Monday, 14 January 2019

Tale 35

〽〽⚪पुष्प = {७२},⚪〽〽*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची....*

  शुभराय मठात श्री. अनंताचार्य उम्रणकर नावाचे गरीब ब्राह्मण राहत होते. एकदा एका घरी अभिषेक करून परत मठात येताना त्यांच्या मनात सहजच एक विचार आला. वाटलं की, महाराज श्रीमंत लोकांबरोबर सगळीकडे जातात. पण आपण पडलो गरीब. त्यांच्याबरोबर जायचा योग आपल्या नशिबी कुठून असणार ? 
  हा असा विचार त्यांच्या मनात यायला आणि रस्त्यावर समोरून महाराज यायला एकच गाठ पडली  अनंताचार्यांनी महाराजांना नमस्कार केला. महाराज म्हणाले, "जा. घरी जाऊन सोवळं बदलून साधे कपडे घाल आणि स्टेशनवर ये. आपल्याला मुंबईला जायचं आहे. अरे, असा बघतोस काय 'आ' करून ? जा. लवकर ये."
  अनंताचार्यांना अतिशय आनंद झाला. ते घरी जाऊन प्रवासाच्या तयारीने स्टेशनवर गेले. महाराज त्यांची वाट पाहत उभेच होते.
  दोघेजण मुंबईला श्री. केशवजीभाई अशर यांचे घरी गेले. तिथे जेवणखाण झाल्यावर महाराजांनी अशरांना विचारलं, "आम्ही सांगितलेली बोटीची दोन तिकिटं काढलीस ना ?"
  "होय, महाराज." असं म्हणून अशरांनी त्यांना तिकिटं आणून दिली. अनंताचार्य मंत्रमुग्ध झाल्यासारखे महाराजांच्याकडे पाहत राहिले. त्यांना कळेना, आपण स्वप्नात आहोत की जागे ? 
  नंतर महाराज त्यांना घेऊन परदेशभ्रमणाला निघाले. मस्कत,बगदाद, इंग्लंड, फ्रान्स, इराण, इटली अशी अनेक ठिकाणं त्यांना दाखवली. युरोप आणि अरब देशांतून फिरल्यावर महाराजांनी विचारलं, "काय अनंता, प्रवासाची हौस फिटली की नाही ? की अजून कुठे जायचंय?"
  "सगळं भरून पावलं, महाराज! या गरिबाला दुनियेचं अजब दर्शन घडवलंत. आपली कृपा अपार आहे."
  प्रवासात अनंताचार्यांना आणखी एका गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं. ते जिथे जात तिथे लोक महाराजांना ओळखीत होते. त्यांच्याशी अतिशय आदरानं वागत होते. कुणी त्यांना 'नूर महंमद' म्हणून ओळखीत होतं, तर कुठे त्यांना 'जाँनसाहेब' , 'स्टीमबाबा' म्हणून हाका मारीत होते. जितके देश, तितकी गावं, पण महाराज मात्र एकच ! 
  आणखी नवल म्हणजे        महाराजसुद्धा त्या सर्वांशी त्यांच्या भाषेत बोलत होते.
  एक महिन्याने दोघे सोलापूरला परत आले. तेव्हा महाराज अनंताचार्यांकडे रोखून पाहत म्हणाले, "मग काय अनंता, आम्ही केवळ श्रीमंत माणसांबरोबर फिरतो. असंच ना ?"
  अनंताचार्य काय बोलणार ? त्यांनी फक्त पुढे होऊन महाराजांच्या पायावर मस्तक ठेवलं.
  अनंताचार्यांना महाराजांनी महिनाभर फिरवून आणलं. पण रामभाऊ अकोलकरांना महाराजांनी एका दिवसात चारीधामांची यात्रा करवून आणली. 
  रामभाऊ हे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरचे क्षेत्रउपाध्ये होते. महाराज नेहमी त्यांच्याकडे उतरायचे. एकदा रामभाऊंनी त्यांना विचारलं, "महाराज, आपण अनेक क्षेत्रांना भेटी देता, ती कशी आहेत हो ? मला ती पाहावीत असं फार वाटतं. पण काय करणार ? मी पडलो क्षेत्रउपाध्ये. मला हे क्षेत्र सोडून कुठे जाता येत नाही. वस्तीला इथेच राहावं लागतं."
  "उद्या सांगू तुला दुसरी क्षेत्रं कशी आहेत ती. पण एकांतात. पहाटे लौकर तयार हो. घरात सांगून ठेव की, महाराजांबरोबर बाहेर जायचं आहे, उशीर होईल."
  महाराज एकांतात आपल्याला काय सांगणार असतील याची कल्पना करण्यातच रामभाऊंची सर्व रात्र संपली. ते पहाटेच उठले. स्नान-संध्या करून महाराजांबरोबर जायला सिद्ध झाले. उत्सुकतेने महाराजांच्या हाकेची वाट पाहत राहिले. तेवढ्यात त्यांनी हाक मारलीच. म्हणाले, "चल. तुला आम्ही तीर्थांचं दर्शन घडवतो."
  "पण मी इथून बाहेर कसा जाऊ, महाराज ?"
  "ते सगळं आम्ही पाहून घेतो. तू फक्त आम्ही सांगू तसं करायचं. आम्ही डोळे बंद कर म्हटलं की, लगेच डोळे बंद करायचे. आम्ही पुन्हा उघड म्हणेपर्यंत मुळीच उघडायचे नाहीत. कळलं ?"
  "होय महाराज. आपण सांगाल तसंच करीन मी."
  "हंऽ, डोळे घट्ट बंद कर आता."
  आज्ञेप्रमाणे रामभाऊंनी डोळे मिटले. थोड्याच वेळात त्यांचे जमिनीवरचे पाय सुटले. त्यांना जाणवलं की, आपण आकाशातून उडतो आहोत. एखाद्या पक्ष्यासारखे.
  थोड्या वेळानं महाराज म्हणाले, "उघड डोळे."
  रामभाऊंनी डोळे उघडले. आणि त्यांचा विश्वासच बसेना डोळ्यावर. कारण ते चक्क हिमालयावर आले होते. हिमाच्छादित शिखरे पाहत होते. 
  "हे बद्रिकेदाराचं मंदिर बघ."
  रामभाऊंनी मंदिराच्या प्राकारात जाऊन लक्ष्मी, गणपती, वीर मारूती सर्वांना नमस्कार केला. मग ते गाभाऱ्यात गेले. सिहासनावर बसलेल्या काळ्या पाषाणाच्या, पद्मासन घातलेल्या, ध्यानमुद्रा धारण केलेल्या चतुर्भुज विष्णूच्या सुंदर मूर्तीचं दर्शन घेतलं.
  त्याबरोबर महाराज म्हणाले, "चल, मीट डोळे."
  रामभाऊंनी डोळे मिटले आणि पुन्हा आकाशात उड्डाण केलं. खरं तर हिमालयातल्या थंडीनं त्यांना हुडहुडी भरली होती. पण ते बोलले नाहीत.
  केदारनाथ, गंगाद्वार, हरिद्वार, हृषिकेश इत्यादी तिर्थक्षेत्रं दाखवीत महाराजांनी त्यांना काशीला आणलं. त्रिवेणीसंगमात स्नान घडवलं. तिथून नेलं ते जगन्नाथपुरीला. मग द्वारका, सोमनाथ, नंतर कुरवपूर आणि दक्षिणेकडे कन्याकुमारी, रामेश्वर. तिन्ही समुद्रांचं दर्शन होताच रामभाऊंच्या मनात आलं, 'आपण रोज नुसती स्तोत्रं म्हणत होतो. ज्योतिर्लिंगांचं स्मरण करीत होतो. पण आज त्या सर्वांचं प्रत्यक्ष दर्शन झालं. महाराजांच्या कृपेनं या पामराला 'आसेतुहिमाचल' अशा मायभूमीला पाहता आलं. जीवन धन्य झालं !'
  कन्याकुमारीच्या तीनही सागरांच्या संगमावर सूर्यास्त होऊ लागला तेव्हा त्या दृश्यात रंगून गेलेल्या रामभाऊंना महाराज म्हणाले, "चला, मिटा डोळे."
  रामभाऊंनी डोळे मिटले आणि दोघांनी आकाशगमन केलं. काळोख पडायच्या आत आरतीच्या वेळेला रामभाऊ आपल्या क्षेत्रस्थानी त्र्यंबकेश्वरी परत आले.
  रामभाऊंना काही बोलताच येईना. पण त्यांचा उचंबळून आलेला भक्तिभाव महाराजांना कळला. त्यांच्या पाठीवर थोपटीत ते म्हणाले, "जाऽ, आपलं आन्हिक करायला जा.
  रात्री तृप्त मनानं रामभाऊ आडवे झाले. त्यांच्या मनात आनंद मावत नव्हता आणि कुणाला तो सांगताही येत नव्हता. एका दिवसात ते भरतखंड फिरून आले त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार ?
  सगळी रात्र ते त्या अकल्पित आनंदाच्या लाटांवर तरंगत होते. कालच्या रात्री कल्पनेनं झोप आली नाही आणि आजच्या रात्री अलौकिक अनुभवांच्या आठवणींनी झोप नाही.....क्रमशः ....

