Monday, 14 January 2019

Tale 18

शबरीमला
********

सुमारे 12 व्या शतकात शबरीमला या केरळच्या अति प्राचीन मंदिरात वय वर्षे १० ते वय वर्षे ५० या वयातील स्त्रियांना प्रवेश निषिद्ध केला गेला.  आज आपण एकविसाव्या शतकात आहोत.  म्हणजे सुमारे 800 वर्षे ही प्रथा भाविकांकडून पाळली जात आहे. 

या वर्षाच्या सुरुवातीला ऊर्जावर लिहिलेल्या एका लेखामध्ये आपण वाचलं होतं की 2018 हे वर्ष आणि या पुढील येणारा काळ स्त्री तत्त्वाच्या जागृतीचे (Rise of divine feminine) वर्ष असणार आहे.  त्या प्रमाणे या वर्षात 3 तलाकच्या विरोधात सुप्रीम कोर्टाचा निकाल,  स्त्रियांना समान दर्जा देणारे सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे निकाल,  मी टू चळवळीला आरंभ इत्यादी महत्वाच्या घटना घडल्या.  स्त्रीच्या मनातील जागृतीला सुरवात झाली आहे, पण त्याच बरोबर शबरीमला सारख्या घटनांमध्ये त्या परंपरेची वैज्ञानिक किंवा दुसरी बाजू लक्षात न घेता आपण केवळ स्त्री पुरुष समानता या नावाखाली कृती करतो आहोत का, हे ही लक्षात घेतले पाहिजे.  

केरळ मध्ये जन्मलेल्या आणि सध्या अमेरिकेत स्थित कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर निशा पिल्लाई यांचा एक व्हीडीओ या संदर्भात वायरल झाला आहे.  जो शबरीमलाला महिलांना जायला परंपरागत का प्रतिबंध केलेला आहे, यासंदर्भात प्रकाश टाकतो.  यातील काही महत्वाचे मुद्दे खाली देत आहे.

1.  भारतातील सर्व प्राचीन मंदीरे, जी शक्तीस्थळं म्हणून ओळखली जातात, ती- जिथे वैश्विक प्राणशक्ती एकवटली जाते अशा उच्च मॅग्नेटिक फिल्ड असलेल्या भूभागावर बांधलेली आहेत.  इतर धर्मातील प्रार्थना स्थळांचे तसे नाही.  

2.  असे मंदिर उभारून झाल्यावर अध्यात्मिक अधिकारी व्यक्ती कडून त्यातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून (consecration ceremony) विश्वातील लाईफ फोर्स एनर्जी त्या मूर्तीमध्ये स्थापित केली जाते.  या प्रक्रियेनंतर  ते मंदिर केवळ एक प्रार्थनास्थळ न रहाता एक पवित्र शक्तीस्थळ बनते. 

3.  ज्याप्रमाणे एखाद्या मोबाईल मध्ये सॉफ्टवेअर, हार्डवेअर, बॅटरी इ. वेगवेगळे घटक असतात, त्या प्रमाणे आपले आपल्या स्थूलशरीरा व्यतिरिक्त सूक्ष्म रुपात अनेक पातळ्यांवर अस्तित्व आहे.  आधुनिक वैद्यकीय विज्ञानाची झेप अद्यापही फक्त स्थूल शरीरा पर्यंतच जाते, मन, आत्मा किंवा आपली ऊर्जा शरीरे यांच्या बद्दल ते अनभिज्ञ आहे. 

4. आपल्या मज्जासंस्थेला (नर्व्हस सिस्टीम) पॅरॅलल असणाऱ्या 72000 नाड्यांमधून वैश्विक प्राणशक्ती कार्य करते. 

5. या नाड्यांच्या संयोगातून आपल्या शरीरात प्राणशक्तीचे वहन होण्यासाठी 7 चक्र (एनर्जी सेंटर्स) बनलेली आहेत.  प्रत्येक मानवात ही प्राणशक्ती मूलाधार चक्रात स्थित असते. 

6.  हिंदू धर्मात आपल्या मंदिरांचे महत्व यासाठी आहे, की तेथे जाऊन मुलाधारातून आपली  ऊर्जा (जी खालच्या पातळी असते) ती वर उचलली जाण्यास मदत होते.  

7. प्रत्येक मानवाच्या शरीरात पाच प्रकारचे 'वायू' आहेत.  ते म्हणजे, प्राण, समान, अपान, व्यान, उदान.   याच बरोबर "प्रसूती" हा उप-वायू सुद्धा आहे, जो अधोमुखी असून स्त्री च्या गर्भाशयात स्थित असतो, ज्याला निगेटिव्ह चार्ज असतो, आणि जो प्रसूतीच्या वेळेस बाळाला जन्म देण्यासाठी सहाय्यीभूत ठरतो.   स्त्रीच्या मासिक धर्माच्या वेळेस हाच वायू कार्यरत असतो, जो मेन्स्ट्रुअल ब्लड हृदयाकडे न नेता,  शरीरा बाहेर नेण्याचे कार्य करत असतो.   

