*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची.*
ताईसाहेबांच्या अशाच एका कीर्तनाच्या वेळी १९३८ च्या श्रावण महिन्यात कुमार बापूला शंकर महाराजांचं प्रथम दर्शन घडलं. त्या पहिल्याच भेटीत एका अनामिक ओढीनं बापू त्यांच्याकडे आकर्षित झाला आणि अखेरपर्यंत जवळजवळ दहा वर्षे ते पुण्यात येत तेव्हा त्यांच्या सहवासात राहू लागला.
तसं बापूचं वय चौदा-पंधरा वर्षांचेच होते. साधूसंन्याशांच्या सहवासात राहण्याचं नव्हतं. पण बापू लहानपणापासूनच जगावेगळा मुलगा होता. त्याच्या घरातलं वातावरण धार्मिक होतं. त्याच्या वडिलांना - नारायणराव रानडे यांना शिरडीच्या साईबांबांची सेवा करण्याचं भाग्य लाभलं होतं. घरात नवनाथादिकांच्या पोथ्या वाचल्या जात होत्या. नाशिकपासून जवळच असणाऱ्या सुरगणा गावात हे कुटुंब सुखासमाधानाने राहत होते. पण थोड्याशा आजारानं त्यांचे वडील वारले. परिस्थिती पालटली. नुसती परिस्थितीच पालटली नाही, तर वडिलांच्या मृत्युनं बापूच्या मन:स्थितीतही विलक्षण बदल झाला. त्याला एका विचित्र प्रश्नानं अस्वस्थ केलं.
त्याचं असं झालं - वडील गेले. त्यांचं शव घरात होतं. नातेवाईक आणि स्नेहीसंबंधी त्यांचं अंत्यदर्शन घ्यायला येत होते. आठ-नऊ वर्षांचा लहानगा बापू तिथेच घोटाळत होता.
येणारी माणसं विचारायची, "नारायणराव केव्हा गेले ? कसे गेले?" कोणीतरी उत्तर द्यायचं, 'पहाटे गेले, अचानक गेले.'
बापूला मोठं कोडं पडलं. बाबा तर इथे समोर आहेत आणि हे सगळे ते गेले असं म्हणताहेत.
मग समोर दिसताहेत ते कोण ?
आणि गेले म्हणतात ते कोण ?
कोण गेलं नि कोण राहीलं ?
त्याच्या बालमनाला हे कोडं सोडवता येईना. त्यानं अनेकांना विचारलं, पण कुणालाच त्याचं समाधान करता आलं नाही.
त्यानंतर हे कुटुंब पुण्याला आलं. शाळेत जायच्या वयातच बापूनं अँम्युनेशन फॅक्टरीत नोकरी धरली. पण त्याचं लक्ष या कोड्याचं उत्तर मिळवण्याकडेच लागलं होतं. आईच्या तोंडून त्यानं नवनाथांच्या कथा ऐकल्या होत्या. त्यातले गोरक्षनाथ त्याला खूप आवडायचे. त्याला वाटलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला गोरक्षनाथांकडूनच कळतील. त्यांना प्रसन्न करून घेतलं पाहिजे. त्याला तोच एक ध्यास लागला. काम संपल्यावर तो गावाबाहेर वाघजाईच्या टेकडीवर जाऊन बसू लागला. त्यानं तिथे दोन खड्डे तयार केले. पर्वतीच्या कोपऱ्यावर सायकल लावून तो वाघजाईच्या कपारीत जाई. बरोबर आणलेला पोत्याचा तुकडा जमिनीवर अंथरून त्यावर बसे. मग खिशातले चिंचोके काढून जप करू लागे. १०८ चिंचोके मोजून ठेवले होते. जप कुणी दिलेला नव्हता. त्याच्या बालमनानं स्वतःच ठरवला होता तो. 'गोरक्षनाथ' 'मच्छिंद्रनाथ' म्हणे आणि एक चिंचोका दुसऱ्या खड्ड्यात टाकी. १०८ चिंचोके दुसऱ्या खड्ड्यात जमले की पुन्हा एकेक पहिल्या खड्ड्यात टाकी. दिवस मावळेपर्यंत जप चाले. डोळे मिटून मनापासून गोरक्षनाथांना हाका मारीत राहि. मध्येच डोळे उघडून गोरक्षनाथ कुठे आले का म्हणून इकडे-तिकडे पाही, पण त्याला समोर दिसायच्या धेनुदास डोळे यांच्या चरायला आलेल्या गाई आणि त्यांचे गुराखी. मग तो पुन्हा जपाला सुरवात करी.
