Monday, 14 January 2019

Tale 20

 *⚪🔅⚪पुष्प = {५६},⚪🔅⚪*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*

  अनेक साधूसंतांनी जिथे साधना केली, अनेक सिध्द पुरुषांनी जिथे वास्तव्य केलं ते वृद्धेश्वराचं पवित्र स्थान नगर जिल्ह्यात पाथर्डीच्या पश्चिमेला काही अंतरावर आहे. तिथला परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. वडापिंपळाची, औदुंबर-शमीची, मांदार-पळसाची, बोरी-बाभळीची, आवळा-आंब्याची, बिल्ववृक्षांची, पांढऱ्या चाफ्यांची आणि निर्गुडीसारख्या असंख्य वनौषधींनी भरलेली घनदाट झाडी नाना प्रकारच्या फुलांनी सुगंधित झाली आहे. अशा या गर्भगिरीच्या पायथ्याशी दोन डोंगरांच्या घळीत हे नाथपंथाचं आदिस्थान असलेलं वृद्धेश्वराचं पुरातन मंदिर उभं आहे. कुणी याला 'म्हातारदेव' म्हणतात, तर उत्तरेकडून येणारे नाथपंथी याला 'बुढाकेदार' म्हणतात.
  तिथून वाहणाऱ्या नदीचं नाव 'वृद्धा' आहे. देवळाच्या भोवती चौकोनी तटबंदी बांधलेली आहे. देऊळ लहान असलं तरी आतला सभामंडप ऐसपैस आहे.
  महाराज नगरला परत आले तेव्हा ते डॉक्टरांना घेऊन वृद्धेश्वरी आले. डॉक्टर यापूर्वी वृद्धेश्वराला बरेचदा आले होते. पण ज्ञानेश्वरीतील आशयाची आणि या स्थानाची अशी जवळीक असेल हे त्यांना कधी जाणवलं नव्हतं. म्हणून आज ते इथे मोठ्या उत्सुकतेनं आणि वेगळी दृष्टी घेऊन आले होते.
  महाद्वाराजवळच्या धवल नंदीला नमस्कार करून दोघं आत गेले. इच्छावशे इंद्रिय आवरून धरणारं कासव, मधल्या गाभाऱ्यातला श्रीगणेश आणि भैरवनाथ यांचं दर्शन   घेऊन ते मुख्य गाभाऱ्यात गेले. गर्भागारात जाताना नेहमीसारखाच डॉक्टरांनी महाराजांचा हात धरला होता. पण या वेळी त्यांना त्यांचा स्पर्श काही वेगळाच वाटला. वाटलं, त्या हातातून विजेच्या लहरींवर लहरी येत आहेत. आपल्या अंगांगातून सळसळत आहेत. आपला अवघा देह पुलकित झाला आहे.
  गाभाऱ्यात चार मोठे नंदादीप तेवत होते. त्यांच्या सौम्य प्रकाशात आदिनाथांचं आणि त्यांच्या मागे हात जोडून उभ्या असलेल्या आदिशक्तीचं प्रसन्न दर्शन होत होतं. हे लिंग वालुकामय आहे. खडबडीत आहे. एकावर एक छोटे दगड रचून ठेवावेत तसं आहे. दक्षिणेकडचा भाग गोलाकार मस्तकासारखा थोडा उंच आहे. लिंगामध्ये शुभ्र असे तेजस्वी कण चमचमताना दिसतात. या स्वयंभू लिंगातून एक जिवंत झरा अखंड वाहतो आहे-एखाद्या ज्ञानगंगेसारखा. या लिंगाचं एक अदभूत वैशिष्ट्य म्हणजे आपलं वृद्धेश्वर-वृद्धिंगत होणारं-हे नाव सार्थ करीत याचा आकार दिवसेंदिवस वाढत जातो आहे.
  डॉक्टर अजूनही त्या भारावलेल्या अवस्थेतच होते. ते आणि महाराज आदिनाथांपुढे बसले.त्यांनी हात जोडले. त्यांच्या मुखातून थरथरते शब्द उमटले, 
"नागेंद्रहाराय त्रिलोचनाय। भस्मांगरागाय महेश्वराय। 
 नित्याय शुद्धाय दिगंबराय। तस्मै नमः शिवाय ॥
 ओमकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिन:।
 कामदं मोक्षदं चैव ओमकाराय नमो नमः ओम... ओम... नमो ओम..."

  पुढचे शब्द हळूहळू उमटेनासे झाले. वैखरी थांबली. आणि त्या घुमटाकार गाभाऱ्यात डॉक्टरांच्या भोवती दशदिशातून ओमकार घुमू लागला. त्यांच्या अंगावर झेपावणाऱ्या त्या प्रणवाच्या स्पंदनलहरींना त्यांच्या अंतर्यामीच्या प्रणवानं प्रतिसाद दिला आणि त्या उदघोषातून अवतरलेलं एक विलक्षण दृश्य त्यांना दिसलं.
  त्यांना आदिनाथांच्या जागी तेजानं लखलखणारे महाराज दिसले. भरदार केसांमुळे किंचित उभारल्यासारखा दिसणारा त्यांच्या मस्तकाचा आकार, चेहऱ्याचा खाली थोडा निमुळता होत गेलेला हनुवटीपर्यंतचा भाग. छे,छे! ही शिवपिंडी नव्हेच. हे आहेत शंकरमहाराज!
  आणि हे सारं पाहता पाहता डॉक्टर हरवले. त्यांच्या अंतर्यामीच्या 'मी' पणाच्या स्फुरणात सारं काही एकरूप होऊन गेलं. आदिनाथ, महाराज आणि त्यांना निरखणारा नागेश... सगळं एक झालं. नामरूप गळून पडलं. उरलं केवळ शून्य!
  असा किती वेळ गेला ते डॉक्टरांना समजलंच नाही. महाराजांनी त्यांना स्पर्श करून जेव्हा म्हटलं, "ऊठ... डॉक्टर... ऊठ." तेव्हा ते भानावर आले. त्यांनी डोळे उघडून महाराजांकडे पाहिलं. मग पिंडीकडे पाहिलं. आणि किंचित स्मित करीत त्यांनी आदिनाथांना वंदन करण्याऐवजी महाराजांच्या चरणावरच माथं टेकलं. पुटपुटले, "जय शंकरऽ जय शंकर !"......क्रमशः ...

 *लेखन श्रीमती मृणालिनी जोशी*

No comments:

Post a Comment