Monday, 14 January 2019

Tale 23

*⚪🌀⚪पुष्प = {५९},⚪🌀⚪*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची....*


  डॉक्टरांच्या जवळ एक शाडूचा बाळकृष्ण होता. ते त्याची नियमानं पूजा करीत असत. तो त्यांच्याशी बोले. त्यांनी दाखवलेलं नैवेद्याचं गूळ-खोबरं देव्हाऱ्यातून खाली उतरून खाई. त्याच्या या बाललीला पाहिल्या आणि त्याचे मधुर लाडके बोल ऐकले की डॉक्टरांना खूप आनंद होई. वाटे, 'आपल्या उत्कट भक्तीनं ही जड मूर्तीसुद्धा सजीव झालीय. पांडुरंगानं नामदेवांचा नैवेद्य ग्रहण केला होता तसाच माझा बाळकृष्णसुद्धा माझा नैवेद्य खातो आहे. वा ! आपण देवाच्या कसोटीला उतरलो म्हणायचे!'
  परंतु आताशा त्यांना पूर्वीसारखा आनंद होईनासा झाला. त्यांच्या मनात येई, हे सगळे माझ्या तरल कल्पनेचे खेळ तर नसतील ? एक दिवस त्यांचा हा संशय इतका बळावला की ते कृष्णाला म्हणाले, "हे जर खरं असेल तर मला काहितरी खूण दाखव. प्रत्यक्ष पुरावा दे."
  आणि आठ-दहा दिवसांनी त्यांना खूण मिळाली. बाळकृष्णानं त्यांच्यासमोर गूळ-खोबरं खाल्लं. खाऊन झाल्यावर परत देव्हाऱ्यात जाताना त्यानं आपल्या हातातलं सोन्याचं कडं काढून ताम्हनात ठेवलं. डॉक्टरांनी ते उचललं. त्यांच्या हातात प्रत्यक्ष वस्तू होती. म्हणजे 'ही कल्पना नाही. पण... पण हे निखळ सत्यसुद्धा नाही.' त्यांचं अन्तर्मन लगेच म्हणालं.
  डॉक्टर अस्वस्थ झाले. आत्मनिरीक्षण करू लागले. अन्तर्मुख होऊन ध्यानस्थ बसले. आणि त्यांना एकदम जाणवलं की, 'हा केवळ आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा खेळ आहे. एक प्रकारचा मायापाश आहे. आत्मानुभूतीच्या आनंदात अडथळा आणणारा हा अहंकाराचा एक अडसर आहे. छे... छे... या सिद्धीत, या सगुणात अडकता कामा नये!'
  या विचारासरशी डॉक्टर ताडकन् उठले. आणि त्यांनी इतके दिवस जीव की प्राण असलेला तो बाळकृष्ण खिडकीतून दूर भिरकावून दिला !
  त्याच क्षणी टाळ्या वाजवल्याचा आवाज आला. डॉक्टर वळून बघतात तो शंकरमहाराज दारात उभे ! लहान मुलासारखे आनंदानं टाळ्या पिटीत म्हणत होते, "मेला. मेला. डॉक्टरचा देव मेला !"
  डॉक्टरही मनापासून हसले. मनात म्हणाले, 'नुसता देवच नाही मेला महाराज, नामदेवाच्या तोडीचा भक्त झालो असं म्हणणारा तुमच्या डॉक्टरचा अहंकारही आज मेला. ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या त्याच्या !'
  