 *🍁 लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी 🍁*

Tale 34

*💐💐⚪पुष्प = {७१},⚪💐💐*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची....*

  सोलापूरचा उंच, गोरा, देखणा, पायजमा आणि शर्ट घातलेला अनंता देशपांडे हा तरूण मुलगा प्रथम महाराजांकडे आला तो त्याच्या एका मित्राबरोबर. तो म्हणाला होता, "इथे शुभराय मठात येणारे शंकरमहाराज फार ज्ञानी आहेत. मोठे मोठे डॉक्टर, वकील, अधिकारी त्यांचे भक्त आहेत. आपण त्यांच्या दर्शनाला जाऊ या."
  अनंतालाही वाटलं, जावं. एवढे सुशिक्षित लोक ज्यांना गुरूस्थानी मानतात ते महाराज निश्चितच मोठे असले पाहिजेत. आपणही त्यांना गुरु करावं.
  ते दोघे मठात येऊ लागले. महाराजांचा मठात मुक्काम असेल तेव्हा त्यांच्या सस्तंगात राहू लागले. पण अनंताच्या मनाला समाधान वाटेना. महाराजांचं लौकिक दृष्टीला वाटणारं विक्षिप्त वागणं, त्यांचं अर्वाच्य बोलणं, त्यांचं सिगरेट ओढणं या गोष्टी त्याच्या मनाला खटकू लागल्या. तेव्हा एक दिवस तो मित्राला म्हणाला, "माधव, आपण हिमालयात जाऊ या. मी असं ऐकलंय आणि ग्रंथांतून वाचलंही आहे की, तिकडे अनेक सिध्द पुरुष राहतात. गुहेत राहून तपश्चर्या करतात. तिथल्याच एखाद्या साक्षात्कारी सिध्दाला आपण प्रसन्न करून घेऊ. त्याचे शिष्य होऊ. तो सांगेल तशी साधना करू. हे महाराज काही आपल्या कामाचे नाहीत."
  माधवला ते पटलं. मग कुणालाही न सांगता ते दोघे मित्र मजल दरमजल करीत, हिमालयात कुणीतरी योग्य गुरु मिळेल या आशेवर तिकडे गेले. गुरूच्या शोधात भटकत राहिले. तिथल्या एका अवघड शिखराच्या पायथ्याशी एका गुहेत एक महात्मा राहतो असं त्यांना कळलं म्हणून ते त्या गुहेच्या दिशेनं निघाले. बरंच अंतर चालून झाल्यावर त्यांना दूर गुहेसारखं काहीतरी दिसलं. अत्यंत आनंदानं ते समोर दिसणाऱ्या अरूंद वाटेनं चालू लागले.
  पण - पण त्या वाटेनं ते चालू लागले तो काय, बर्फाची एक मोठी भिंत त्यांच्यापुढे उभी राहिली. दोघे गोंधळले. पुढची वाट बंद झालेली. पुढे जाणार कसं ? 
  बर्फ वितळण्याची वाट पाहण्यातही अर्थ नव्हता. कारण संध्याकाळ व्हायला आली होती. तेव्हा दिसतंय तोपर्यंत मागं फिरून मागच्या मुक्कामाला जावं आणि उद्या सकाळीच परत इकडे यावं असं ठरवून ते मागं वळले. 
  पाहतात तो तिथेही बर्फाची अजस्त्र भिंत! म्हणजे आता मागचा मार्गही बंद.
  दोघे अतिशय घाबरले. मोठमोठ्यानं ओरडू लागले. हमसाहमशी रडू लागले. माधव उद्वेगानं म्हणाला, "अंत्या, हे तुझ्या पापाचं प्रायश्चित्त आहे. महाराजांना नावं ठेवलीस त्याची ही शिक्षा मिळते आहे आपल्याला."
  "होय रे होय. मला त्यांचं मोठेपण नाही कळलं. महाराज, महाराज, मी चुकलो. तुमचे पाय सोडून आलो. तुम्ही आमचे मायबाप. लेकराला क्षमा करा. आम्हाला या प्राणसंकटातून वाचवा हो!"
  दोघंही महाराजांना कळवळून हाका मारू लागले.
  "भडव्याऽ" तेवढ्यात त्यांच्या कानावर ही शिवी पडली. दोघांनी आनंदानं एकमेकांकडे पाहिले. हा आवाज महाराजांचाच ! आले. आले. महाराज आपल्यासाठी धावून आले.
  खरोखरच महाराज प्रकट झाले होते. म्हणत होते, "महाराज रांगडे. महाराज दारूडे. महाराज वेडेवाकडे. मग आता कशाला रे त्यांच्या नावानं ओरडतो आहेस ? बोंबलतो आहेस?"
  दोघांनी त्यांचे पाय धरले. डोळे पुसत म्हटलं, "आम्हाला क्षमा करा, महाराज."
  "बरं... बरं... कळली अक्कल!" त्यांना उठवीत महाराज म्हणाले, "जा आता परत आपल्या घरी. तिकडे माणसं डोळ्यात प्राण आणून तुमची वाट पाहत आहेत."
  महाराज लगेच दिसेनासे झाले. आणि त्याबरोबरच त्या बर्फांच्या भिंतीही नाहीशा झाल्या. सुटकेचा नि:श्वास टाकून दोघेही परत फिरले.
  सोलापूरला पुन्हा महाराजांची भेट होताच महाराजांनी मिश्किलपणानं विचारलं, "अंत्या, तू इथे कसा ? हिमालयात कुणी गुरु भेटला नाही ?"
  अनंतानं त्यांचे पाय धरून खालमानेनं म्हटलं, "महाराज, का आम्हाला लाजवता ? तिकडे मला तुम्हीच भेटलात. माझे गुरू. माझे मायबाप. माझे प्राणदाते! आता मी तुम्हांला सर्वस्वी शरण आलो आहे."
  अनंत आणि महाराज यांचं हे बोलणं ऐकणाऱ्या माणसांनी विचारलं, "अनंता, ही हिमालयाची काय भानगड आहे रे ?"
  त्यावर अनंतानं ती सर्व अदभूत कथा सांगितली. आपण महाराजांचा कसा धावा केला आणि महाराज तातडीनं कसे धावून आले हेही सांगितलं. त्या वेळी महाराज मात्र अंतराळी डोळे लावून म्हणत होते...
"मस्त फकीरका कौन ठिकाना। मैं तो दुनिया घुमा।
 तडप-तडप से जौ न पुकारा। उसके दर पर जा थमा॥"
"कळवळोनी मज घालता साद। तत्क्षण मी उभा दारात॥"....क्रमशः ...

