Monday, 14 January 2019

Tale 15

 *⚪🌹⚪पुष्प = {५२}⚪🌹⚪*,

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*


  डॉक्टरांना माहित नव्हतं, पण डॉक्टर महाराजांच्या कुपाछत्राखाली पूर्वीपासूनच होते. महाराज त्यांच्या कल्याणासाठी झटत होते. त्यासाठी कुठून कुठून सुत्रं हलवीत होते.
  डॉक्टरांचं लग्न झालं तेव्हाची गोष्ट. वरवर पाहता लग्न अगदी सहजरीत्या जमलं होतं. डॉक्टर भावाच्या लग्नाला इंदूर संस्थानातल्या मंडलेश्वर या गावी गेले होते. त्या लग्नाला बऱ्हाणपूरचे प्रख्यात वकील श्री रामभाऊ पाठक आले होते. त्यांनी तिथे डॉक्टरांना पाहिलं. गोरीपान तजेलदार अंगकांती, गोल सुंदर चेहरा, अथांग समुद्रासारखे निळसर घारे डोळे, त्यांत असलेली प्रखर बुध्दिमत्तेची तेजस्वी दीप्ती आणि सुदृढ अशी देहयष्टी. वकीलसाहेबांच्या मनात हा उमद्या व्यक्तीमत्वाचा तरून एकदम भरला. त्यांच्या उपवर मुलीला ते असाच वर शोधीत होते. त्यांनी डॉक्टरांच्या वडिलांना विचारलं. भाऊनीही लगेच होकार दिला. कारण पाठक चांगले सुखवस्तू गृहस्थ आहेत, जमीनदार आहेत, चार गावांची मालगुजारी त्यांच्याकडे आहे हे भाऊंना माहित होतं. 
  डॉक्टरांना विचारलं तेव्हा ते मात्र स्पष्टपणानं म्हणाले, "आपल्याला माहित आहे ना की आमची परिस्थिती तशी बेताचीच आहे. आपल्यासारख्या श्रीमंताची मुलगी -"
  "तिथे आनंदातच राहिल." डॉक्टरांचं वाक्य मधेच तोडीत वकीलसाहेब म्हणाले, "आणि आपल्यासारखा होतकरू हुषार डॉक्टर आपल्या विद्येच्या बळावर परिस्थिती निश्चित बदलून टाकील. लक्ष्मी पाणी भरील माझ्या मुलीच्या घरी. तुम्ही ती चिंता सोडा. आमची मुलगी पसंत आहे की नाही तेवढंच बोला."
  "मला पसंत आहे. पण मुलीलाही विचारलं पाहिजे."
  "ते विचारतो आम्ही."
  मुलीनंही होकार दिला. लग्न असं झटपट ठरलं आणि चार दिवसांत श्री पाठकांच्या बऱ्हाणपूरच्या भल्यामोठ्या वाड्यात वसंतपंचमीच्या मुहूर्तावर थाटामाटानं संपन्नही झालं. पाठकांची तारा 'रमा' होऊन डॉक्टर नागेश धनेश्वरांच्या घरी त्यांची गृहलक्ष्मी होऊन आली. 
  लग्नानंतर महाराजांची भेट झाली तेव्हा त्यांनी डॉक्टरांच्या पाठीवर थाप मारून विचारलं, "काय डॉक्टर, झालं ना बाबूच्या मुलीशी लग्न ?"
  "म्हणजे वकीलसाहेबांना ओळखता तुम्ही ? त्यांचं बाबूराव नाव तुम्हाला कसं माहीत ?"
  महाराज मनापासून हसले. म्हणाले, "त्यालाच काय, त्याच्या आईलाही मी चांगलं ओळखतो. बाबू नाही ओळखायचा, पण त्याची आई बरोबर ओळखील. तू दिवाळसणाला जाशील ना तेव्हा माझा फोटो दाखव तिला."
