Monday, 14 January 2019

Tale 25

 *⚪♻⚪पुष्प = {६१},⚪♻⚪*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*


  महाराज वर्षातून दोन-तीन महिने नगरला येऊन राहत. त्यांच्या आगमनानं धनेश्वरांच्या घरात सणासुदीसारखा आनंदोत्सव व्हायचा. त्या वेळी दादा कारखानीस वकील, जनूभाऊ मिरीकर, हरीभाऊ पारखे, अण्णासाहेब थोरात, शांताराम चावक इत्यादी अनेक भक्तमंडळी तिथे जमत. गायन, वादन, भजन, कीर्तन, गप्पा-गोष्ठी यांची लयलूट होई.
  असेच एकदा महाराज आले असताना बैठकीच्या जागी सत्संग चालला होता. बैठक रंगली होती. पण त्याच वेळी स्वयंपाकघरात बसलेली डॉक्टारांची गृहलक्ष्मी मात्र चिंतातुर दिसत होती. पतीच्या आध्यात्मिक साधनेत तिनं कधी फारसा रस घेतला नव्हता. तसंच कशाला विरोधही केला नव्हता. महाराजांची, डॉक्टारांच्या स्नेह्यासोबत्यांची, त्यांच्या जेवणाखाण्याची, चहा-पाण्याची सर्व व्यवस्था एक गृहिणी या नात्यानं ती आस्थेनं करीत होती. आताही ती त्यांच्यासाठी चहा करीत होती. चुलीवर पाण्याचं आधण होतं. हातात साखरेचा डबा होता. पण हे सारं चाललं होतं यांत्रिकपणानं. सरावानं हात काम करीत होते, मन मात्र विचार करीत होतं वेगळाच.
  रमाजींच्या मनात येत होतं, 'आवक कमी आणि खर्च फार. आपली मध्यम स्थिती. मुलाबाळांचं शिक्षण व्हायचंय. आपल्याला कसं झेपणार हे सगळं ? आपलं काही नाही. आपण माहेरची श्रीमंती जितकी आनंदानं भोगली, तितक्याच आनंदानं या माझ्या साध्या संसारातही आपण राहतो आहोत. वडिलधाऱ्या माणसांचं, मुलाबाळांचं, पै-पाहुण्यांचं, आल्या-गेल्यांचं सर्व नीट करतो आहोत. पण पुढचा विचार मनात आला की चैन पडत नाही. काय करावं ?
  आमच्या लग्नाच्या वेळी बाबा ह्यांना म्हणाले होते, 'आपली सांपत्तिक स्थिती आता बेताची असली तरी पुढेही ती तशीच राहणार आहे थोडीच ! अहो, आपल्यासारखा हुषार, होतकरू डॉक्टर मनात आणील तर खोऱ्यानं पैसा ओढील!
  आपल्या बाबांचं म्हणणं खरं होतं. पण त्यांचा हा हुषार जावई तसं मनात आणील तर ना! लक्ष्मी दाराशी उभी राहून दार उघडण्याची वाट पाहत्येय, पण काय करणार ? यांच्या दारावर महाराजांचा सक्त पहारा! ते काही ह्यांना दार उघडू देत नाहीत.
  आपण एकदा यांना म्हटलं होतं, 'आपण स्वतः एवढे डॉक्टर झालात, पण आपली मुलं मँट्रिकपर्यंत तरी शिकतील की नाही देव जाणे !"
  "का बरं ? असं का वाटतं तुला ? मुलं चांगली हुषार आहेत."
  "पण त्यांच्या शिक्षणाला लागणारा पैसा ? तुमचं तिकडे लक्षच नाही. आपली फी नाममात्र. त्यात गोरगरिबांना औषध फुकट! बरं, त्यातूनही काही शिल्लक पडली तर ती तुम्ही वाटून टाकणार! परिणाम काय तर शिल्लक शून्य! अक्षरशः हातावरचं पोट !!"
