Monday, 14 January 2019

Tale 10

 *⚪🔅⚪पुष्प = {४७},⚪🔅⚪*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*


  कीर्तन झाल्यावर बालगंधर्वांनी महाराजांना नमस्कार केला. तेव्हा महाराजांनी विचारलं, "काय रे, ओळखलंस का ?"
  बालगंधर्व विचारात पडले.
  "विसरलास ? अरे, तू किर्लोस्कर नाटक मंडळीत होतास तेव्हाची गोष्ट आहे. आम्ही तुझं नाटक पाहायला आलो होतो. कळलं की तुझा आवाज बसला आहे. तुला बोलताच येत नव्हतं. प्रयोग रद्द करायचा विचार चालला होता म्हणे. आम्ही लगेच आत गेलो आणि कुणाला काही न विचारता सरळ माझ्या तोंडातला विडा तुझ्या तोंडात कोंबला."
  "होय. होय देवा! त्या विड्यामुळे माझा आवाज मोकळा झाला. आणि प्रयोग तर नेहमीपेक्षा जास्तच रंगला. पण ते विडा कोंबणारे आपणच होतात का, महाराज ?"
  "मग ? तेव्हाच नाही बाबा, सोलापूरला तुला खूप ताप चढला होता तेव्हासुध्दा आम्हीच पुण्याहून तिथे मुद्दाम आलो होतो. तुला तपासायला आलेल्या डॉक्टरांना बाजूला करून म्हटलं होतं, अंतरनाड्या तपासणारे डॉक्टर आहोत आम्ही ! तुमचे बाप!"
  "हो... आणि आपण सोडावाँटरच्या बाटलीत सिगरेटची राख टाकून मला सोडा पाजलात ! आमचा प्रयोग आपल्या कृपेनं झाला म्हणून नाटकाच्या मध्यंतरात आम्ही आपला सत्कारही केला होता. पण महाराज, तेव्हा आपण असे दिसला नव्हतात."
  महाराज नुसतं हसले. थोड्या वेळानं म्हणाले, "बरं, ते गाणगापूरचं जेवण -"
  "आठवतंय, महाराज. सगळं आठवतंय."
  बालगंधर्वांच्या मनापुढे तो सगळा प्रसंग उभा राहिला. ते स्वतः मास्तर कृष्णराव आणि त्यांचे काही मित्र गाणगापूरला गेले होते. तिथे एक दिवस राहून ते परतीच्या प्रवासाला निघाले. स्टेशनवर आले, पण गाडी त्यांच्या डोळ्यांपुढून निघून गेली. दुसऱ्या दिवसाशीवाय गाडी नव्हती. परत गावापर्यंत जाणंसुध्दा कठीण होतं. शेवटी स्टेशनवरच आपल्या पथाऱ्या पसरून ते सर्वजण सकाळची वाट पाहत आडवे झाले. पण झोप लागेना. कारण दिवसभर धड जेवायला मिळालेलं नव्हतं. उपाशीपोटी असलेले कृष्णराव म्हणाले, "काय हो, इथे जवळपास खाणावळ नाही का एखादी ? हाँटेल तरी ? निदान चहा मिळाला असता ना तरी चाललं असतं."
  "बघू या. तिकडे स्टेशनबाहेर दिवे दिसताहेत." एकजण म्हणाले.
  मग त्या दिव्यांच्या अनुरोधानं सर्वजण तिकडे गेले. पाहतात तो तिथे त्यांना एक भोजनालय दिसलं. त्यांच्या मनात आलं की, मघाशी स्टेशनवर जाताना कसं दिसलं नाही आपल्याला हे! कदाचित गाडी पकडण्याच्या धावपळीत नसेल गेलं आपलं लक्ष.
  सर्व मंडळी आत गेली. स्वादिष्ट रूचकर आणि गरमागरम अन्नब्रह्माचा मनमुराद आस्वाद घेऊन तृप्त झाली.
  निघताना बालगंधर्वांनी भोजनालयाच्या मालकाला विचारलं, "आपलं किती बिल झालं, मालक ?"
  तो म्हणाला, "आत्ता राहू दे. तुमची गाडी उद्या सकाळी आहे ना ? सकाळी घेईन पैसे. जाऊन झोपा आता खुशाल !"
  सकाळी कृष्णराव त्या जागेवर जाऊन पाहतात तो तिथे चिटपाखरूही नव्हतं. नाही भोजनालय, नाही त्याचा मालक !
  सगळे चक्रावून गेले. वाटलं ते स्वप्न तर नव्हतं ? पण स्वप्न म्हणावं तर सर्वांना एकच स्वप्न कसं पडलं ? आणि स्वप्नात जेवलेल्या त्या कल्पनेतल्या अन्नानं सर्वांचं पोट कसं भरलं ?
  या अदभूत घटनेचं आश्चर्य करीत करीत सर्वजण ठरल्याप्रमाणे पुढे पंढरपूरला गेले.
  तिथे पांडुरंगाचं दर्शन घेत असतानाच कुणीतरी बालगंधर्वांच्या आणि त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या कृष्णरावांच्या पाठीवर जोरदार थाप मारली. दचकून पाहतात तो गाणगापूरचा खानावळीचा मालक त्यांच्यापुढे उभा! त्यांना विचारीत होता, "काय रे? फुकटचं जेवण जेवता काय ?"
  "नाही नाही देवा." बालगंधर्व घाईघाईनं म्हणाले, "तसं नाही. सकाळी आम्ही आलो होतो तुमचं बिल द्यायला. पण आपण भेटला नाहीत आम्हाला. आत्ता देतो."
  मालक हसला म्हणाला, "पैसे नकोत आम्हाला. दर गुरुवारी भजन करा. भजन करा." आणि तो बघता बघता गर्दीत निघूनही गेला होता.
  ती सर्व घटना आठवली आणि बालगंधर्वांना प्रेमाचा उमाळा आला. 
म्हणजे दरवेळी आपल्याला सांभाळणारे हेच होते. हेच. शंकरमहाराज. याची त्यांना खात्री पटली. महाराजांच्या पायांना मिठी घालून ते एखाद्या लहान मुलासारखे स्फुंदून स्फुंदून रडू लागले.
  महाराजांनी त्यांना उठवलं. त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत ते म्हणाले, "अरे, तू आहेस गंधर्वनगरीचा एक शापित गंधर्व. तुला नादब्रह्माचं वरदान आहे !
  तुला स्वर्गीय सूर लाभला आहे.
  भावभक्तीनं भरलेला ऊर लाभला      आहे.
  अशी माणसं म्हणजे आमचा जीव की प्राण!"
  "भाग्य माझं!" बालगंधर्व भरल्या डोळ्यांनी आणि भिजल्या स्वरानं म्हणाले, "देवाऽ मायबापाऽ आज किती वर्षांनी भेटलात ? अशीच माया राहू दे आपल्या या मुलावर ! महाराज... आता पुन्हा केव्हा होईल दर्शन ?"
  महाराजांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद देत म्हटलं, "तू हाक मारशील तेव्हा ! 
  आणि तुझ्या गुरुवारच्या भजनाला आम्ही येतच असतो !"....क्रमशः ...

  *लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी*

No comments:

Post a Comment