मासिक पाळी दरम्यान स्त्रीने मंदिरात जाऊ नये, किंवा पूजा अर्चना किंवा धार्मिक विधींमध्ये भाग घेऊ नये, याचे वैज्ञानिक कारण हेच आहे, की या काळात अधोमुखी आणि निगेटिव्ह चार्ज असलेला "प्रसूती वायू' जो स्त्रीच्या शरीरात प्रबळ असतो आणि रक्त बाहेर आणण्याचे कार्य करत असतो, तर  प्राचीन मंदिरे आणि आपल्या धर्मातील धार्मिक विधी, हे आपल्या शरीरातील ऊर्जा खालच्या पातळी वरून वरच्या पातळीवर नेण्याचे कार्य करतात.  हे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध होऊन गर्भाशयाच्या कार्यपद्धतीत अडथळे येऊन त्या स्त्री ला वंध्यत्व अथवा इतर आजार उद्भभवू शकतात. 

8.  शबरीमला येथे स्थित भगवान अय्यप्पा यांनी ब्रह्मचर्य स्थिती धारण केलेली असून हे मंदिर वर्षातून काही मोजके दिवस दर्शनासाठी खुले होते.  तसेच, शबरीमला यात्रेच्या आधी 42 दिवस साधकाला काही कडक नियम पाळावे लागतात.  ही यात्रा मानवाला त्याच्या अध्यात्मिक प्रवासात एकेक पातळी पुढे नेणारी यात्रा आहे.  शबरीमला ही अशी यात्रा आहे, की जिथे सहभागी होण्यासाठी धर्म, जात पात याचे बंधन नाही.  हिंदू धर्मीयांप्रमाणेच अन्य अनेक धर्माचीही माणसे यात सहभागी होतात. सवर्ण-दलित, उच्च नीच, हिंदुधर्मीय-अन्याधर्मीय हा भेदभाव इथे पाळला जात नाही.  प्रत्येकजण आपल्या अध्यात्मिक पातळी द्वारे इथे पूजा विधी lead करतो. 

9. आपल्या शरीरातील पेशींचे पुनर्निर्माण होण्यास 21 दिवसांचा काळ लागतो.   शबरीमला यात्रेला जाण्यासाठी 21 दिवसांची अशी 2 सायकल्स साधकांना पाळणे बंधनकारक असते.  या 42 दिवसात साधकांनी सांगितलेले नियम पाळल्याने  त्याच्या शरीर आणि मनाची पूर्णपणे शुद्धी होते.  

स्त्रियांना मासिक धर्मा मुळे सलग 42 दिवस हे नियम पाळणे शक्य नसते. 

10.  लॉर्ड अय्यप्पा च्या शबरीमला या मंदिरात स्त्रियांना जाण्यापासून प्रतिबंध करण्याचे अत्यंत मूर्ख पणाचे एक कारण  हे सांगितले गेले की शबरीमला येथील भगवान अय्यप्पा यांनी ब्रह्मचर्य धारण केलेले असल्याने त्यांचे  ब्रह्मचर्य भंग होते, म्हणून कुठल्याही स्त्रीची उपस्थिती तिथे मान्य नाही.  अय्यपाने कुठल्याही स्त्रीला तिथे येण्यापासून कधीही रोखलेले नाही.  पण स्त्रीच्या शरीराची रचनाच निसर्गाने अशी केलेली आहे, की तिच्या शारीरिक ऋतुबदलांचे भान न ठेवता जर तिने केवळ स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली काही कृती केली, तर नुकसान तिचेच आहे.   या परंपरा आपल्या धर्माने स्त्रीचे आरोग्य जपण्यासाठीच केलेल्या आहेत. 

आज जो काही गोंधळ शबरीमला मध्ये स्त्रियांना प्रवेश मिळण्या बाबत चाललेला आहे, त्या पार्श्वभूमीवर या प्राचीन परंपरेमागील ही वैज्ञानिक बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे. 

हे झाले शबरीमलाच्या संदर्भात. 
पण या लेखाच्या अनुषंगाने, स्त्रीच्या ऋतुबदला बाबत "ऊर्जा" वरील सर्व स्त्री वाचकांशी काही शेअर करावेसे वाटते.  