 *🍁 लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी 🍁*

Tale 33

*☘⚪पुष्प = {७०},⚪☘*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*


  महाराजांना पत्त्यांचा छंद होता. त्यांना खेळायची लहर आली की ते भेटायला आलेल्या माणसाला पत्ते खेळायला बसवीत. असेच एकदा कोराड मास्तर, श्री. भस्मेकाका आणि रघू यांच्याबरोबर महाराजांनी पत्त्यांचा डाव मांडला होता.
  खेळता खेळताच रघूच्या मनात आलं, 'पत्ते खेळणं काही फारसं चांगलं नाही. पण महाराज का खेळतात ?'
  महाराज रागावतील म्हणून त्याने हा  प्रश्न मनातच ठेवला. परंतु त्याच वेळी महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. ते किंचित हसले. त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले, "हा पत्त्यांचा डाव वाईटच. होय ना रे ? पण तो त्याचा अर्थ न कळणाऱ्यांना."
  अर्थ ? पत्त्यांना कसला अर्थ असणार ?
  असा विचार रघू करतो आहे तोच महाराज पुढे म्हणाले, "अरे बाबा, याचा अर्थ गूढ आहे."
  महाराजांनी एकेक पान समोर ठेवीत म्हटलं -

 ही दुर्री = म्हणजे पृथ्वी आणि 
             आकाश.
    तिर्री = ब्रह्मा, विष्णू, महेश.
  चौकी = चार वेद.
   पंजी = पंचप्राण. 
छक्की = काम, क्रोध हे सहा विकार.
  सत्ती  = सात सागर.
   अठ्ठी = आठ सिद्धी.
  नव्वी = नऊ ग्रह.
 दश्शी = दहा इंद्रिये, पाच कर्मेंद्रिये,  
             पाच ज्ञानेंद्रिये.
गुलाम = आपल्या मनात येणाऱ्या 
             वासना, इच्छा. माणूस 
             त्यांचाच गुलाम होऊन 
             राहतो.
  राणी = माया.
  राजा = या सर्वांवर स्वार होऊन 
             त्यांना चालवणारा.
आणि एक्का = विवेक. माणसाची 
सारासार बुद्धी. या सर्व खेळ खेळाला स्वाधीन ठेवणारा.

  काय रे ? डोक्यात शिरलं का काही?" 
  आता या लहानग्याला काय कळणार ? त्यानं गोंधळून एकदा होकारार्थी मान हलवली. एकदा नकारार्थी मान हलवली.
  महाराज हसले. मास्तरांना म्हणाले, "तुम्ही सांगा याची फोड करून!"
  "मला सुद्धा नीटसं नाही सांगता यायचं. पण प्रयत्न करतो. दश्शीवर दबाव असतो गुलामाचा. वासनाच इंद्रियांना नाचवते. वासना उत्पन्न होते मायेमुळे, तिच्या नादानं वाहावत जातं ते माणसाचं मन. माणूस. तो राजा, पण या राजालाही मुठीत ठेवू शकतो, त्याला अंकुश लावू शकतो तो विवेक- हुकुमाचा एक्का म्हणजेच सदगुरू!"
  "बरोबर." महाराज म्हणाले, "समोरचा भिडू म्हणजे प्रारब्ध! त्याच्या हातातले पत्ते आपल्याला माहित नसतात. पण त्याच्या मदतीने आपण डाव जिंकण्याचा प्रयत्न करतो. जीवन जगतो."
  "आणि आपल्या विरुद्ध असणारे ते कोण ?" भस्मेकाकांनी विचारलं. 
  "आयुष्यात आपल्याला विरोध करणारे, आपल्याला आव्हान देणारे. पण या सर्वांना आपण जिंकू शकतो ते कशाच्या जोरावर ?"
  भस्मेकाका एकदम उदगारले, "सदगुरुंच्या जोरावर, विवेकाच्या जोरावर. सदगुरुसारिखा असता पाठीराखा। इतरांचा लेखा कोण करी?"
  महाराजांनी समाधानाने मान डोलावली. रघूला माया, ब्रह्म, वासना यांतलं काही फारसं कळलं नाही. त्याला एवढंच कळलं की, सदगुरू म्हणजे आपले महाराजच. ते आपल्याला सांभाळणार आहेत आणि त्यांची सतत आठवण हेच नाम.
  एकदा भस्मेकाकाच त्यांना म्हणाले होते की, "रघू, त्यांची सतत आठवण राहणं म्हणजे नाम. ते आपण करावं. महाराजांना फार आवडतं. त्यांनी तसं काव्यही केलं आहे. खरं म्हणजे आम्हाला ते माहीतच नव्हतं. पण एक दिवस नगरच्या सोनावणे मास्तरांना महाराज म्हणाले होते,
  "जनार्दन, तुझ्या या भक्तिरसामृतात आमचंही एक भजन घाल."
  मग भस्मेकाका स्वतःच ते भजन गुणगुणू लागले...
"नरा संसारी, घे दत्तनाम ललकारी॥धृ.॥
 बहुत जन्मींचा तो साठा। म्हणोनी नरजन्माचा हा वाटा।
 समजूनी दवडशी का रे नाठा। होई अधिकारी, घे ॥१॥
 होई सावध झडकरी देही। तरणोपाय भजनाविण नाही।
 शंकरबाबा देती ग्वाही वचन अवधारी, घे॥२॥"...क्रमशः ...

