्या। वेदप्रतिपाद्या।
 जय जय स्वयंवेद्या। आत्मरूपा॥१.१॥
  श्रीगणेशाचं वर्णन वाचता वाचता त्यांना स्वप्नातला तो सोंडेनं कुरवाळणारा गौरिनंदन दिसू लागला. त्यांना धीर देऊ लागला. त्यामुळे सुरवातीला कापणारा त्यांचा स्वर आत्मविश्वासानं ओव्या वाचू लागला.
  "मज हृदयीं सदगुरू। जेणें तारीलो हा संसारपुरु। 
   म्हणौनि विशेषें अत्यादरू। विवेकावरी॥१.२२॥"
  नंतर दादामहाराजांनी बाराव्या अध्यायातलं "जय जय वो शुध्दे' हे नमन वाचून घेतलं.
  मग म्हणाले, "माउलीनं काय सांगितलंय वाचलंत ना ? सदगुरुंनी आपला 'स्नेहपल्लव' आपल्यावर पांघरला की आपली 'मती' प्रकाशित होते. जन्माचं सार्थक होतं. जा. यापुढे ज्ञानेश्वरीचं निरूपण करायला सुरुवात करा. ' कल्याणमस्तु ॥'''.......क्रमशः ...

*_लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी_*

No comments:

Post a Comment