*
पुष्प = {४६},
*
*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*
पांडुरंगाची एकादशी. शुद्ध कार्तिकी. मेहेंदळेवाड्यातला सकाळचा भजनाचा कार्यक्रम झाल्यावर श्री पांडोबा बोंद्रे ताईसाहेबांना म्हणाले, "आज आमच्या बालगंधर्वांचा मुक्काम इथे आहे. बदामी हौदाजवळ परांजपे वकील आहेत ना, त्यांच्याकडे."
श्री बोंद्रे हे गंधर्वनाटक कंपनीत बालगंधर्वांना मृदुंगाची साथ करीत असत. पुण्यात असले की ते वेळात वेळ काढून मेहेंदळेवाड्यात भजनकीर्तनाला येत. लहर लागली तर साथही करीत. त्यांनी गंधर्व पुण्यात आहेत असं सांगताच ताईसाहेब म्हणाल्या, "तुम्ही फार भाग्यवान आहात, बोंद्रे. फार मोठ्या कलावंताची सेवा घडत्येय तुमच्या हातून. देवमाणुस आहेत ते. आम्हालासुध्दा वाटतं केव्हातरी की त्यांची पायधूळ आपल्या वास्तूला लागावी."
"तेच तर म्हणतोय मी. आपली इच्छा पूर्ण व्हायचा योग आलाय."
"असं ? तो कसा काय ?"
"मी मधे आपल्यासंबंधी त्यांच्याशी बोललो होतो. पंडित भास्करबुवांच्या घराण्यातल्या माई इथे येऊन अभंग गातात, भजन करतात हेही सांगितलं. आणि 'आपण याल का तिथे केव्हातरी ?' असंसुध्दा विचारलं. त्यांनी लगेच होकार दिला होता म्हणून जमलं तर आजच त्यांना विनंती करतो आणि संध्याकाळी कीर्तनाला घेऊन येतो."
म्हटल्याप्रमाणे पांडोबांनी खरोखरच बालगंधर्वांना वाड्यावर आणलं. त्यांना पाहताच त्यांना बघायला उत्सुक असलेल्या श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. रावसाहेबांनी लगबगीनं पुढे होऊन त्यांना प्रणाम केला. मोठ्या आदरानं त्यांचा हात धरून त्यांना उच्चासनावर बसवलं.
तानपुरे सुरात लागले. मृदुंग वाजवायला स्वतः पांडोबा बसले. कीर्तनाची वेळ झाली, पण ताईसाहेब गंधर्वांच्या उपस्थितीनं भारावल्या होत्या. त्यांना सुरूवात करायला धीर होईना. त्या माईंना म्हणाल्या, "मला वाटतं, आपण यांनाच सुरूवात करायला सांगावं. कारण त्यांच्यापुढे आपलं गाणं म्हणजे सूर्यापुढे काजव्यानं चमकणं !"
माईंनी मान डोलावली. माथ्यावरचा पदर आणखी थोडा पुढे घेऊन त्या हात जोडून म्हणाल्या, "आपणच काही म्हणावं अशी इच्छा आहे ताईसाहेबांची. आपल्यापुढे गायचा संकोच वाटतोय."
"छे, छे, आपण अगदी संकोच करू नये. आपण नेहमीसारखंच सगळं करावं. मी कुणी मोठा नाही, आई. या सगळ्यांसारखाच मीसुध्दा एक भक्त. मी इथे बसलोय हेही आपण विसरून जावं आणि कीर्तनाला सुरुवात करावी."
'जय जय राम कृष्ण हरी:' चा गजर झाला.
"सुंदर ते ध्यान उभे विटेवरी।" हा रूपाचा अभंग ताईसाहेबांनी इतक्या तन्मयतेनं म्हटला की सगळं वातावरण प्रसन्नतेनं भरून गेलं. मग त्यांनी 'हरिकथेची आवडी देवा। करितो सेवा दासांची।' हा अभंग निरूपणाला घेतला.
ताईसाहेब आणि यल्लूमाई दोघींचा आवाज मधुर. त्यावर अभिजात शास्त्रीय संगीताचा साज चढलेला आणि तो उमटत होता भावभक्तीनं प्रफुल्लित झालेल्या त्यांच्या हृदयकमळाच्या गाभ्यातून !
