Monday, 14 January 2019

Tale 4

 *🌷🌷पुष्प = {४०},🌷🌷*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*


  मग त्यांनी सर्व श्रोतृवर्गावरून दृष्टी फिरवली. म्हणाल्या, "भगवतगीतेचा जन्म ही एक अदभुत घटना आहे. कुठे युद्ध आणि कुठे आत्मबोध! पण हे अघटित घडलं आहे. रणवाद्यांच्या गर्जना चालू असताना हे परमानंदप्राप्तीचं गीत गायलं गेलं आहे.
  इथे मुळातच विपरीत घडलं आहे. 'अधर्म' क्षेत्रात लढाई होणं स्वाभाविक आहे, पण या ठिकाणी युद्ध होत आहे ते 'धर्मक्षेत्र' असलेल्या कुरुक्षेत्रात. युद्ध होतं आहे एकाच कुरूवंशातल्या सख्खे चुलतभाऊ असलेल्या कौरव-पांडवात. रणभेरी गर्जत आहेत. दोन्ही पक्षांकडून युद्धाला आव्हान देणारे शंख आवेशाने फुंकले गेले आहेत. त्यांच्या महाध्वनीनं त्रैलोक्य दणाणून गेलं आहे. अशा वेळी पांडवांकडील महापराक्रमी सव्यसाची धनुर्धारी अर्जुन आपल्या रथाचं सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाला म्हणाला, "माझा रथ या दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर म्हणजे मी कुणाबरोबर झुंजावे, माझ्याशी झुंज घ्यायला माझ्या योग्यतेचा कोण आहे हे मला पाहता येईल."
  श्रीकृष्णांनी त्याप्रमाणं केलं.
  "अर्जुनानं शत्रुसैन्यावरून आपली दृष्टी फिरवली... आणि... आणि एक नवल घडलं. वीरश्रीनं रसरसलेला अर्जुन मायाममतेच्या, 'मी','माझं' यांच्या विळख्यात सापडला. त्याच्या वीरबाहूतून गांडीव धनुष्य गळून पडलं. अंगाला कापरं सुटलं. तोंडाला कोरड पडली. अत्यंत व्याकुळ होऊन तो सारथ्याला म्हणाला, "ही तर सगळी माझीच माणसं! आप्त, स्नेही, गुरूजन, नाही... नाही... यांना मारून मिळणारा विजय मला नको. कुलक्षय करून मिळणारं राज्य मला नको."
  अर्जुन गलितगात्र झाला होता, पण त्याचा सारथी सावध होता. त्यानं त्याचा जीवनरथ योग्य दिशेनं नेला.
  विषाद झालेल्या अर्जुनाला त्यातून बाहेर काढून त्याला मोक्षसंन्यासापर्यंत नेणाऱ्या, त्याचा मोहनिरास करून त्याला -
  "गुंतलो होतो अर्जुनपणें। तो मुक्त झालो तुझेपणें॥"
  या स्थितीत नेणाऱ्या श्रीकृष्णानं नानापरीनं त्याला केलेला बोध म्हणजे 'भगवत्-गीता' आणि आपल्या मधुर अमृतवाणीनं ज्या महाज्ञानी नि महायोगी ज्ञानदेवांनी तिच्यामधला भावार्थ उकलून दाखवला ती आहे 'भावार्थदीपिका.' सामान्यांच्या वाटेवर प्रकाशाचे दिप उजळवणारी ज्ञानेश्वरी.
"ओम नमो श्रीआद्या। श्रीवेदप्रतिपाद्या।
 जय जय स्वयंवेद्या। आत्मरूपा॥१॥
 देवा! तूंचि गणेशु। सकलार्थ मतिप्रकाशु।
 म्हणे निवृत्तिदासु। अवधारिजो जी॥२॥"

