Monday, 14 January 2019

Tale 27

*🐚🐚पुष्प = {६२},⚪🐚⚪*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची....*


  डॉक्टरांची ध्यानधारणा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास, चिंतन-मनन सर्व नियमितपणानं चाललं होतं. आता आठव्या अध्यायाचं वाचन सुरू होतं. या अध्यायाचं नाव आहे परब्रह्मयोग. अक्षरब्रह्मयोग. अलिकडे पहिल्यासारखे महाराज त्यांच्या समोर बसून अर्थ सांगत नसत. तर हा गुरु-शिष्यांचा संवाद आता शब्दावाचून होत असे. डॉक्टरांचा गुरु. त्यांच्या अन्तर्यामी बसून गूढ अर्थाची उकल करून देई. गुरु-शिष्य मौनाच्या भाषेत बोलत. एखादी ओवी अडल्यासारखी वाटली तर जरा स्वस्थ बसताच त्यातील अर्थ आपोआप आतून स्फुरत असे. प्रयाणकाळासंबंधीच्या ओव्यांचं स्पष्टीकरण असंच मनोमनी कळलं. त्यांना जाणवलं की अधिदैव ही जीवावस्था. अधियज्ञ ही त्याच वस्तूची ज्ञानजागृती आणि यानंतरची अवस्था आहे शिवावस्था.
  प्रयाणकाळाचं वर्णन वरवर दिसतं तसं देहाच्या मृत्यूविषयी नाही, तर त्यात देहभावाच्या लयाविषयीचं रहस्य लपलेलं आहे. आपलं मरण आपल्याच डोळ्यांनी पाहण्याचा तो एक अलौकिक सोहळा आहे. देहभावाचा लोप करणाऱ्या गुरुकृपेचा उदयकाळ इथे दाखवला आहे. परतत्त्वाचं अधिष्ठान प्रगट होण्याचा हा काळ, आदिमायेच्या प्रेमळ बोलांनी प्रगट केला आहे.
"तैं देह झोळु ऐसे मानुनी। ठेले आपणपें होउनी।
 जैसा मठ गगना भरौनी। गगनींची असे ॥८-६०॥"
 इये प्रतीतीच्या माझिंघरीं। तेयां निश्चयाचि ओहिरी।
 आली म्हणौनि वाहिरी। नव्हेचि से॥८-६१॥"

  'माझिंघरीं' म्हणजे हृदयाच्या अधिष्ठानामध्ये. 'ओहिरी' म्हणजे कुळस्वामिनीचं देवघर असलेली अंबारी. हृदयाच्या शिवशक्तिच्या अधिष्ठानी गेल्यावर जिवाला बाहेरचं कसलंही स्मरण राहत नाही. तो अन्तर्बाह्य ऐक्यरसानं अद्वयत्वानं भारून जातो. प्रेमभावानं पूर्णत्वात नांदू लागतो. याच्यावरचा 'अहम्' चा कलंक दूर होतो. त्याचा 'घट' ज्याचा ठाव लागत नाही अशा 'अथावी' डोहात बुडतो. तो अवधूतपदाला येतो.
"तें गा माझें परमधाम। साचोकारें निजधाम।
 हें आंतुवट तुज वर्म। दाविजत असे ॥८-२०३॥"