 *☘ लेखन: श्रीमती मृणालिनी जोशी☘*

Tale 32

*⚪〽⚪पुष्प ={६८},⚪〽⚪*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*


  श्री. बाबूराव रूद्र हे महाराजांचे निस्सीम भक्त होते. हे मूळचे सोलापूरचे राहणारे. तिथे ते राजा धनराजगिरजी यांच्याकडे नोकरी करीत असत. 
  एकदा ते राजा धनराजजींच्या बरोबर मोटारीने बाहेरगावी जात असताना भररस्त्यात मध्येच एका माणसाने हात दाखवून मोटार थांबवली. बघतात तो समोर केशरी रंगाचा जरीचा रुमाल डोक्याला बांधलेली, अंगात केशरी कोट घातलेली एक व्यक्ती उभी होती. ती व्यक्ती गाडीजवळ येऊन ओरडली, "बाब्या... तुला हा राजा पाहिजे की आत बसलेला ?" आणि तिने बाबूरावांच्या खांद्यावर हात ठेवला.
  खांद्याला या व्यक्तीचा स्पर्श होताच बाबूरावांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. अति जुनं आणि अति जवळचं माणूस अचानक भेटावं तसा आनंद त्यांना झाला. त्यांनी हातातली पिशवी सामानासकट मोटारीतून खाली टाकली. आपल्या धन्याला म्हणाले, "मला आपल्या नोकरीतून मुक्त करा. मी चाललो. माझ्या गुरूंबरोबर चाललो."
  मग ते त्या व्यक्तीबरोबर गेले. ती व्यक्ती होती सोलापूरातल्या शुभराय मठातले जनार्दनस्वामी.
  एकदा बाबूरावांना घेऊन स्वामी नगरच्या रावबहाद्दूर नवले या महाराजांच्या एका भक्ताकडे गेले. तेव्हा योगायोगाने महाराज त्यांच्या घरीच होते. 
  नवल्यांच्या घरी कीर्तन सुरू झालं. निरूपणाला नामदेवरायांचा अभंग घेतला होता- 'माझे गडी कोण कोण घ्यावे निवडोनी.'
  कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनात असा काही रंग भरला की महाराज उठून नाचू लागले. म्हणाले, "पहा माझे गडी कोण कोण आहेत, पहा."
  जनार्दनस्वामींनाही राहावलं नाही. त्यांनी महाराजांच्या पायावर लोटांगण घातलं. या दोघांची भेट पाहणाऱ्या बाबूरावांना ते दाटल्या गळ्यानं म्हणाले, "हे आमचे धनी बरं बाब्या, हे आमचे धनी!"
  तेव्हापासून आपल्या गुरूंच्या या अवलिया गुरूवर बाबूरावांचाही जीव जडून गेला. यांना या आजोबांचा मोठा लळा लागला.
  पुढे बाबूराव पुण्यात आले. पी. डब्ल्यू. खात्यात पट्टेवाल्याचे काम करू लागले. महाराज त्यांच्याकडे पुष्कळदा जात. असेच एकदा ते तिथे आहेत असं कळल्यावर श्री. रावसाहेब, बापू इत्यादी मंडळी त्यांच्या भेटीला निघाली. तेवढ्यात एक वेदांचा अभ्यास करणारे आणि आताशा ज्ञानेश्वरीही वाचणारे विद्वान पंडित तिथे आले. त्यांनी रावसाहेबांना विचारलं, "काय हो, बऱ्याच साधूसंन्याशांशी तुमची ओळख आहे म्हणून विचारतो, आपण जे ग्रंथांतून वाचतो त्याची प्रत्यक्ष अनुभूती आणून देणारे कुणी आहेत का ?"
  "आहेत. आम्ही अशाच एका ठिकाणी निघालो आहोत. यायचं तर चला, आमच्याबरोबर. योग असला तर पटेल त्यांची ओळख तुम्हांला."
  मग ते सर्व कसबा पेठेतल्या जुन्या काळभैरव मंदिराजवळ असलेल्या बाबूराव रूद्रांच्या घरी गेले. जागा लहान, अंधारी. नोकरीवरून घरी आलेले बाबूराव भाजी चिरत बसले होते. त्यांची पत्नी झोपलेली होती. बहुधा तिला बरं नसावं. कारण तिच्या उशाशी औषधाची बाटली होती. जवळच अर्धवट सोललेलं मुसंबं होतं. त्यांच्या दोन लहान मुली खेळत होत्या.
  महाराज तिथेच बसून चहा करीत होते. दोन-अडीच कप पाणी स्टोव्हवर उकळत होते. "या... या... आज आम्ही सर्वांना चहा पाजणार आहोत." रावसाहेबांना पाहताच महाराज मोठ्या उत्साहानं म्हणाले.
  सर्वजण दाटीवाटीनं बसले. पंडितांच्या कपाळावर मात्र आठ्या पडल्या होत्या.
  चहा झाला, "बाब्या, कपबशा आण. महाराजांनी असं सांगताच बाबूरावांनी दोन-तीन कपबशा समोर मांडल्या. कानतुटके कप-विजोड बशा. 
  त्यातूनच सर्वांनी आळीपाळीनं चहा घेतला. दोन-तीन कप केलेला चहा आठ-नऊ जणांना पुरून उरला.
  हे नवल प्रत्यक्ष पाहूनही पंडितांच्या डोक्यात प्रकाश पडला नाही. पंडितांच्या अहंकाराने त्यांची दृष्टी अधू झाली होती.
  महाराज स्वतःशीच बोलावं तसं म्हणाले, "मनुष्य नाकावर बोट ठेवून बोलतो. मिशीवर ताव मारतो. नाक वर काढून चालतो. पण त्या नाकात किती घाण आहे; हे त्याच्या लक्षात येत नाही."
  महाराजांनी हातावरच नाक शिंकरलं. तो मोठा बेडका पाहून पंडितांनी 'शीऽऽ' म्हणत तोंड फिरवलं.
  "नाकातला शेंबूड इतका किळसवाणा वाटतो. पण सगळ्या शहाणपणाला, विद्वत्तेला नासून टाकणारा तो अहंकार ? तो मात्र छातीशी धरून मिरवावा असं वाटतं ! बाबूराव, अरे अहंकार असल्या लोकांना वेडापिसा करतो. त्यांच्या मानगुटी बसतो. तेराव्या अध्यायात ती ओवी आहे ना, ब्याऐंशी रे... ती वाच.
  बाबूरावांनी ज्ञानेश्वरी आणली, ते वाचू लागले -
"नवल अहंकाराची गोठी। विशेषें न लगे अज्ञानापाठी।
 सज्ञानाचे झोंबे कंठी। नाना संकटीं नाचवी॥८२॥"

  बाबांनो, अनुभूती उगीच येत नाही. अभिमानाचं भूत आधी मानगुटिवरून उतरावं लागतं.
  हंऽ आता नववा अध्याय काढ. वाच त्यातली अठ्ठ्याहत्तरावी ओवी."
  बाबूराव ओवी वाचू लागले -
"म्हणोनि थोरपण पऱ्हां सांडिजे।
 एथ व्युत्पत्ती आघवी विसरिजे।
 जैं जगा धाकुटे होईजे। तैं जवळीक माझी ॥३७८॥"