मासिक पाळीच्या दिवसात देवाचे पूजन करू नये किंवा मंदिरात जाऊ नये, किंवा धार्मिक कार्य करू नये हा नियम आपल्या कडे पूर्वापार आहे.. पण याचे शास्त्रीय कारण कुणी सांगितले नाही.  

मासिक पाळी ही एक नैसर्गिक गोष्ट मानली तरी जेव्हा ती सुरु होते, तेव्हा स्त्री चे स्वाधिष्ठान चक्र ओव्हर ऍक्टिव्हेट आणि सेनसिटीव्ह झालेले असते.  ज्या देवघरात, किंवा मंदिरात किंवा एखाद्या सार्वजनिक स्थानी जिथे धार्मिक पूजा विधी सुरू आहेत अशा स्थानी - जिथे ऑलरेडी खूप उच्च वाईब्स आहेत, अशा ठिकाणी पूजा किंवा अन्य धार्मिक विधीत सहभागी झाले, तर मासिकधर्म सुरू असलेल्या स्त्रीचे स्वाधिष्ठान आधीच ओव्हर ऍक्टिव्हेट असल्याने  अशा वेळी ते प्रमाणाच्या बाहेर तिथली ऊर्जा ग्रहण करेल आणि पाळीचा फ्लो खूप वाढेल.  तिला त्रास होऊ शकेल, हेही या मागील कारण असू शकेल.  अगदी नामस्मरण, किंवा एखादा धार्मिक ग्रंथ/पोथी वाचणे यानेही हे होऊ शकते. 

तसेच, दुसरे अतिशय महत्वाचे कारण म्हणजे,  मासिक पाळीत स्रवणाऱ्या स्त्रावामधे बाहेरच्या वातावरणातील चांगल्या किंवा वाईट वाईब्स खेचून घेण्याची शक्ती असते..  (याच कारणा मुळे तांत्रिक पंथा मध्ये यासाठी अशा स्त्रीची पूजा करून वाईट शक्तींना प्रसन्न करण्यासाठी काही अघोरी विधी केले जातात. यावर अधिक खोलात शिरत नाही)  पण वातावरणातील चांगल्या किंवा वाईट वाईब्स खेचून घेण्याची शक्ती यादरम्यान त्या स्त्रीमध्ये वाढलेली असल्याने, मासिक पाळी मध्ये, रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत बाहेर राहणे, किंवा वाईट स्पंदनं असलेल्या जागी जावं लागणे, या सारख्या गोष्टींनी  बाहेरची बाधा, किंवा निगेटिव्हीटी लागण्याची शक्यता खुप वाढलेली असते.

अगदी चार लोकां मध्ये, किंवा ऑफिस, पार्टी, फंक्शन ई. मध्ये वावरताना सुद्धा अशी स्त्री इतरांची नेगेटिव्हीटी, बॅड मुड्स, low vibes सहज शोषून घेते.  आणि त्यानंतर स्वतःचे एनर्जी क्लीनिंग किंवा सेल्फ हिलींग केले नाही तर त्याचा तिच्या शारीरिक मानसिक आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतो.   हे टाळण्या  साठी पूर्वी बाजूला बसणे, हा concept असावा.   ज्यांची एनर्जी सेनसिटीव्हीटी जास्त असते, त्यांना हा अनुभव येतो.  त्यामुळे केवळ मॉडर्न किंवा सुधारक विचारांच्या नावाखाली या काळात कुठलेही बंधन न पाळता स्वैर वागू नये.  

याचबरोबर, याच्या दुसऱ्या बाजूचाही विचार करू.  सध्याच्या काळात अगदी बाजूला बसणे वगैरे शक्य नाही, आणि वैज्ञानिक बाजू व्यतिरिक्त या बाबतीत खूप अंधश्रद्धा, गैरसमज, पाळणुकीच्या अनेक अयोग्य पद्धती आपल्या समाजात आहेत.  त्यामुळे, एक समतोल सांभाळत, आपण मासिक धर्मामधे मानत/ करत/पाळत असलेल्या प्रत्येक गोष्टी बाबत ज्ञान करून घ्यावे आणि मगच त्या फॉलो कराव्यात.   

निसर्गतःच स्त्री आणि पुरुष या दोघांना वेगवेगळी शारीरिक जडणघडण लाभलेली आहे.  स्त्री पुरुष समानता म्हणजे या "वेगळे" पणाला पूर्णपणे धुडकावून लावून पुरुषांप्रमाणे सर्व गोष्टी करणे नव्हे.  तर आपल्या शरीराला, आपल्यातील स्त्रीतत्वाच्या शक्तीला ओळखणे, तिला जागृत करणे आणि सन्मानित (honour)करणे ही खरी समानता म्हणता येईल.  



©वैशाली देशपांडे
27.11.2018

No comments:

Post a Comment