भक्तांच्या सेवेला देव कसा धाव घेतो, त्याचं रक्षण नाना रूपं घेऊन कसं करतो याचं निरूपण करताना ताईसाहेबांनी, 'धाव घाली विठू आता, चालू नको मंद' हा अभंग म्हणायला सुरुवात केली. माईंनी तो उचलून धरला. दोघीही मोठ्या तन्मयतेनं विठूमाउलीला आळवू लागल्या. ताईसाहेब मध्य सप्तकात म्हणत, तर माई तार सप्तकात फिरक्या ताना घेत पुन्हा ध्रुवपदावर येत. मग दोघीही आर्त स्वरानं साद घालीत, 'विठ्ठला, मायबापा, आता अगदी धावत ये. प्राण कासावीस झाला आहे. धाव, धाव घाली विठू आता, चालू नको मंद- चालू नको मंद !'
भावनाप्रधान हळव्या बालगंधर्वांना राहावलं नाही. ते उत्स्फूर्तपणानं उदगारले, "वाहवा! वाहवा!! आता पांडुरंगानं प्रत्यक्ष यायलाच हवं. दर्शन द्यायलाच हवं."
"आले - आले -" नेमकं त्याच वेळी कुणीसं म्हणालं, "अहो, महाराज आले !"
रावसाहेब ताडकन् उठले. जिन्यात गेले. मोठ्या आदरानं महाराजांना आत घेऊन आले.
डोक्यावर गोंडा असलेली फरची टोपी, अंगात पांढरा शुभ्र सदरा, त्यावर मोरपंखी रंगाचा कोट, गुडघ्यापर्यंत धोतर, हातांत नवग्रहाच्या अंगठ्या महाराज सजूनधजून आले होते.
ते आले ते त्यांच्यासाठी ठेवलेल्या आसनावर न बसता सरळ पुढे आले. पांडोबांच्या मृदुंगावर डाव्या हातानं जोरदार थाप मारून त्यांच्या शेजारीच बसले. तोंडातला सुगंधी विडा चघळीत म्हणाले, "चालू द्या, चालू द्या. हाच अभंग पुढे चालू द्या."
महाराजांच्या आगमनामुळे थांबलेला अभंग पुन्हा सुरू झाला. ताईमाईंच्या मनातला 'विठू' धावून आला होता. त्यांच्या समोर बसून कौतुकानं त्यांच्याकडे बघत होता. त्यांच्या धाव्याला त्यानं साथ दिली होती.
तो अभंग पुरा होतो न होतो तोच ताईसाहेबांना एकदम आतून स्फुरण आल्यासारखं झालं. महाराजांकडे बघत बघत जणू त्यांच्या रूपात पांडुरंगाचंच दर्शन घेत त्यांनी एकदम दुसऱ्या अभंगाला सुरुवात केली,
"पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती।
रत्नकीळा फांकती प्रभा।
अगणित लावण्य तेजपुंजाळ।
न वर्णवे तेथिंची शोभा॥१॥"
यल्लूमाईंचा तर हा अतिशय आवडता अभंग. त्यांनी साथ देत म्हटलं, "कानडा वो विठ्ठलु। करणाटकु। तेणें मज लावियेला वेधु."
सर्वांनाच त्याचा वेध लागला.
ऐकता ऐकता महाराज उठून उभे राहिले. ताईसाहेब गातच होत्या.
"क्षेम देऊ गेले तंव मीच मी एकटी"
देवभक्त एकरूपच झाले. आता त्याला आलिंगन कसं देणार ? हा अनुभव 'परे' च्या पलीकडचा. तो वैखरीनं कसा सांगणार ?
महाराज डुलू लागले. हसू लागले. हा 'शब्देविण संवादु, दुजेविण अनुवादु' दुसऱ्याला कसा कळणार ?
भावभक्तीच्या रंगात रंगून महाराज आता गिरक्या घेऊ लागले. भान हरपल्यागत नाचू लागले. पांडुरंगमय झाले.
आणि एक 'अकल्पित' घडलं.
शंकरमहाराजांच्या ठिकाणी साक्षात विठ्ठलमुर्ती दिसू लागली. 'कानडा' 'कर-नाटकु' विठ्ठलु अवतीर्ण झाला. नाथसंप्रदायाच्या चिन्हांकित मुद्रा धारण करून उभा राहिला.
मस्तकावर आदिनाथ शिवाला धारण करणारा,
कानांत मत्स्येंद्रनाथांचं स्मरण करून देणारी मत्स्याकृती मकरकुंडलं घातलेला, वक्षस्थळावर भृगु ऋषींच्या पदाघाताचं चिन्ह 'वत्सलांछन' असलेला आणि गळ्यात भक्तांनी केलेल्या आत्मसमर्पणाचं चिन्ह असलेल्या तुळशीदलांची माला धारण केलेला.
श्रीपांडुरंग सर्वांना दिसला. बालगंधर्वांची इच्छा पूर्ण झाली.
त्याच्या दर्शनानं सर्वांचं भान हरपलं........क्रमशः ...
*लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी*
No comments:
Post a Comment