  "कळलं ?" महाराजांनी पंडितांकडे रोखून पाहत विचारलं. पंडितांच्या डोळ्यावरचा अहंतेचा पडदा दूर झाला. "कळलं... कळलं..." ते खालमानेनं, हात जोडीत म्हणाले, "या गरीब माणसाच्या घरातलं समाधान आणि आपल्यासारख्या सिध्दांचं इथलं वास्तव्य... सगळ्याचा उलगडा झाला. महाराज, चूक समजली."
  "समजली ना ? अरे, मी भोळ्या- भाबड्यांचा, भक्त-भाविकांचा दास आहे. पण गुंडपुंडांचा गुरु आहे. मला अहंकारी लोकांचा तिटकारा आहे. मी त्यांच्या वाऱ्यालाही उभा राहत नाही.
  बोलता बोलताच महाराज उठून उभे राहिले. म्हणाले. "चला... आपल्याला मरगीच्या अड्ड्यात जायचंय."
  महाराजांना घेऊन मंडळी काळ्या जोगेश्वरीजवळच्या एका विडीच्या दुकानात आली. तिथल्या मुसलमान दुकानदाराने सर्वांचं प्रेमाने स्वागत केलं. 
  दुकानाच्या आतल्या बाजूला एका गोणपाटावर एक व्यक्ती बसलेली होती. मळकं धोतर. अंगात नेहरू शर्ट, त्यावर जाकीट. डोक्यावर जुनाट टोपी. तिचे डोळे कुठल्या तरी अज्ञात विश्वात लागलेले होते. देहभान विसरल्यासारखे. त्या व्यक्तीचं नाव होतं, फकीरबाबा.
  महाराज त्यांच्याजवळ जाऊन बसले. त्यांनी त्यांचे दोन्ही हात हातात घेतले. अत्यानंदानं ते मोठ्यानं हसले. फकीरबाबांनी मात्र मंद स्मित केलं. 
  दोन महान सिध्दांची अदभूत भेट घडत होती. महाराजांनी विडी पेटवली. बाबांच्या हातात दिली. रावसाहेबांनी सिगरेट पेटवून महाराजांना दिली. 
  धूम्रपान करता करता दोघेही एकमेकांकडे पाहून किंचित हसत होते. शब्दावाचून संवाद घडत होता. मौनातून भाव संक्रमित होत होता. बोलावाचून अर्थ उलगडत होता.
  थोड्या वेळानं महाराज म्हणाले, "राऊ, ही खरी तूर्यावस्था. सदगुरू स्वामी याला कधी वैखरीवर आणील न कळे. निवृत्तिनाथांनी माझ्या ज्ञानदेवाला अशाच अवस्थेत काही काळ ठेवलं होतं. मग जगाच्या कल्याणासाठी वैखरीवर आणलं. ती वैखरी म्हणजेच ज्ञानेश्वरी."
  "ती काही 'वाचासिद्धी' नव्हती. तर ती वाचाच सिद्ध होती. परा वाचा होती. हा फकीरबाबा बोलू लागला तर तसेच अमृतालाही पैजा जिंकणारे बोल हा बोलेल."
  फकीरबाबांची विडी संपत आली होती. उरलेलं थोटुक त्यांनी तोंडातच टाकलं.
  दुकानाच्या मालकानं सांगितलं की ते बोलतच नसत. फळं समोर ठेवली तर सालीसकट आतल्या बियांसकट खात. कुणी काही दिलं तर घेत. एवढंच.
  सर्वांना नवल वाटलं की, या दोन सिध्दांची भेट झाली खरी, पण दोघे एकमेकांशी एक शब्दही बोलले नाहीत. अशी कशी ही भेट ? कुठल्या माध्यमातून घडला असेल त्यांचा संवाद ?.....क्रमशः ...

*⚪ लेखन: श्रीमती मृणालिनी जोशी⚪*

Tale 31

*⚪🍁⚪पुष्प = {६७},⚪🍁⚪*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची....*

  महाराजांचा संचार कुठेही असायचा. त्याला स्थळकाळाचं बंधन नसायचं. शोधायला जावं तर सापडायचे नाहीत, नाहीतर ध्यानीमनी नसताना अचानक 'दत्त' म्हणून समोर उभे राहतील.
  त्या दिवशी ते पुण्यात आलेत असं कळलं म्हणून बापू त्यांचा शोध घेत निघाला. ते शनिपाराजवळच्या पटवर्धनवाड्यात मोतीवाले लागू यांच्या घरी त्याला भेटले.
  श्री. लागूंची जागा प्रशस्त होती. त्यांचं दुकान दिवाणखान्यातच होतं. तिथे गिऱ्हाइकांना बसण्यासाठी लहान लहान गाद्या आणि लोड मांडून ठेवलेले होते. महाराज त्यातल्याच एका लोडाला टेकून ऐसपैस बसले होते. त्यांच्यासमोर पांढरंशुभ्र तलम धोतर आणि त्यावर तसाच पांढरा सदरा घालून श्री. लागूही बसले होते. त्यांच्यापासून थोड्या अंतरावर राखी रंगाची शेरवानी घातलेले, डोक्यावर फरची गोल टोपी असलेले आणि विड्यानं तोंड रंगलेले खानसाहेब बसले होते.
