Monday, 14 January 2019

Tale 26

 *⭕⚪⚪पुष्प = {६३},⚪⚪⭕*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*


  महाशिवरात्रिचा दिवस.         मेहेंदळेवाड्यात महाराज बसले होते. रावसाहेब, ताईसाहेब, डॉ. धनेश्वर, मोतीवाले पंडित अशी बरीच मंडळी त्यांच्या भोवती बसली होती. बापूही महाराजांना नमस्कार करून बसला. महाराज त्याला म्हणाले, 'काय बाप्या, तुला आमचा वैरी पहायचाय ? हा बघ." असं म्हणत त्यांनी डॉक्टर धनेश्वरांकडे बोट दाखवलं.
  बापू गोंधळला. कारण त्याला पक्कं माहीत होतं की डॉक्टर महाराजांचे अंतरंग शिष्य आहेत. अत्यंत आवडते आहेत. मग त्यांना महाराज असं 'वैरी' का म्हणताहेत ?
  बापूनं प्रश्नार्थक मुद्रेनं डॉक्टरांकडे पाहिलं. पण ते त्याच्या अपेक्षेप्रमाणे रागावले नव्हते. उलट हसत होते. म्हणाले, "होय बापू. मी त्यांचा वैरीच आहे. ज्ञानेश्वरीत आहे ना, 'मी येऊनियां वरी तयातें।' तसं मी त्यांना वरलं आहे. अरे, तुझ्या जन्माआधीपासून मी त्यांना वरलं आहे. तुला माहित आहे, हे मला 'न्हावी' सुद्धा म्हणतात."
  "न्हावी ? हे म्हणजे भलतंच झालं!"
  "भलतं नाही बरं, 'न-हवं' म्हणणारा तो न्हावी. मी मला सिद्धीबिद्धीतलं काहीही नको नको म्हणतो ना म्हणून मी 'न्हावी."
  हे ऐकून महाराज मोठ्यानं हसत म्हणाले, "तेवढंच कारण नाही डॉक्टर, आमच्याकडे कुणी अहंकारानं फुगून आला की त्याला आम्ही तुझ्याकडे पाठवतो आणि तू त्याची 'बिनपाण्यानं' हजामत करतोस. म्हणूनही तू आमचा न्हावी आहेस!"
  बापूला या शब्दफोडीची मोठी गंमत वाटली. तो मनात म्हणाला, 'आपल्यालासुद्धा वैरी झालं पाहिजे. आपलीसुद्धा साधना तशी कमी नाही.'
  त्याच्या मनातला साधनेचा अहंकार ओळखूनच की काय त्याला आणखी फुलवण्यासाठी महाराज म्हणाले, "या बाप्याकडे बघ, डॉक्टर. गळ्यातली शृंगीशैली कशी मिरवतो आहे. उगीच नाही नाथपंथाची दिक्षा घेतलेला आहे. 'ज्ञाननाथ' म्हणतात त्याला."
  बापू अतिशय सुखावला. त्यानं उगीचच गळ्यातली शैली सारखी केली. 
  डॉक्टरांनीही त्याच्याकडे कौतुकानं पाहत म्हटलं, "लहान वयात मोठाच अधिकार मिळवला आहे यानं !"
  तेवढ्यात ताईसाहेब म्हणाल्या, 'महाराज, आज महाशिवरात्र आहे. स्नानाची वेळ झालीय. येता ना ?"
  "नाही. आम्ही नाही स्नान करणार!"
  "तसं कसं, महाराज ?"
  "नाही करणार आम्ही स्वतःहून स्नान ! तुम्हांला घालायचं असेल तर घाला !"
  "बरंऽ, आम्ही घालतो. चलावं."
  मग सर्वांनी महाराजांना न्हाणीघरांत नेलं. तेल लावलं. सुगंधी जलानं स्नान घातलं.
