Monday, 14 January 2019

Tale 8

*🌻🌻पुष्प = {४५},🌻🌻*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची....*


  मेहेंदळ्यांच्या वाड्यात तिसऱ्या मजल्यावर ओतुरकर नावाचे गृहस्थ बिऱ्हाडानं राहत होते. एस.टी. मध्ये अधिकारी होते. त्यांची महाराजांवर फार भक्ती होती. महाराज वाड्यात आलेलं कळलं की ते त्यांच्या दर्शनाला येत. एकदा साडेपाच-सहाच्या सुमाराला ते कचेरीतून घरी परत आले. जिना चढतानाच त्यांना महाराज हाँलमध्ये बसलेले दिसले, पण घरी जाऊन हातपाय धुऊन कपडे बदलून महाराजांच्या दर्शनाला यावं म्हणून ते आधी आपल्या बिऱ्हाडी गेले.
  त्यांनी गडबडीनं हातपाय धुतले. कचेरीतले कपडे बदलून ते धूतवस्त्र नेसले. अंगात सदरा घातला. त्यांची लगबग बघून त्यांच्यासाठी चहा घेऊन आलेल्या त्यांच्या बायकोनं विचारलं, "एवढी घाई कसली ?"
  "महाराज आलेत. दर्शनाला निघालोय."
  बायकोनं हातातला कप थोड्या रागानंच त्यांच्यापुढे ठेवला.
  "का ? काय झालं ?" ओतुरकरांनी प्रश्न केला.
  "होणार काय ? काही होत नाही हीच तर रड आहे! घ्या. चहा घ्या आणि जा त्या महाराजांचे पाय धरायला !" 
  "घरी आलं तर थोडा विसावा घ्यावा, दिवसभर घरात एकट्या बसलेल्या बायकोशी चार शब्द बोलावेत, पण नाही - चालले लगेच खाली. त्यांनी नुसती भूल घातलीय. मला हेच कळत नाही की त्यांच्यात आहे तरी काय एवढं ?"
  "असं नको म्हणूस. ते साक्षात ईश्वर आहेत. शंकर आहेत."
  "मग आपल्या या भक्तावर प्रसन्न का होत नाहीत ते ? मी म्हणत्ये दिवा का देत नाहीत त्याच्या वंशाला ? लग्नाला सोळा वर्षे झाली. अजून घरात पाळणा नाही हलला. तुम्ही म्हणता तसेच जर ते देव असतील, शंभु महादेव असतील तर माझी कूस उजवतील !"
  बोलता बोलता बाईंना रडू आलं. डोळे पुसत त्या म्हणाल्या, "पुरुषांना नाही कळायचं आमचं दुःख! तुम्ही जा. जा त्यांची सेवा करायला."
  यावर ओतुरकर तरी काय बोलणार? ते मुकाट्यानं उठले आणि अस्वस्थ मन:स्थितीतच खाली आले.
  दिवानखान्यात महाराज तक्क्याला टेकून आरामात बसले होते. ओतुरकरांनी त्यांना नमस्कार केला. तेव्हा त्यांच्याकडे निरखून पाहत ते म्हणाले, "लग्नाला सोळा वर्षे झाली. घरात पाळणा हलला नाही अजून, हे कसले देव ?"
  ओतुरकर चपापले. त्यांना समजेना की आपल्या बायकोचं बोलणं महाराजांना कसं ऐकू आलं ?"
  "बघतोस काय ?" महाराज ओरडले, "जा. तिला घेऊन ये खाली. 
  तिथे असलेल्या मंडळींना महाराजांच्या बोलण्याचा काही उलगडा होईना.
  "अरे, जा ना !" असं महाराजांनी म्हणताच ओतुरकर घरी गेले. बाई अजूनही घुश्शातच होत्या. म्हणाल्या, "मला नाही कुठे जायचं ?"
  पण ओतुरकरांनी त्यांची समजूत घालून खाली आणलं.
  'आपण रागाच्या भरात जरा जास्तच बोललो. महाराज शिक्षा तर करणार नाहीत ना' या विचारानं धास्तावलेल्या बाईंनी महाराजांना भीतभीतच नमस्कार केला.
  त्यांच्याकडे न बघताच महाराज म्हणाले, "बाप्या, मला जरा उभं कर." बापू रानडे यानं त्यांना उठवलं. उभे राहताच महाराजांनी बाईंना कडकडून मिठी मारली. थरथरणाऱ्या बाईंना म्हणाले, "जा. पुढच्या वर्षी पोरगा घेऊन ये." आणि खरोखरच त्यांची कूस उजवली. त्यांना चांगला बाळसेदार मुलगा झाला.
  सिध्द पुरुषांची व्यक्तिगत चेतना वैश्विक चेतनेशी समरस झालेली असते. त्यांची ती अंगभूत शक्ती त्यांचा संकल्प सिध्दीला नेते......क्रमशः ...

  *_लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी_*

No comments:

Post a Comment