  डॉक्टरांनी लक्षात ठेवून सासुरवाडीला गेल्यावर महाराजांचा फोटो आजींना दाखवला. त्यांनी त्याच्याकडे निरखून पाहत विचारलं, "अप्पाजी, ह्यांची तुमची कुठली ओळख ? अहो, हे बाबा फार वर्षांपूर्वी आपल्या घरी आले होते. बाबू लहान असताना."
  आजी जरा थांबल्या. मग जणू त्या काळात गेल्यासारखं थोडं स्वगत बोलावं तसं म्हणाल्या, "बाबू असेल त्या वेळी सात-आठ वर्षांचा. एक दिवस शाळेतून आला तो तापानं फणफणतच. मी घरगुती उपाय केले, वैद्याचं औषधही आणलं. पण ताप उतरेना. दुखण्याचा जोर वाढतच गेला. एकदम डोळे पांढरेच केलेन् त्यानं. मी काकुळतीनं देवाला साकडं घातलं. बाबूला मांडीवर घेऊन घेऊन ओक्साबोक्सी रडत म्हटलं -
  "दत्ता दिगंबरा, माझं आयुष्य दे माझ्या लेकराला. काही कर, पण माझ्या बाबूला बरं कर."
  तेवढ्यात एक म्हातारासा माणूस दारातून सरळ आत आला. 
  "कोण तुम्ही ? काय हवंय तुम्हाला?" मी त्याला असं विचारताच आपलं नावगाव न सांगता त्यानं म्हटलं, "इथे आजारी कोण आहे ?"
  "माझा हा मुलगाच फार आजारी आहे होऽ - तुम्ही वैद्यराज आहात का? असलात तर याला वाचवा."
  "बघतो मी." असं म्हणत त्यानं खिशातून एक पुडी काढली. पाण्यात विरघळवली. आणि त्यानं ती बाबूला स्वतःच्या हातानं पाजली. मग त्याच्या सर्वांगावरून हात फिरवीत तो म्हणाला, "याला उद्यापर्यंत बरं वाटेल.
  "अप्पाजी, मला त्यांचे आभार कसे मानावेत ते कळेचना. मी आपले त्यांचे पाय धरले. म्हटलं, "देवासारखे धावून आलात आपण. मी आपले उपकार कधी विसरणार नाही. आपण कोण ? कुठले ? आपलं नाव काय ?"
  "आमचा संचार सर्वत्र आहे, आई. आणि नावच विचाराल तर ते तुमच्या नातजावयाकडून कळेल तुम्हांला. या मुलाचीच मुलगी आमच्या घरात येणार आहे." असं म्हणून ते निघून गेले.
  "त्या देवमाणसाच्या दयेनं माझा बाबू वाचला. आमच्या तारीचं लग्न झालं तेव्हाच माझ्या मनात आलं की आता तुमच्याकडून त्या प्राणदात्याचं नाव मला कळेल. सांग रे बाळा, हे कोण ? यांचं नाव काय ? हे तुमच्या घरचे कोण ?"
  आजी भरभरून बोलत होत्या. एकामागून एक प्रश्न विचारीत होत्या. डॉक्टर महाराजांच्या या लीलेचा विचार करीत गप्प उभे होते. आजींनी पुन्हा विचारलं, "अप्पाजी, सांगा ना. हे तुमच्या घरचे कोण ?"
  "हे आमच्या घरचं दैवत आहे, आजी. त्यांचं नाव शंकरमहाराज."
  "मला म्हातारीला भेटतील का हे ? त्यांना म्हणावं, मी त्यांची वाट पाहतेय."
  "होय. तुमचा निरोप सांगतो मी त्यांना. हा त्यांचा फोटो इथेच राहू दे तुमच्याजवळ. त्यांनी कृपा केली तर या फोटोतूनही त्यांचं दर्शन घडेल तुम्हाला."
  आजींनी फोटो हातात घेतला. पदरानं पुसला. आणि भरल्या डोळ्यांनी मस्तकाला लावला..... क्रमशः ...

 *_लेखन  : श्रीमती मृणालिनी जोशी_*

No comments:

Post a Comment