  त्यावर हे बराच वेळ गप्पच राहिले. आपल्यालाही वाईट वाटलं. भावनेच्या आवेगात थोडं जास्तच कठोर बोललं गेलं होतं.
  जरा वेळानं म्हणाले, "खरं आहे तुमचं, अगदी रास्त आहे. पण मी तरी काय करणार ? माझा मी स्वतंत्र थोडाच आहे! मी आहे महाराजांचा 'अंकिला.' ते म्हणतील तसंच वागावं लागतं मला. रमा, अगं ते मला पैसा साठवू देत नाहीत. दर पंधरा दिवसांनी घरखर्चातून उरलेली रक्कम वाटून टाकायला सांगतात. एकदा माझ्या एका मित्रानं माझ्या नकळत माझ्या बँकेतल्या खात्यात काही पैसे भरले. महाराजांना ते कसं कळलं ते मला माहित नाही. पण ते मला त्यासाठी खूप रागावले. त्यांचं माझ्यावर बारीक लक्ष असतं. ते मला इकडे-तिकडे जाऊ देत नाहीत. हे असं असलं तरीही मी तुला सांगतो की, त्यांच्याच कृपेनं आपली मुलं उत्तम शिक्षण घेतील. पैशाअभावी त्यांचं शिक्षण अडून राहणार नाही. तू मुळीच चिंता करू नकोस."
  हे सगळं आठवून जीजी उदासवाणं हसल्या. मनात म्हणाल्या, 'चिंता कशी करू नको मी ? मला दिसतंय ना समोर सगळं ! आईचं मन यांना कसं कळणार ?' 
  डॉक्टरांना कळत नसलं तरी जीजींचं आईचं मन आणि अतिस्नेहानं त्यांना वाटणारी चिंता बैठकीत बसलेल्या महाराजांना कळली. दुसऱ्या दिवशी ते डॉक्टरांना म्हणाले, 'आम्ही आज तुला पार्थिव पूजा देतो. ती तू नियमानं करीत जा."
  डॉक्टरांनी होकार दिला. मग महाराजांनी वारूळातली माती, विभूती आणि इतर काही विशिष्ट द्रव्यं घालून शिवलिंग तयार केलं. डॉक्टरांच्या हातावर दिलं. डॉक्टरांनी ते उजव्या हातात घेऊन नंतर डाव्या हातावर ठेवलं.
  महाराजांनी रागावून पुन्हा शिवलिंग केलं. म्हणाले, "घे, आता नीट घे." तरीही डॉक्टरांनी पहिल्यासारखंच केलं. तेव्हा महाराज संतापून म्हणाले, "डॉक्टर! अरे, तुझ्या नशिबी संपत्ती नाहीच म्हणायची. डाव्या हातावर पार्थिव घेतलं असतंस तर तू खूप श्रीमंत झाला असतास आणि मी तुझ्या ऋणातून एकदाचा सुटलो असतो."
  "पण इथे संपत्ती हवीच आहे कुणाला ?"
  "अरे, मग तुला हवंय तरी काय, बाबा ?" महाराजांनी वैतागून विचारलं.
  "मला फक्त तुम्ही हवे आहात. फक्त तुम्ही. महाराज, तुम्ही माझा आणि माझ्या सात पिढ्यांचा सांभाळ करावा. आमच्या धनेश्वरांच्या घरात तुमचा वास नित्य असावा. तुमच्या रूपातला हा ईश्वरच धनेश्वरांचं धन!"
  बोलता बोलता डॉक्टरांना भरून आलं. डोळे पाणावले. त्या प्रेमौघात महाराजांचा राग विरघळून गेला. त्यांनी आशिर्वाद देत म्हटलं, "तसंच होईल डॉक्टर, तसंच होईल. माझा वास तुझ्यातच राहिल !".....क्रमशः ...

*लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी*

No comments:

Post a Comment