अशी वर्ष-दोन वर्षे गेली. पण त्यानं गोरक्षनाथांच्या दर्शनाची आस सोडली नाही की त्यांचा नामजप थांबवला नाही. अखेरीस एक दिवस त्याला समोरून एक उंच पुरुष हातात आपल्या गाईचं दावं धरून येताना दिसला. पायघोळ भगवी कफनी, कानांत कुंडलं, गळ्यांत शृंगी-शैली-
बापू ताडकन् उभा राहिला. नक्कीच हे गोरक्षनाथ.
त्या पुरूषानं बापूकडे पाहून विचारलं,
"क्या रे बच्चा, इधर क्या करता है तू?"
पण त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता बापूनं अधीरपणानं त्यांनाच प्रश्न केला, "तुम्ही गोरक्षनाथच आहात ना?"
"क्यो ?"
"मला त्यांना भेटायचं आहे."
बापूकडे निरखून पाहत त्या बाबानं म्हटलं, "नही बेटा. मी गोरक्षनाथ नाही. पण मला सांग, तुला गोरक्षनाथांना कशासाठी भेटायचंय?"
"त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे."
"कुठला ?"
"माझे वडील वारले तेव्हा लोक म्हणत होते, ते गेले, पण प्रत्यक्षात ते माझ्यासमोर होते. मग गेले ते कोण आणि समोर दिसत होते ते कोण ? माणूस मरतं म्हणजे काय होतं ?"
"गहन है तेरा प्रश्न ! पण त्याचं उत्तर तुला मिळेल. आणि म्हणालास तर त्याची अनुभूतीही घेऊ शकशील तू."
"पण कशी ?"
"तू असं कर, मी राहतो तिथं ये."
असं म्हणून बाबांनी आपला पत्ता सांगितला आणि ते रानात निघून गेले.
बापूला अतिशय आनंद झाला. तो दुसऱ्या दिवशीच त्यांचा पत्ता शोधीत निघाला.
नव्या पुलाजवळील डॉक्टर घारापुरे यांच्या दवाखान्यावरून कसबा पेठेत जाणाऱ्या रस्त्यानं गेलं की उजव्या हाताला एका ओट्यावर 'जनता जनार्दन मंडळ' होतं. तिथेच एका पिंपळाच्या झाडाखाली श्रीविष्णूनं रूप घेतलेल्या मुंजाबाचं स्थान होतं. त्याच्या शेजारी बाबांची झोपडी होती.
बापूनं त्यांना नमस्कार केला. तेव्हा ते किंचित हसून म्हणाले, "आ गया, बेटे ? बैठ."
बापू मग रोजच तिथे जायला लागला. त्यांची सेवा करू लागला. पडतील ती कामं आनंदानं करू लागला. बाबांना हा कामसू, चुणचुणीत आणि काही आध्यात्मिक वारसा घेऊन आलेला मुलगा आवडला. एक दिवस ते स्वतः बापूच्या घरी आले. बापूच्या आईनं त्यांचा आदरसत्कार केला. तिनं दिलेला चहा पिता पिता ते म्हणाले, "माई, तू मोठी भाग्याची आहेस. तुझ्या हातची भाकर साईबांबांनी खाल्ली आहे."
"होय. पण तुम्हांला कसं कळलं ?"
त्यावर बाबा नुसतं हसले. थोडं थांबून म्हणाले, "त्यांच्या प्रसादानं झालेल्या या तुझ्या मुलाला नाथपंथाची दिक्षा द्यायची आहे. देशील तुझा मुलगा आम्हांला ?"
