*⚪
⚪पुष्प = {५३},⚪
⚪*
*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*
ब्रऱ्हाणपूरहून परत आल्यावर डॉक्टरांनी ही सर्व हकिगत महाराजांना सांगितली. म्हणाले, "मला एक कोडं पडलंय."
"कसलं रे, बाबा ?"
"आजी म्हणाल्या, 'तुम्ही त्यांना भेटलात तेव्हा वृध्द होतात. मग तुम्ही आता आहात तरी किती वर्षांचे ?"
महाराज हसत हसत म्हणाले, "तूच सांग ना आमचं वय. तुझ्या डाँक्टरी शास्त्रात माणसाचं वय ओळखायच्या खुणा असतात. होय ना ?"
डॉक्टरांनी होकारार्थी मान हलवली आणि खरोखरच त्यांची तपासणी केली. मग थोडा विचार करून म्हणाले, "मला वाटतं, तुमचं वय सव्वाशेहून जास्त असावं."
"कशावरून ?"
"आमच्या शास्त्रात लिहिलंय की शंभर वर्षांनंतर माणसाच्या सांध्यांची हाडं काही विशिष्ट प्रकारानं वाढतात. त्याच्या जिभेची लांबी वाढते. दातांचे कोन बदलतात. हे सगळं तुमच्या शरीरात झालेलं आहे. हं, आता सांगा, आमचं उत्तर चूक की बरोबर ?
"बरोब्बर! आम्ही पेशवाईची अखेर पाहिली आहे. शनिवारवाड्यात जाऊन खाशा पंगतीत भोजन केलं आहे. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या हातून दक्षिणासुध्दा घेतली आहे."
महाराज थोडा वेळ गप्प राहिले. जणू गतकाळाच्या चित्रपटच त्यांना दिसत होता. मग एकदम टाळी वाजवून म्हणाले, "अरे डॉक्टर, पेशवाईला गिळणाऱ्या त्या गोऱ्यांच्या देशातही आम्ही जाऊन आलो आहोत ?"
"काय सांगता काय, महाराज ? तुम्ही इंग्लंडला गेला होतात ?"
"होय. इथे एक इंग्रजी कलेक्टर होता. त्याला आम्ही इथून त्याच्या इंग्लंडच्या घरातल्या काही गोष्टी दाखवल्या. त्या खऱ्या ठरल्या. मग त्याचा आमच्यावर इतका विश्वास बसला की, तो आमचा शिष्य बनला. तसं आम्ही त्याला शिकवलं म्हणा काहीबाही. त्यानं आम्हाला आपल्या देशात नेलं होतं. युरोपातले इतर काही देशही पाहिले आम्ही त्या वेळी.
"हंऽ म्हणून तुम्ही अस्खलित इंग्रजी बोलता. अगदी साहेबी थाटात... तोंडातल्या तोंडात!"
"तेवढंच कारण नाही डॉक्टर, "महाराज गंभीर होऊन म्हणाले, "या शब्दब्रह्माचाच नव्हे, तर या विराट विश्वाचा उगम ज्या परमतत्त्वातून होतो ते मूळ तत्त्व जर आपण जातलं, त्याच्याशी एकरूप झालो तर आपल्याला कुठलीही भाषा येते. माणसांचीच नव्हे, तर पशुपक्ष्यांची, झाडामाडांची, अणुरेणूंची. आपल्याला जड वाटणाऱ्या वस्तूतही दडून राहिलेली चैतन्याची स्पंदनं आपल्या हृदयात उमटतात. मग ती शब्दभाषा उरत नाही. ती होते भावभाषा. आणि तिच्यामधून आपल्याला अवघ्या अस्तित्वाशी संवाद साधता येतो."
डॉक्टर लक्ष देऊन ऐकत होते. विचार करीत होते.
जरा थांबून महाराज म्हणाले, "हे केवळ भाषेचंच नव्हे डॉक्टर, जो परमात्मास्वरूप होतो ना, तो दिक्कालाच्या म्हणजे स्थळकाळाच्या सीमेपलीकडे जातो. ते त्रिकालज्ञानी होतात. त्यांची गती सर्वत्र असते. सर्वकालीन असते. श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला म्हणतो की हेच ज्ञान मी फार पूर्वी विवस्वानाला-सूर्याला सांगितलं, किंवा रामकृष्ण परमहंस म्हणतात, 'जो राम, जो कृष्ण, तोच रामकृष्ण!' या त्यांच्या घोषणा सत्यच असतात. त्यांचं हे भाष्य एका वेगळ्याच पातळीवरचं असतं."
"पाणी जसं नव्याण्णव अंश डिग्रीपर्यंत उकळतं पाणीच असतं. पण ते शंभर अंश डिग्रीला पोचलं की त्याचं रूपांतर होतं. त्याची वाफ होते. त्याची व्याप्ती वाढते. स्थूलातून ते अतिसूक्ष्मात जातं. आकाशाची विशालता आणि विराटता त्याला प्राप्त होते. आत्मस्वरूपी लीन झालेल्या, देहामनाच्या सीमा ओलांडून, अवघ्या अस्तित्वात विरून गेलेल्या महात्म्यांची अशीच काहीही अवस्था असते. कारण त्यांच्या चित्ताचं चैतन्य झालेलं असतं."
हे सारं ऐकून डॉक्टरांच्या मनात आलं की, महाराजही जेव्हा सांगतात की, 'माउलीनं रेड्याच्या तोंडून वेद बोलवले तेव्हा आम्ही तिथेच होतो.' 'माउलींची शोभायात्रा निघाली तेव्हा आम्हीसुद्धा त्यांच्या पालखीचा दांडा थोडा वेळ धरला होता', तेव्हा तेही याच समयातील अवस्थेतून बोलत असले पाहिजेत. आम्हांला कळत नाही म्हणून ती विधानं अतर्क्य वाटतात. अशक्य वाटतात. माझ्या चित्ताचं असं चैतन्य कसं होईल ? केव्हा होईल ?"
"होईल. होईल. खचित होईल." डॉक्टरांनी उघड न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत महाराज म्हणाले, "सदगुरूकृपेनं तुला त्याची अनुभूती येईल. सदगुरूला सर्वार्थानं शरण जाणं एवढंच आपलं काम.
"ओहळे हेंचि करावे। जे गंगेचे अंग ठाकावें।
मग तो गंगा जरी नोहावे। तैं तो काय करी ?॥" { ज्ञा. १८।१७७८}....क्रमशः ...
*_लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी_*
No comments:
Post a Comment