Monday, 14 January 2019

Tale 13

 *⚪🌀⚪पुष्प = {५०},⚪🌀⚪*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*

  डॉक्टारांनी तात्पुरती नोकरी धरली असली तरी त्यांचं मन त्यात फारसं रमत नव्हतं. नगरला त्यांना स्वतंत्र दवाखाना थाटायचा होता. तेवढ्यासाठी तर ते त्यांच्यावर माया करणाऱ्या, त्यांच्या बुध्दिमत्तेचं कौतुक करणाऱ्या डॉ. वजिफदारांसारख्या हीतचिंतकाने दिलेला सल्ला डावलून एम. डी. न होता गावी परतले होते. कारण त्यांना माहीत होतं की गावात एखाद्या 'विशेषज्ञा' पेक्षा साध्या डॉक्टारचा उपयोग जास्त असतो. पण त्यासाठी पैसा हवा. जागा हवी.
  डॉक्टारांची ही चिंता जाणून एक दिवस त्यांचे वडील त्यांना म्हणाले, "आपल महाराज आले ना की त्यांना विचारू."
  "त्यांना यात काय कळणार ? त्यांनी ब्रह्ममायेचा गुंता सोडवीत बसावं. व्यवहारातले फुकटचे सल्ले देऊ नयेत !" डॉक्टर जरा तडकूनच म्हणाले.
  "व्यवहार आणि परमार्थ हे काही दोन स्वतंत्र भाग नाहीत, नागेश. एकाच जीवनाच्या दोन बाजू. महाराज सर्वज्ञ आहेत."
  "असतीलही कदाचित ! पण भाऊ, मला माझ्या बुध्दिप्रमाणे वागू द्या." डॉक्टरांनी ठामपणानं म्हटलं. त्यांचा भाऊंच्या त्या महाराजांच्या सर्वज्ञतेवर अजिबात विश्वास नव्हता.
  एक दिवस अचानक भाऊंचे ते महाराज आले. भाऊंनी अत्यंत प्रेमभरानं त्यांचं स्वागत केलं. त्यांचा हात धरून त्यांना बैठकीवर बसवलं. मग त्यांनी डॉक्टरांना हाक मारली. म्हणाले, "नागेश! अरे महाराज आले आहेत. दर्शनाला ये."
  डॉक्टार जरा अनिच्छेनंच आपल्या खोलीतून बाहेर आले. आणि, आणि महाराजांना पाहताच तिथल्या तिथेच क्षणभर खिळून उभे राहिले.
  "काय रे काय झालं ?"
  "भाऊ हे, हे..."
  "हेच शंकरमहाराज."
  भाऊ आणि महाराज एकमेकांकडे बघून अर्थपूर्ण हसले. डॉक्टर अधिकच गोंधळले. तेव्हा भाऊ म्हणाले, "अरे बाबा, ज्यांना नादी लागू नका असं तू पत्रातून कळवलं होतंस ना, ते हेच महाराज बरं..."
  "भोंदू, फसवे, होय ना ?" महाराज मोठ्यानं हसत म्हणाले, "पण तुला ठाऊक आहे का भाऊ, हे तुझे बुध्दिप्रामाण्यवादी शहाणे चिरंजीवच तुझ्या आधी आमच्या नादी लागले होते. विचार त्यांना !"
  "काय सांगता काय, महाराज ? आणि तुम्ही हे आज सांगताहात ? तेव्हाच का बोलला नाहीत याचं पत्र वाचल्यावर ? बरं का रे नागेश, तुझं ते पत्र आलं तेव्हा महाराज इथेच बसले होते. त्यांनीच ते उघडलं. वाचलं. हसत हसत म्हणाले, "बघ तुझा पोरगा काय म्हणतोय ते ! लिहितोय की बुवाबाजी करणाऱ्यांच्या नादी लागू नका. तुमचा वेळ जात नसेल तर मी तिकडे आल्यावर तुम्हांला उत्तमपैकी पुस्तकं आणून देईन. वाचनात आणि चिंतनात तुमचा वेळ चांगला जाईल."
  डॉक्टर खाली मान घालून मुकाट्यानं ऐकत होते. त्यांनी खरं तर योग्य तेच लिहिलं होतं. त्यांना तेव्हा थोडंच माहित होतं की भाऊंचे 'महाराज' म्हणजे आपल्याला लहानपणी भेटलेले फकीरबाबाच आहेत म्हणून !
  तेवढ्यात विषय बदलीत महाराजांनी प्रश्न केला, "काय रे डॉक्टर, तुझ्या दवाखान्याचं कुठवर आलं ?"
  "खटपट चाललीय. पैसा हवा. योग्य जागा हवी. आम्ही 'धनेश्वर' खरे, पण नुसते आडनावाचे ! धन अभावानंच!"
  "अरे पण 'ईश्वर' आहे ना तुझ्या नावात ? ईश्वर हेच खरं धन. अक्षय्य धन. तरीही तो तुला गरजेपुरता पैसा जरूर देईल. चल. आम्हीच आता तुला दवाखाना थाटून देतो."
  असा नुसता आशीर्वाद देऊनच महाराज थांबले नाहीत, तर त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला.त्यांच्या नगरच्या शिष्यांनी हजारएक रूपये जमवले. त्यांच्या एका गुजराथी भक्तानं आपली माडीवरची जागा दवाखान्यासाठी भाड्यानं दिली.
  दवाखान्याचं उदघाटन महाराजांच्या हातूनच झालं. त्या वेळी ते म्हणाले, "वैद्यकी हा धंदा नाही. ती एक सेवा आहे जनताजनार्दनाची. हे व्रत घेताना द्रव्याची हाव नसावी. परिग्रहाचा लोभ नसावा. आपणहून पैसे मागू नकोस. श्रीमंत-गरीब भेद करू नकोस. जो जे देईल ते घे. पैशासाठी कुणाला विन्मुख पाठवू नकोस. कुणाला अडवू नकोस. इथे या धन्वंतरीच्या तसबिरीपुढे एक मातीचं 'सुघड' ठेव. ज्यानं त्यानं आपल्या ऐपतीप्रमाणं त्यात पैसे टाकावेत. त्यात जे जमेल ते तुझं."
  डॉक्टरांनीही मनापासून ते व्रत स्वीकारलं. वैद्यकीच्या माध्यमातून आयुष्यभर त्यांनी समाजालाच परमेश्वर मानून गोरगरिबांची, दीनदुबळ्यांची - व्याधिग्रस्तांची सेवा केली.
"न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवम् ।
 कामये दु:खतप्तानां प्राणिनां आर्तिनाशनम॥"

  हे आपलं ब्रीदवाक्य मानून या 'धनेश्वरा' नं दरिद्रीनारायणाची पूजा केली. त्यांनी अशाश्वत संपत्ती नाही मिळवली, पण गुरूभक्तीच्या बळावर शाश्वत 'ऐश्वर्य' मात्र निश्चित मिळवलं.....क्रमशः ...

*_लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी_*

No comments:

Post a Comment