  खानसाहेब हे सिटीपोस्ट चौकातल्या डेक्कन वाँच कंपनीचे मालक होते. त्यांची आणि महाराजांची पहिली भेट मेहेंदळे वाड्यात झाली होती. रावसाहेबांचे मित्र नूरी हे खानसाहेबांचेही मित्र होते. खानसाहेब एकदा त्यांना म्हणाले, "आपल्या धर्मात सांगितलं आहे ते ते मी सगळं नीट करतो. पण मनाला शांती लाभत नाही. अस्वस्थ वाटतं. काय करावं ?"
  "असं ? मग चल, मी तुला एका अवलियाकडे घेऊन जातो. ते करतील तुझं समाधान."
  ते दोघे वाड्यात गेले तेव्हा महाराज आठ-दहा माणसांच्या कोंडाळ्यात बसले होते. खानसाहेबांकडे पाहताच ते एकदम ओरडले, "ए मुसलमाना ! पळ इथून, बसू नकोस. बोल, तू खरा मुसलमान आहेस ? गुरु केला आहेस? नमाज पढतोस ?" 
  या सरबत्तीनं खानसाहेब गोंधळले. त्यांना भीतीनं घाम फुटला. चारचौघांत असा अपमान झाला म्हणून राग आला. दु:खही झालं. ते ताडकन परत जायला निघाले, पण नूरीसाहेबांनी त्यांचा हात धरून त्यांना थांबवलं. कारण महाराजांचा राग आपल्या भल्यासाठीच असतो हे त्यांना अनुभवानं कळलेलं होतं. 
  तेवढ्यात महाराजांनी त्यांना जवळ बोलावलं. सौम्य शब्दांत म्हटलं, "तुला हवीय ती शांती मिळेल. नमाज लक्ष देऊन, मन लावून, अर्थ समजून पढत जा. आणि मग मला येऊन भेट.
  खानसाहेब तसे बाहेरून रागावले असले तरी मनातून त्यांना महाराजांच्याविषयी एक प्रकारची अनामिक ओढ लागली. ते काही दिवसांनी पुन्हा महाराजांना भेटले. त्या वेळी मात्र महाराजांनी त्यांचं प्रेमानं स्वागत केलं. त्यांना नमाजातले बारकावे समजून सांगितले. कुराणातल्या काही वचनांचा अर्थ सांगितला. उर्दू आणि पर्शियन भाषेतले उतारे म्हणून दाखवले. त्यांच्या निर्गुण उपासनेचं मर्म त्यांना विशद करून सांगितलं.
  खानसाहेब मग महाराजांचेच झाले. त्यांना गुरूस्थानी मानून वरचेवर त्यांचं दर्शन घेऊ लागले. मनातल्या शंका विचारू लागले.
  बापूला आलेला पाहिला तेव्हा महाराजांनी त्याला हातानेच 'ये. बस.' असं खुणावलं. बापूनं त्यांना नमस्कार केला आणि तोसुद्धा त्या सर्वांची चाललेली चर्चा ऐकत एका कडेला बसला.
  महाराज बोलत होते. त्यांचं बोलणं चटकन कळत नसे. अगदी लक्ष देऊन ऐकावं लागे. शिवाय एखादा विषय सलगपणानं सांगत नसत. थांबून थांबून सांगत. पण जे सांगत ते महत्त्वाचं असे. त्यातल्या शब्दांची फोड करून त्यातून अगदी वेगळाच अर्थ लावून दाखवीत.
  महाराज म्हणत होते, "अरे खानसाहेब, नमाज पढणारा खरा नमाजी कोण ? उभा-आडवा वाकतो तो ? नाही. नाही. ज्याला कुठल्याही कृतीचा माज नसतो, 'हे मी करतो आहे' असा ज्याला अहंकार नसतो तो नमाजी. माझ्या हातून जे घडतं ते सर्व 'अल्लाच' करतो असं ज्याला वाटतं, जो अल्लाच्या मर्जीनं वागतो, तो नमाजी. अल्लाशी एकरूप झालेला, अकर्ता."
  "महाराज" , लागूंनी विचारलं, "आपल्या धर्मातसुद्धा असे नमाजी असतीलच ना ?"
  "हो... हो... असे अनेक नमाजी आहेत आपल्यात. जो शिष्य गुरूशी एकरूप होतो, त्याला सर्वस्व अर्पण करतो, जो स्वतः उरतच नाही तो आपला नमाजी. 
  महाराजांच्या या बोलण्यावर सर्वजण विचार करीत असतानाच महाराज म्हणाले, "अरे, चहा आणा... चहा आणा!"
  महाराज आनंदात असले की असा चहा मागत. लहान मुलासारख्या जवळच्या माणसांच्या खोड्या काढीत. हसत. आत्ताही ते तशाच लकेरीत होते.
  बापूकडे बघून महाराज लागूंना म्हणाले, "तुम्हांला माहित आहे का? हा बाप्या. आमच्या बेबीच्या वाड्यातला. काय रे तू इकडे कसा आलास ?"
  "तुमचं दर्शन घ्यायला आलो, महाराज."
  "हात् वेड्या! तुझा आदिनाथ तुझ्याजवळ आहे ना ? त्याचं दर्शन घे. आतलं दर्शन घे. त्याला ओळख. बाहेरच्या आदिनाथाला-शंकराला भुरू नकोस!"....क्रमशः ...