  असं ओवी १७८ पासून ओवी २०२ पर्यंत हे गुह्य उकलून दाखवलं आहे. 
  'अकाल' म्हणजे परमेश्वराच्या, परमपदाच्या विस्मरणाचा काळ. तर उत्तमकाळ म्हणजे देहात्मभावाचा लोप झालेला काळ. 'मी' पणाचा लय झाल्यावर देह ठेवल्यास जीव संस्काररहित आणि वासनारहीत झाल्यामुळे तत्काळ शिवरूप होतो. कारण तो मुळात शिवरूपच असतो. आत अन्त:करणात ज्ञानाग्नीचा प्रकाश हवा आणि बाहेर देहस्थितीमध्ये आत्मज्ञानाची पहाट असावी.
  चंद्र ही मनाची देवता आहे. मन हे एकत्वरूपी अमृताच्या अनुभवानं जेव्हा प्रसन्न असतं तेव्हा तो त्याचा शुक्लपक्षच असतो. उत्तरायण म्हणजे भगवदभावानं भरलेलं समभाव असलेलं मानस. अशा स्थितीत असलेल्या योग्याला परमपद जिथं सिद्ध आहे, असं स्थान मिळतं. हेच महेशपद. असं जाणं हे 'अर्चिरा' म्हणजे आत्मप्रकाशानं चाललेल्या स्वयंसिध्द मार्गानं जाणं होय.
  मृत्यू होतो तो केवळ देहाचा. मूळ सत्यस्वरूप परमात्मा असतोच. "तरी आता देह असो अथवा जाओ। आम्ही तंव वस्तुचि केवळ आहो॥२४८॥" असा ज्याला बोध झाला त्याला या मार्गांची विवंचना करण्याचं कारण नाही.
  प्रयाणसोहळ्याचं हे वेगळंच दर्शन घडल्यानं डॉक्टर अचंबित झाले. 'दिपिका' बाजूला ठेवून स्वस्थ बसले. सोऽहं सिद्धी प्राप्त झालेल्या योग्याचं असं अन्तर्बाह्य परमात्मास्वरूप होऊन अन्तर्धान पावणारं दिव्य मरण त्यांच्या मिटल्या डोळ्यांपुढे तरळू लागलं. ते त्यात हरवून गेले.
  असा किती वेळ गेला कोण जाणे, पण त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांना त्यांच्यासमोर महाराज बसलेले दिसले - त्यांच्या आवडत्या विशिष्ट मुद्रेत ! गळ्याशी घातलेल्या पायांना आपल्या 'अजानुबाहू' हातांची मिठी घालून, आपल्या विशाल डोळ्यांनी डॉक्टरांकडे करूणार्द्र दृष्टीनं पाहणाऱ्या महाराजांना पाहून डॉक्टरांनी आश्चर्यानं विचारलं, "महाराज ? तुम्ही ? तुम्ही केव्हा आलात ?"
  महाराज थोडा वेळ अगदी स्तब्ध राहिले. मग म्हणाले, "आम्ही आलो तू योग्याची समाधी बघत होतास तेव्हाच ! पण हे बघ डॉक्टर, आता तुला हा सोहोळा कल्पनेनं मिटल्या डोळ्यांनी नाही बघावा लागणार. तो - तो तुला प्रत्यक्षच दिसेल."
  "म्हणजे ? मी नाही समजलो !"
  "समजेल. वेळ आली की लौकरच समजेल सगळं."
  "वेळेची वाट पाहण्याइतका धीर नाही मला. आत्ताच सांगा सगळं."
  "त्याचं काय आहे, या वर्षी अतिशय दुर्मिळ योग आले आहेत. असे योग योग्यानं समाधी घ्यायला अत्यंत योग्य असतात."
  "बरं मग ?"
  "मग काय ? या योगावर आम्ही समाधी घ्यावी म्हणतो."
  "काहीतरीच काय ?" डॉक्टर एकदम उसळून म्हणाले, "ते शक्य नाही. मला टाकून तुम्हांला जाता यायचं नाही. आपला शब्द तुम्हांला मोडता यायचा नाही."
  "शब्द ? कसला शब्द ? आणि तो तुला केव्हा दिला ?"
  "तुम्ही मला आपल्याजवळचं सर्व विद्याधन देण्याचा शब्द दिलाय. विसरलात ?"
  "हात्तिच्या ! एवढंच ना ? अरे, खुळ्या, मग आम्ही ते तुला देह सोडल्यावरसुद्धा देऊ शकतो. मग तर हरकत नाही ना तुझी ?"
  "आहे. आहे. माझा सक्त विरोध आहे तुमच्या या भलत्याच संकल्पाला. मला तुम्ही समोर हवेत. असे - अगदी माझ्याजवळ बसलेले." डॉक्टर आवेगानं म्हणाले. त्यांचा ऊर दाटून आला, डोळे भरून आले.
  महाराजांनाही आपल्या शिष्याच्या उत्कट प्रेमभावानं कुठंतरी हलल्यासारखं झालं. त्यांनी हळुवारपणानं डॉक्टरांच्या पाठीवरून हात फिरवीत म्हटलं, "पण असा योग पुन्हा पुन्हा येत नसतो रे - पुढच्या सतरा वर्षांत असा योग नाही."
  "उत्तम झालं. देवाचीच कृपा ! यानं मला आणखी सतरा वर्षं तरी सदगुरुंचा सहवास दिला. तुम्ही पुढच्या योगावर जा, महाराज. आणि खरं तर तुम्हांला 'योग' पाहण्याची गरजच नाही. तुम्ही जाल तो योगच दुर्मिळ योग असेल. त्या वेळेपर्यंत तुमच्या या डॉक्टरला थोडी तरी समज येईल. तुमची समाधी तो स्थितप्रज्ञवृत्तीनं पाहू शकेल. तुमचा विरह साहू शकेल."
  "बघू -" महाराज गंभीरपणानं म्हणाले.
  "बघू नाही. मला वचन द्या की, 'मी तुला सोडून कुठेच जाणार नाही म्हणून."
  "तथाऽस्तु ! निदान पुढच्या योगापर्यंत. तू आमच्या पायरीवर आलास की आम्ही जाऊ. झालं समाधान ?"
  असं म्हणून महाराज हसले. मग म्हणाले, "अरे... चहा... सिगरेट..."
  "हो... हो... आत्ता आणतो महाराज, आत्ता आणतो." डॉक्टर आनंदून म्हणाले. जणू त्यांचाच मृत्यू टळला होता !.....क्रमशः ....

 *🔆लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी🔆*

No comments:

Post a Comment