  ज्ञानेश्वरमाउलींच्या या उदगारांनी      'भावार्थदीपिका'चं अवतरण झालं. तिनं 'ओम'च्या उच्चारानं प्रथमत:च निर्गुण, निराकार अशा विश्वव्यापक परमात्म्याचं विराट स्वरूप प्रकट केलं आहे. त्याला वंदन केलं आहे. ओम नमो श्रीआद्या - म्हणजे हे आद्यस्वरूप शक्तियुक्त आहे. शक्तीरुप आहे. त्यांत सत्ता, प्रकाश आणि सुख सामावलेलं आहे. शिवशक्तिरूप आहे.
  'आद्या' म्हणजे मायेच्या उत्पत्तीपूर्वी असलेला. आद्य पुरूष. या एकाच शब्दात ज्ञानदेवांनी आपल्या नाथपरंपरेच्या मूळ पुरुषाला आदिनाथालाही वंदन केलं आहे. आ म्हणजे ज्याला मर्यादा नाही. आणि न-अथ-नाथ म्हणजे ज्याला सुरवात नाही. असा आदिनाथ.
  असा हा परमात्मा शब्दांनी सांगता येत नसला तरी तो स्वयंप्रकाशी असल्यानं आपल्याला जाणता येतो. तो सर्वव्यापी आहे, सर्वांच्या अंतर्यामी आहे. स्वयंवेद्य आहे. म्हणूनच तो आपल्याही अंत:करणात विराजमान आहे.
  याच आत्मस्वरूपाला गणेश म्हटलं आहे. सर्वांच्या 'मतीला' म्हणजे बुध्दिला प्रकाश देणारा श्रीगणेशा कसा अवघ्या शब्दब्रह्माला कवेत घेऊन उभा आहे हे सांगताना माउली म्हणतात -
"अकार चरणयुगुल। उकार उदर विशाल। 
 मकार महामण्डल। मस्तकाकारें॥१-१९॥
 हे तिन्ही एकवटले। तेथ शब्दब्रह्म कवळले। 
 ते मिया श्रीगुरूकृपा नमिले। आदिबीज॥१-२०॥"

  ताईसाहेबांच्या दृष्टीपुढे ती नुकतीच पाहिलेली स्वप्नदृष्टांन्तामधली श्रीमूर्ती उभी राहिली. तिच्या सोंडेचा प्रेमळ स्पर्शही जाणवला आणि मग त्या श्रीगणेशाचं वर्णन सांगताना, त्याच्या अंगप्रत्यंगावर सहा शास्त्रांचं लेणं माउलीनं कसं चढवलं आहे हे विशद करताना अतिशय रंगून गेल्या.
  नंतरची ओवी सदगुरुस्मरणाची.
"मज हृदयीं सदगुरू। जेणें तारिलो हा संसारपुरू।
 म्हणोनि विशेषें अत्यादरू। विवेकावरी॥१-२२॥"

  "अहो, ज्ञानदेव म्हणताहेत, ज्या सदगुरुंच्या कृपाप्रसादानं मी हा भवसागर तरून गेलो ते निवृत्तिनाथ - श्रीगुरू माझ्या हृदयातच वास करून राहिले आहेत. त्यामुळे माझा विवेक सतत जागृत असतो.
  'विवेक' म्हणजे सारासार विचार. नित्य नि अनित्य, चिरंतन नि क्षणभंगुर, आत्मा आणि अनात्मा यांमधला भेद ओळखणं. 
  असा भेद कळला की सत्य, नित्य, शुद्ध आणि मुक्त अशा अज नि अमर आत्मतत्त्वावर दृढ श्रद्धा ठेवणं म्हणजे विवेक. आणि ही निवड करण्याची पात्रता आपल्या अंगी कशी येते माहित आहे ? केवळ गुरुकृपेनं. हृदयीं नांदणाऱ्या सदगुरुंमुळे!"
  हे सारं बोलताबोलताच ताईसाहेबांना प्रकर्षानं जाणवलं की, हे सुद्धा आपल्या मुखातून हृदयस्थ श्रीगुरूच वदवीत आहेत. शब्दांची भांडारं उघडून ठेवीत आहेत. अर्थांचे उन्मेष अंकुरित करीत आहेत. फुलवीत आहेत."
  तास केव्हा सरला हे कुणालाच कळलं नाही. वक्ता आणि श्रोता - सर्वच त्या ओघवती रसवंतीमध्ये बुडून गेले होते.
  'पसायदान' म्हणून ताईसाहेब व्यासपीठावरून उठल्या. पाहतात तो शंकरमहाराज रावसाहेबांचा हात धरून त्यांच्या दिशेनंच येत होते. त्यांचे डोळे कुठेतरी अंतराळी लागल्यासारखे दिसत होते. 
  ताईसाहेबांनी पुढे होऊन त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं. त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या.
  "महाराज... महाराज, आपणच बोलत होतात. आपणच !" त्या एवढंच कसंबसं म्हणाल्या.
  महाराज प्रसन्नपणानं हसले. म्हणाले, "राऊ, आम्ही तुला म्हटलं नव्हतं, तुझ्या घरात ज्ञानेश्वरी आनंद आणील म्हणून ? बेबी, आता रोजच होऊ दे ज्ञानदेवीचं प्रवचन."
  रावसाहेबांचे डोळेसुध्दा ओलावले होते.
  तिथून निघताना महाराज म्हणाले, "बरं का, आता गोकुळाष्टमीचा उत्सवही करायचा. आम्ही येऊ त्या वेळी.".....क्रमशः ...

 *_लेखन  : श्रीमती मृणालिनी जोशी_*

No comments:

Post a Comment