  नाथपंथाविषयी बोलताना महाराज म्हणाले, "या पंथात चार मुख्य गोष्टी आहेत. चार विषय आहेत. पिंडब्रह्मांडाचा परस्परसंबंध, शिवशक्तिविलास, कुंडलिनी योग आणि अजपा-जप म्हणजे सोऽहं साधना."
  याच्या मूळ शिकवणीचं सूत्र म्हणजे अनासक्ती.
  मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे घेऊन जाणारी मुक्तता. क्षणाक्षणात - वर्तमानात - जगण्याची कला. मागचं स्मरण नाही नि पुढचं चिंतन नाही.
  अशा सम-धी स्थितीत राहणं, जगणं आणि सर्व चराचरावर निरपेक्ष प्रेम असणं."
  वास्तविक धर्म, जात, कुळ-शीळ यांचा अंतिम मुक्तीशी कसलाही संबंध नाही. म्हणून आपल्यात जाती, धर्म, देश यांचं बंधन नाही. वर्णाश्रमाची आखीव चौकट नाही. वैयक्तिक मुक्ती साधून तिची आसक्ती न धरता, एकट्यानंच ब्रह्मानंदात न राहता मानवी हित साधनं, सर्वांना आनंदाची वाट दाखवणं हे सहजावस्थेत असणाऱ्या सिद्धाचं जीवनकार्य असतं. पडत्याला सावरीत, बुडत्याला काढीत आणि    दु:खिताला सुखवीत त्याची जीवनधारा वाहत असते. असा हा नाथसंप्रदाय अवघ्या जगात पसरलेला आहे."
  "जगात ? काय सांगता काय, महाराज ? आजवर आम्ही कधी ऐकलं नाही." भाऊराव धनेश्वर विस्मयानं म्हणाले.
  "ऐकलं नसाल ! पण हे सत्य आहे. अरे बाबांनो, लोकांच्या कल्याणासाठी झटणारी सर्व माणसं नाथपंथीच आहेत. मग ते शास्त्रज्ञ असोत, नेते असोत, समाजसुधारक असोत की संत असोत. त्यांचा बाह्य वेष, रंग, रूप कसंही असलं तरी त्या सर्वांची प्रेरक शक्ती आदिनाथ आहेत. ते त्यांचे अनुयायी आहेत. 'आ' हे उपपद 'मर्यादा' या अर्थी वापरलं आहे. 'आदि' म्हणजे अमर्याद. अनादी, अनंत."
  यावर काही वेळ कुणीच काही बोललं नाही. मग डॉक्टरांनी विचारले, "तुम्ही म्हणता ती प्रेरक शक्ती सामान्य माणसांना कशी कळावी ? त्यांना अमूर्त शक्ती उमगत नाही. त्यांना हवी असते सगुण मूर्ती. मलासुद्धा नवनाथांना पाहावं असं वाटतं. पण ते कसे भेटणार ? त्यांना तर देह नाही."
  "नसला म्हणून काय झालं ? तेज, वायू आणि आकाश या तत्त्वांत संचार करणारे सिध्द पुरुष त्यांच्या संकल्पानं केव्हाही देह धारण करू शकतात."
  "हे कसं शक्य आहे ? देह ठेवलेला माणूस पुन्हा कसा दिसेल ?"
  "दिसतो. दिसतो. दिसतो. बोल, तुला कुणाला भेटायचं आहे ."
  "नवनाथांपैकी कुणीही."
  "ठीक आहे. उद्या तुला मीननाथ दिसतील. तुला प्रत्यक्षात भेटतील. तुझ्याशी बोलतील."
  "कुठे ? वृद्धेश्वराला की महिंबाला ?"
  "छे... छे..." महाराज हसून म्हणाले, अरे डॉक्टर, इथे या आपल्या बैठकीत येऊन बसतील. त्यांच्या स्वागताची तयारी मात्र उत्तम करा."
  डॉक्टरांच्या उत्सुकतेनं त्यांना रात्रभर झोप येऊ दिली नाही. सकाळी लवकर उठून त्यांनी हाँल सुशोभित केला. तीन-चार खुर्च्या समोरासमोर व्यवस्थित मांडून ठेवल्या. आणि मग सगळी मंडळी मीननाथांच्या वाटेकडे डोळे लावून बसली.
  बरोबर नऊ वाजता जवळजवळ सात फूट उंचीचा, सुदृढ देहयष्टीचा, गौर अंगकांतीचा, तेजस्वी डोळ्यांचा, अंगावर मृगाजिन पांघरलेला असा एक भव्य पुरूष दरवाजातून आत आला. 
  महाराजांनी पुढे होऊन त्यांना विनयपूर्वक प्रणाम केला. त्यांचं स्वागत करून त्यांना आसनस्थ व्हायची विनंती केली.
  ते स्थानापन्न झाल्यावर डॉक्टरांनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. महाराज म्हणाले, "हे नागेश धनेश्वर. यांना आपल्या दर्शनाची फार ओढ लागली होती."
  नाथांनी किंचित स्मित केलं. आशीर्वादाचा हात उंचावला. मग ते एखाद्या नेहमी घरी येणाऱ्या परिचित माणसासारखे सर्वांशी मोकळेपणानं बोलू लागले. डॉक्टरांच्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरं दिली. योगासंबंधी बरंच काही सांगितलं.
  भाऊंनी खूण करताच डॉक्टरांच्या पत्नी, रमावहिनी यांनी गरमगरम केशरी दूध आणलं. आणि त्यांना वाकून नमस्कार केला. नाथांनी त्यांना हात उचलून वरदमुद्रेनं आशीर्वाद दिला, "अखंड सौभाग्यवती भव:।"
  दूध प्राशन करून मीननाथ उठले. 'आदेश!' म्हणून त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. डॉक्टरांनी पुन्हा त्यांना नमस्कार केला आणि ते त्यांना पोचवायला निघाले. मीननाथ दरवाजातून बाहेर पडले. पायऱ्या उतरू लागले. आणि नवल घडलं. त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या डॉक्टरांच्या डोळ्यादेखत ते पायरीवरच अन्तर्धान पावले.
  डॉक्टर तिथल्या तिथेच मंत्रमुग्ध होऊन खिळल्यासारखे झाले. तेवढ्यात महाराजांनी त्यांच्या पाठीवर जोरात थाप मारून विचारलं, "काय ? पटली ना खात्री तुझी ? आता कळलं ना की महायोग्याला देह ठेवल्यानंतरही पाहिजे तेव्हा देह धारण करता येतो म्हणून ?"
  डॉक्टरांनी मानेनंच होकार दिला. मनात म्हणाले, "सारंच अतर्क्य! अदभूत!!
  महाराजांच्या बोलावण्यानं मीननाथ आले. अतिपरिचयानं महाराजांची योग्यता नि त्यांचा अधिकार आपल्या ध्यानातच येत नाही !"...क्रमशः ....

  *लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी*

No comments:

Post a Comment