  महाराज नि:संकोचपणानं हसत-खेळत सगळे सोपस्कार करून घेत होते. देह पुरुषाचा, पण भाव बालकाचा. निरागस, निष्पाप.
  रेशमी वस्त्रं नेसवून त्यांना आसनावर आणवून बसवलं. तेव्हा त्यांच्या दैवी मुद्रेकडे पाहत ताईसाहेब उत्स्फूर्तपणानं उदगारल्या,
  "आज आपण महाराजांनाच बेल वाहू या. शिवरात्र, शिवपूजन, प्रत्यक्ष शिवार्चन! होय ना. महाराज ?"
  "होय... होय. मैं शिव हूँ ! मैं शिव हूँ! कैलास का रहनेवाला-आज शिवरात्र. मी आज कुणाचा तरी जीव घेणार! कुणाला तरी मारणार !"
  असं म्हणत गूढपणानं हसणाऱ्या, डोलणाऱ्या, तेजानं झळाळणाऱ्या महाराजांना सर्वांनी बेल वाहिला. नमस्कार केला. त्यांच्याबरोबर बापूसुद्धा पुढे होऊन बेल वाहू लागला. तेवढ्यात त्याला थांबवीत महाराज कडाडले, "भडव्या! तू कसला रे नाथपंथी ? तुझा गुरु भीकमांग्या नि तुझा आद्यगुरू स्त्रिलंपट! विषयसुख भोगणारा!! नाथपंथ - म्हणे नाथपंथ -"
  बापू संतापानं लाल झाला. गुरूनिंदा त्याला ऐकवेना. तो तिथून तिरीमिरीनं बाहेर पडला आणि सरळ बाबांच्यासमोर जाऊन उभा राहिला. त्याच्या क्रोधित अवताराकडे बाबांनी निरखून पाहत शांतपणानं म्हटलं, "गोरोबाचं थापटणं कसं काय वाटलं? सोनारानं कान टोचलेलेच बरे असतात."
  बापू उमजला. त्याच्या लक्षात आलं- महाराजांनी आज त्याचाच जीव घेतला. त्याच्या अहंकाराचा देठ खुडला होता. संप्रदायाचा फाजील अभिमान घालवला होता.
  बापू मग संध्याकाळी वाड्यात आला तो पश्चात्तापानं दग्ध होऊन. खालमानेनं. जिन्यातूनच त्याला वर चाललेल्या भजनाचे शब्द ऐकू   आले...
"शंकरा, आवड तुला बेलाची।
 अहंकाराचा दांडा तोडुनी जे त्रिदल वाहती॥
 त्यांना तू नेसी त्रिगुणापरती।
 शंकरा, आवड तुला बेलाची ॥"

  त्रिगुणाची तीन पानं आणि अहंकाराचा देठ असं बेलाचं पान ते वाहायचं. झाडाचं पान हे केवळ प्रतीक.
  बापू आवेगाने वर गेला. त्यानं महाराजांच्या पायांना घट्ट मिठी घातली. त्याला उठवीत, त्याचे डोळे पुसत महाराजांनी त्याला कुरवाळलं. मोठ्यानं हसले आणि हसता हसताच उन्मनीत गेले. उदगारले, 'आज महाशिवरात्र. मंदिर एकदाच उघडतं. एकदाच !'
  मंडळी अवाक होऊन ऐकत होती. आणि त्यांच्या लक्षात महाराजांच्या शब्दांचा अर्थ येण्याआधीच महाराजांचा देह निळ्या रंगानं प्रकाशू लागला. त्यात 'शाळुंका' झळकू लागली. शिवरूप प्रकट झालं. महाराजांची मुद्रा वृद्धेश्वराच्या स्वयंभू लिंगासारखी दिसू लागली. त्या अभूतपूर्व दर्शनानं ती महाशिवरात्र चिरंजीव झाली! शिवभक्तांना उद्धरून गेली !!.....क्रमशः ...

 *लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी*

No comments:

Post a Comment