 *लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी*

Tale 30

 *🍁🔆पुष्प = {६६},🔆🍁*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची....*

      क्रमशः ....

  वाड्यात खालच्या बिऱ्हाडात राहणाऱ्या पुणेकर वहिनींची महाराजांवर खूप श्रद्धा होती. महाराजांनी त्यांना आपल्या सामर्थ्याची अनेकदा प्रचिती दिली होती. दर्शनं दिली होती. त्यांचे यजमान वारले तेव्हा ते त्यांच्या विसाव्या दिवशी वहिनींच्या घरी पहिल्यांदाच गेले. त्यांना बघून वहिनींना दु:खावेग आवरेना. पदरी तीन मुलं, कसं होईल त्यांचं ? या विचारात त्यांना चैन पडत नव्हती. पण महाराज त्यांचं सांत्वन करीत म्हणाले होते, 'कसली चिंता करू नकोस, आई. तुझी मुलं चांगलं शिकतील. सुस्थितीत राहतील. हे सांगायलाच आम्ही आलो आहोत. आज विसाव्या दिवशी तुला विसावा द्यायला आलो आहोत."
  त्या दिवसापासून पुणेकर वहिनी सर्व भार महाराजांवर टाकून निश्चिंत राहू लागल्या. ते वाड्यात आले की त्यांच्या सेवेला येऊ लागल्या. 
  आत्ताही त्या त्यांच्यासाठी चहा आणि कांद्याची भजी घेऊन वर आल्या. त्यांना पाहताच महाराज म्हणाले, "आण... आण... भजी आण. आम्हाला केव्हाच त्यांचा खमंग वास आला होता !"
  "तुम्ही कशाला त्रास घेतलात वहिनी, मी करणारच होते आत्ता चहा!" माई म्हणाल्या.
  "आम्हालाही घडू द्या ना थोडी सेवा! आणि त्रास कसला यात ?"
  असं म्हणत वहिनींनी महाराजांना भजी दिली. चहा पाजला. बापूलाही चहा, भजी दिली.
  तेवढ्यात तिथे दोन-तीन माणसं आली. महाराज जिथे कुठे असतील तिथे त्यांचा माग काढीत माणसं यायचीच - फुलातला मध घ्यायला मधमाशा येतात तशी.
  त्यांतल्या एकानं महाराजांना नमस्कार करून म्हटलं, "महाराज, आपल्या आशीर्वादानं मुलीचं लग्न निर्विघ्न पार पडलं."
  "पडलं ना ? मग आता कशाला आला आहेस ?"
  "आपल्यासाठी कपडे शिवायचं मनात आहे. एक पायजमा आणि शर्ट. हा शिंपी आणलाय. फार चांगले, अगदी अंगाबरोबर बेतशीर कपडे शिवतो. कधी घट्ट व्हायचे नाहीत की कधी ढगळे व्हायचे नाहीत." मग तो शिंप्याला म्हणाला, "घे रे, महाराजांचं माप घे लवकर."
  "असं ? हा आमचं माप घेतोय ? घे म्हणावं. बरोबर घे."
  शिंपीदादा टेप घेऊन महाराजांची मापं घेऊ लागला. आणि पार चक्रावून गेला. पुन:पुन्हा त्यांची उंची मोजू लागला. कोठ्याचं माप, हाताची लांबी, कारण दरवेळी वेगळंच माप यायचं. कधी सव्वीस इंच, कधी एकवीस तर कधी बत्तीस इंच. बिचारा अगदी रडवेला झाला.
  महाराज मोठ्यानं हसले. म्हणाले, "आमच्या कपड्यांचं राहू दे. गरज लागली की सांगू आम्ही. पण उद्या समर्थ मठात जाऊन तू गुरूदेवांना एक अभिषेक कर, म्हणजे सगळं पावलं आम्हाला."
  तो निघून गेल्यावर महाराजांनी दुसऱ्या माणसाला त्याच्या येण्याचं कारण विचारलं. तो म्हणाला, "गाणगापूरी जाऊन गुरूचरित्राची तीन पारायणं करायची इच्छा आहे."
  "कशासाठी ?"
  "अवधूताचं दर्शन घडावं म्हणून."
  "भडव्या! दत्तगुरु काय तुझ्या बापाचे नोकर आहेत ? आणि काय रे भोसडीच्या, गाणगापूरपर्यंत जायला पैसा तरी आहे का खिशात ?"
  महाराज दर वाक्यागणिक शिव्या देत होते. आणि दोन शिव्या देऊन झाल्या की म्हणत, 'श्री गुरूदेवदत्त ! श्रीगुरूदेवदत्त !!'
  जणू काही त्या शिव्या भक्ताला दत्तगुरुंकडून आलेली प्रसादभेट होती! भक्त म्हणाला, "नाहीत खरे पैसे, पण घेईन कुणाकडून तरी उसने. पण दर्शनाची अगदी तळमळ लागून राहिलीय, महाराज. चैन पडत नाही." हे बोलताना त्याच्या डोळ्यांत खरोखरच पाणी आलं होतं.
  महाराज काही वेळ त्याच्याकडे एकटक पाहत राहिले. मग म्हणाले, "मग पारायणाच्या आधी मला दर्शन द्या असं का म्हणत नाहीस त्यांना ? तुझी पारायणं होईस्तोपर्यंत त्यांनी काय ताटकळत बसायचं होय रे साल्या ?"
  त्या बिचाऱ्याला काहीच समजेना.
  "जा. बाहेरचं दार बंद करून घे."
  त्यानं उठून दार बंद करून घेतलं. आणि मागं वळून बघतो तो काय ? महाराजांच्या ठिकाणी त्याला साक्षात दत्तगुरु दिसले! अत्यानंदानं तो बेभान झाला. ओक्साबोक्सी रडू लागला. धावत येऊन त्यांच्या चरणावर कोसळला. 
  थोड्या वेळानं महाराज त्याला म्हणाले, "पैसा नाही, तर कुठे जाऊ नकोस. इथेच खाली औदुंबराच्या पारावर बसून पारायण कर, पादुकांची पूजा कर. माईच्या वाड्यात ते आहेतच."
  "बरं - आता तुमचं काय ?" महाराजांनी तिसऱ्या गृहस्थांना विचारलं.
  "मी... मी मुलीसाठी स्थळं बघतो आहे. पण कुठे जमतच नाही. ते केव्हा होईल, महाराज ?"
  "आम्ही काय ज्योतिषी आहोत होय? आम्ही त्यातले नाही. माई, तुझ्याकडे महाराजांचा गाथा आहे ना? आण तो."
  माईंनी गाथा आणून त्यांच्यापुढे ठेवला. त्यांनी तो चाळल्यासारखं केलं. काही पानं उलटली. मग ते एका अभंगावर बोट ठेवून म्हणाले, "बापू, वाच हा अभंग."
  महाराजांची ही एक विशिष्ट पद्धत होती. प्रश्न विचारणाऱ्या माणसाच्या वृत्तीप्रमाणे ते त्याच्या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्ष न देता असं समोरच्या एखाद्या ग्रंथातला उतारा वाचून देत. नवल म्हणजे त्यांना जी अपेक्षित असते ती ओवी, तो अभंग, किंवा तो मजकूर ते नेमका काढून देत. ज्ञानेश्वरीतल्या आणि भागवतामधल्या ओव्यांचे क्रमांक सांगत. 
  बापूनं अभंग वाचला. तुकाराम महाराज म्हणत होते -
"भूत-भविष्य वर्तमान। सांगी जाणती शकुन।
 आम्हा त्याचा अवघाचि कंटाळा ॥"
  "ऐकलंस ना ?"
  "होय. पण आपण आशीर्वाद दिलात तर होईल लवकर. आपल्या तोंडून निघेल त्या दिवशी होईल."
  "असं म्हणतोस ? मग 'मी' मेल्यावर होईल तुझ्या लेकीचं लग्न !"
  त्यानं चमकून महाराजांकडे पाहिलं. हे काय विपरीत बोलणं ! म्हणजे आता माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी त्यांच्या मरणाची का वाट पाहायची? 
  त्याची गोंधळलेली आणि धास्तावलेली मुद्रा पाहून बापूला राहवेना. तो त्याला म्हणाला, "तसं नव्हे, दादा. तुम्ही समजता आहात तसा अर्थ नाही महाराजांच्या म्हणण्याचा."
  "मग ?"
  "त्यांना म्हणायचं आहे की, 'तुम्ही जे माझी मुलगी, मी तिचं लग्न जमवतो आहे, मी त्यासाठी खटपट करतो आहे असं सारखं 'मी' आणि 'माझं' म्हणत बसला आहात ना, हा तुमच्यातला 'मी' , 'मी' करणारा अहंकार 'मेला' पाहिजे. तो गेला की होईल तिचं लग्न. लग्नाच्या गाठी वरतूनच बांधलेल्या असतात. आपण कोण त्या जमवणारे ? केवळ लग्नाचंच नव्हे, तर सगळंच त्याच्या इच्छेनं घडत असतं. तुम्ही कर्तेपणा स्वतःकडे न घेता त्याच्या मर्जीवर सर्व सोडून निवांत रहा. असं महाराज तुम्हाला सांगत आहेत."
  "वा ! बाप्या वा ! हरिनाथबाबांनी चांगलाच तयार केलाय हा चेला !" महाराज कौतुकानं हसत म्हणाले, "तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे. पण खरा भक्त नुसता मीपणा आणि कर्ताभाव टाकून थांबत नाही. तो 'लोकलाज' ही सोडतो. लोकनिंदेची पर्वा न करता एखाद्या प्रेयसीसारखा प्रियतम परमेश्वराच्या प्रीतीरसात रंगून जातो. अभिसारिका होतो. प्रेमभक्तीच्या कैफानं धुंद होऊन जातो.
  मद्यानं येणारी धुंदी काही काळानं उतरते. पण ही धुंदी एकदा चढली की कधीच उतरत नाही..... क्रमशः ...