आई विचारात पडली. बापू तिच्याकडे पाहत होता. ती बोलत नाही असं पाहून तो आईजवळ जाऊन हळूच म्हणाला, "आई, मला पण तीच इच्छा आहे. मला नाथपंथी व्हायचंय."
बऱ्याच वेळानं आई म्हणाली, "बापूला दिक्षा द्यावी आपण, पण त्याआधी मला एक शब्द द्यावा."
"दिला ! काय हवं तुला ?"
"याला गंजडी, भंगडी, व्यसनी बनवू नका."
"नहीं नहीं. ऐसा कभी नहीं होगा ! मी स्वतः सुद्धा फक्त चहा पितो. आई, दिक्षेचा आणि गांजा, भांग यांचा काहीही संबंध नाही."
त्यानंतर आलेल्या कुंभमेळ्याला बाबा बापूला घेऊन त्र्यंबकेश्वरला गेले. शिवनाथसिध्दांची संजीवन समाधी असलेल्या त्र्यंबकमठात राहिले. मग ज्या ठिकाणी गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना अनुग्रह दिला होता त्या ब्रह्मगिरीवरच्या 'अनुपात - शिला' नावाच्या स्थानावर नागपंचमीच्या दिवशी त्यांनी बापूला नाथपंथातील 'सतनाथ' शाखेची दिक्षा दिली. त्याचं साप्रदायिक नाव ठेवलं, ' ज्ञाननाथ गुरु हरिनाथ.'
एक दिवस बापूची आई त्याला म्हणाली, "बापू, मेहेंदळ्यांच्या वाड्यावर गोकुळाष्टमी उत्सवाची कीर्तनं सुरू आहेत. तिथे शंकरमहाराज येतात. ते मोठे सिध्द पुरुष आहेत म्हणे. मी जाणार आहे. तू येशील का उद्या माझ्याबरोबर ?"
बापूनं होकार दिला. त्याला सिध्दपुरुषाला पाहायची उत्सुकता लागली. तो तिथे गेला. त्यानं महाराजांचं दर्शनही घेतलं, पण बापूला ते वेड्यासारखेच वाटले. कुठे तरी बघून हसणारे, अडखळत बोलणारे, गबाळ्या वेषाचे, बटबटीत डोळ्यांचे, लांब लांब हातांचे - आणि त्यांत सिगरेट ! बापूला त्यांना नमस्कार करावासा वाटला नाही. पण आईसाठी त्यानं महाराजांना नमस्कार केला. महाराजांनी आपला हात उंचावला. त्याच्याकडे निरखून पाहत ते काहीतरी पुटपुटले. बापूला काहीच कळलं नाही. महाराजांचं रंगरूपही फारसं भावलं नाही.
दुसऱ्या दिवशी तो हरिनाथबाबांना म्हणाला, "बाबा, त्या शंकरमहाराजांजवळ शृंगी, शैली, कंथा, झोळी, कुंडलं काहीच नव्हतं. वेष गृहस्थाचा. हातात अंगठ्या. शिवाय सिगरेट ! यांना नाथपंथाचे साधू कसं म्हणायचं हो ?"
"सगळंच काही बाहेरच्या दिसण्यावर नसतं, बेटा ! साधू ओळखायचा त्याच्या अंतरंगावरून ! तू जात जा त्यांच्याकडे. तुझे कान टोचायचं काम आहे त्यांच्याकडे. म्हणून तर तू त्यांचा विचार करतो आहेस."
बापू मग महाराजांकडे जाऊ लागला. मेहेंदळेवाड्यातलाच एक झाला. लहान वयात नाथपंथाची दिक्षा घेतलेला, गळ्यात शृंगीशैली घालून ऐटीत मिरवणारा, देखणा चुणचुणीत बापू ताईसाहेब आणि रावसाहेब यांच्या कौतुकाचा विषय झाला.
शंकरमहाराजसुध्दा आपली लहानसहान कामं त्याला सांगू लागले. कुठे जायचं असलं की त्याला बरोबर घेऊ लागले. साध्या साध्या प्रसंगातून त्याला मोलाचे धडे देऊ लागले...... क्रमशः ...
*_लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी_*
No comments:
Post a Comment