*‼ लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी‼*

Tale 29

 *🔆🔆पुष्प = {६५},🔆🔆*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची....*

  त्या पहिल्या भेटीनंतर महाराजांनासुद्धा यल्लूबाईंचा लळा लागला. ते लहर आली की त्यांच्या घरी जात. त्यांच्याकडून गाणी म्हणवून घेत.
  बापूला आता हे सगळं कळलं होतं. माईंकडे जायला त्यालाही आवडू लागलं होतं. आणि त्यातलं एक कारण होतं की, माई त्याला इतरांसारखं 'बापू' न म्हणता 'नाथा' म्हणत.
  परंतु माईंची ओळख नसताना महाराज पहिल्यांदा जेव्हा त्याला म्हणाले की, 'बाप्या, यल्लूमाईकडे जायचंय. दाणेआळीत. चल, माझ्याबरोबर.' तेव्हा तो गोंधळून जागच्या जागीच उभा राहिला होता. दाणे आळीत ? आणि तेही एका बाईकडे ? त्याला ती कल्पनासुद्धा कशीशीच वाटली. पण त्याला 'नाही, होय' करायला वेळच मिळाला नाही. तिथे असलेले पोस्टखात्यात नोकरी करणारे महाराजांचे एक भक्त रामभाऊ रानडे त्याला म्हणाले, "बापू, तू एक हात धर महाराजांचा, मी दुसरा धरतो."
  बापू निघाला खरा, पण मनातून अस्वस्थच होता. त्याला भीती वाटत होती की आपल्याला दाणे आळीत जाताना कुणी ओळखीच्या माणसानं पाहिलं तर ? घरी जाऊन सांगितलं तर ? 
  त्या वेळची आपली मनस्थिती आठवून बापूला आता हसू आलं. त्याच्या मनात आलं की, मधल्या काळात महाराजांच्या सहवासानं आपल्यात किती बदल झाला ! लोक काय म्हणतील याची भीती नाही उरली.
  याच विचारात त्यानं सायकल बाहेर काढली. पुढच्या दांडीवर पोत्याची घडी टाकली. महाराजांना त्यावर बसवलं आणि ते दोघं रस्त्याला लागले. आर्यन सिनेमागृहावरून रामेश्वर चौकात तो बाजूला वळला. तेव्हा महाराजांनी त्याला म्हटलं, 'आता दगडूशेट दत्त मंदिराकडून चल." बापूनं 'होय' म्हणून सायकल त्या दिशेनं वळवली. देवळाजवळ येताच महाराज पटकन उडी मारून खाली उतरले आणि रस्त्याच्या मधोमध जाऊन बसले. बापूला काहीच कळेना.
  रस्त्यानं येणारी-जाणारी वाहनं त्यांच्यामुळे अडू लागली. कुणी म्हणालं, 'अरे, कोण हा वेडा ? असा मधोमध काय बसलाय फतकल घालून ?'
  तर कुणी तिथेच थांबून या विक्षिप्त म्हाताऱ्यानं वाहता रस्ता कसा बंद पाडलाय ते मजेनं पाहत होते.
  'अरे, हा कोण ? कुणी आणलं याला इथे ?" अशी चौकशीही सुरू झाली.
  बापू सगळं ऐकत होता. पण करणार काय ? तो बिचारा सायकल रस्त्याच्या एका बाजूला लावून उभा होता. त्याला घाम फुटला होता. चिडलेल्या लोकांनी आपल्यालाच मारलं तर ? 
  अर्धा तास झाला. हा प्रकार चाललेलाच होता. 
  मंगळवार पेठेत असलेल्या आखाड्यात आज कुस्त्यांच्या चढाओढी होत्या. त्यांत विजयी झालेल्या पहिलवानाची मिरवणूक नेमकी याच रस्त्यानं येऊ लागली. 'कोल्हापूरवाले दटके चलो, दटके चलो' अशा त्यांच्या ललकाऱ्या ऐकू येऊ लागल्या. तेव्हा बापू धीर करून महाराजांजवळ गेला. "पहिलवान येताहेत महाराज, आता तरी उठायला हवं." त्यावर महाराज मोठ्यानं हसले. म्हणाले, "अरे, त्यांच्यासाठीच तर आम्ही इथे थांबलो आहोत ना एवढा वेळ !"
  तेवढ्यात मिरवणूकीच्या पुढे आलेले काही मल्ल बापूला म्हणाले, "काय रे पोरा, तुझा आहे ना हा म्हातारा ? त्याला बाजूला ने ना !"
  "ते उठत नाहीत."
  तोच दुसरा मल्लही ओरडला, "अरे, हटाव बुढ्ढे को ! हटाव !!"
  "माझ्याच्यानं नाही उठवत. तुम्हीच उठवा."
  "अच्छा ! आत्ता उचलून ठेवतो त्याला तुझ्या सायकलीवर." असं म्हणत तो महाराजांना उचलू लागला, पण महाराज तूसभरही हलले नाहीत. एक, दोन, तीन - एकापाठोपाठ सर्व मल्लांनी प्रयत्न केला, पण महाराज जसे जडशीळ होऊन जमिनीला खिळून राहिले होते.
  शेवटी तो मिरवीत येणारा विजयी मल्लही तिथवर येऊन पोहोचला. त्याला हा प्रकार कळताच तो पहिलवानांची कुचेष्टा करीत म्हणाला, "एका पांगळ्या थेरड्याला उचलता येत नाही, कशाला रे तालीम करता ? त्यापेक्षा बांगड्या भरा हातात ! मी बघा कसा मुंगीसारखं देतो त्याला फुंकून! एका चिमटीनं उचलून !"
  महाराज पुन्हा एकदा मोठमोठ्यानं हसले. 
  आता तर तो विजयवीर रागानं लाल झाला. त्यानं महाराजांना दोन्ही हातानं धरलं. पण... पण महाराज रेसभरही हलेनात. त्यांना उचलण्याची गोष्ट तर दूरच राहिली. पुन:पुन्हा प्रयत्न करणारा तो पेहेलवान घामाघूम झाला. सर्वांसमोर होणाऱ्या या फजितीनं लज्जित झाला. त्याच्या आत्मप्रौढीच्या वल्गना महाराजांनी खोट्या ठरवल्या होत्या.
  अखेरीस त्यानं महाराजांचे पाय धरले. म्हणाला, "आपली ताकद मी ओळखली नाही. क्षमा करा."
  "भोसडीच्या! माझी कसली क्षमा मागतोस ? आपल्या गुरूची क्षमा माग. त्याचे पाय धर." आपले तेजस्वी डोळे त्याच्यावर रोखून महाराज कडाडले. "कुस्ती जिंकल्याचा तुला एवढा माज ? गुरूच्या खांद्यावर बसून मिरवीत आलास ?"
  "चुकलं, महाराज."
  "चुकलं ना ? मग चूक सुधार. तू त्याला खांद्यावर घे."
  "जीऽ... जी महाराज. गलती झाली. माफी करा."
  मग महाराजांनी तिथे जमलेल्या गर्दीतल्या एका शाळकरी मुलाला खुणेनं जवळ बोलावलं. तो भीतभीतच महाराजांपुढे गेला. 
  "ये... खाऊ घे." असं म्हणून महाराजांनी खिशातले शेंगदाणे काढून त्याला दिले. 'हं, उठव मला."
  त्या मुलानं नुसता हात धरला आणि महाराज उठले. म्हणाले, "चल बाप्या! झालं आपलं काम !"
  बापूनं सुटकेचा निश्वास टाकला. मग ते दोघे यल्लूबाईंच्या वाड्यात खालच्या बाजूला काही बिऱ्हाडकरू राहत होते. वरच्या मजल्यावर माई आणि त्यांची वृद्ध आई, दोघी राहत होत्या. वाड्यात मागच्या बाजूला एक औदुंबराचा वृक्ष होता. त्याच्या छायेत दत्तपादुकांची स्थापना केलेली होती. जवळच एका लहानशा देवळीत दिवा तेवत होता.
  माडीवर बैठकीच्या जागी समोरच श्रीदत्तगुरू आणि श्रीशंकर यांच्या मोठ्या तसबिरी होत्या. त्यांना सुवासिक हार घातलेले होते. त्यांच्या उजव्या बाजूला तानपुऱ्यांची नक्षीदार देखणी जोडी होती.
  'माईऽ... माईऽ...' अशा मोठ्यानं हाका मारीतच महाराज आत आले. 
  यल्लूबाई लगबगीनं बाहेर आल्या. त्यांना पाहताच, 'आम्ही आलो माई, आम्ही आलो' असं म्हणत महाराज एखाद्या बालकासारखे त्यांना एकदम बिलगलेच. आणि आपला पराक्रम अभिमानानं आईला सांगावा तसं म्हणाले, "आज आम्ही एका पैलवानाला शहाणा करून आलो. त्याला धडा शिकवून आलो."
  त्यांना थोपटीत माईंनी मोठ्या मायेनं म्हटलं, "होय ? असं केलंत ? छान केलंत! पण कसा धडा शिकवलात ?' 
  "तो विचार या बाप्याला."
  "होय रे, नाथा ? असं काय केलं महाराजांनी ? सांग तरी."
  "मारूतीनं भीमाचा गर्व उतरवला होता ना माई, तस्साच महाराजांनी त्या माजलेल्या मल्लाचा गर्व नाहीसा केला. अगदी दुसरे मारूतीच झाले होते महाराज." असं म्हणून बापूनं तो रस्त्यातला सर्व किस्सा अगदी हावभाव करीत माईंना रंगवून सांगितला. 
  हे सर्व ऐकत महाराज तक्क्याला टेकून पाय पसरून मजेत बसले होते.   मध्येच म्हणाले, "आमचे पाय दाब. पाय दाब."
  माई त्यांच्या पायावरून हात फिरवू लागल्या......क्रमशः ...

*लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी*