*☘⚪पुष्प = {७०},⚪☘*
*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*
महाराजांना पत्त्यांचा छंद होता. त्यांना खेळायची लहर आली की ते भेटायला आलेल्या माणसाला पत्ते खेळायला बसवीत. असेच एकदा कोराड मास्तर, श्री. भस्मेकाका आणि रघू यांच्याबरोबर महाराजांनी पत्त्यांचा डाव मांडला होता.
खेळता खेळताच रघूच्या मनात आलं, 'पत्ते खेळणं काही फारसं चांगलं नाही. पण महाराज का खेळतात ?'
महाराज रागावतील म्हणून त्याने हा प्रश्न मनातच ठेवला. परंतु त्याच वेळी महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. ते किंचित हसले. त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले, "हा पत्त्यांचा डाव वाईटच. होय ना रे ? पण तो त्याचा अर्थ न कळणाऱ्यांना."
अर्थ ? पत्त्यांना कसला अर्थ असणार ?
असा विचार रघू करतो आहे तोच महाराज पुढे म्हणाले, "अरे बाबा, याचा अर्थ गूढ आहे."
महाराजांनी एकेक पान समोर ठेवीत म्हटलं -
ही दुर्री = म्हणजे पृथ्वी आणि
आकाश.
तिर्री = ब्रह्मा, विष्णू, महेश.
चौकी = चार वेद.
पंजी = पंचप्राण.
छक्की = काम, क्रोध हे सहा विकार.
सत्ती = सात सागर.
अठ्ठी = आठ सिद्धी.
नव्वी = नऊ ग्रह.
दश्शी = दहा इंद्रिये, पाच कर्मेंद्रिये,
पाच ज्ञानेंद्रिये.
गुलाम = आपल्या मनात येणाऱ्या
वासना, इच्छा. माणूस
त्यांचाच गुलाम होऊन
राहतो.
राणी = माया.
राजा = या सर्वांवर स्वार होऊन
त्यांना चालवणारा.
आणि एक्का = विवेक. माणसाची
सारासार बुद्धी. या सर्व खेळ खेळाला स्वाधीन ठेवणारा.
काय रे ? डोक्यात शिरलं का काही?"
आता या लहानग्याला काय कळणार ? त्यानं गोंधळून एकदा होकारार्थी मान हलवली. एकदा नकारार्थी मान हलवली.
महाराज हसले. मास्तरांना म्हणाले, "तुम्ही सांगा याची फोड करून!"
"मला सुद्धा नीटसं नाही सांगता यायचं. पण प्रयत्न करतो. दश्शीवर दबाव असतो गुलामाचा. वासनाच इंद्रियांना नाचवते. वासना उत्पन्न होते मायेमुळे, तिच्या नादानं वाहावत जातं ते माणसाचं मन. माणूस. तो राजा, पण या राजालाही मुठीत ठेवू शकतो, त्याला अंकुश लावू शकतो तो विवेक- हुकुमाचा एक्का म्हणजेच सदगुरू!"
"बरोबर." महाराज म्हणाले, "समोरचा भिडू म्हणजे प्रारब्ध! त्याच्या हातातले पत्ते आपल्याला माहित नसतात. पण त्याच्या मदतीने आपण डाव जिंकण्याचा प्रयत्न करतो. जीवन जगतो."
"आणि आपल्या विरुद्ध असणारे ते कोण ?" भस्मेकाकांनी विचारलं.
"आयुष्यात आपल्याला विरोध करणारे, आपल्याला आव्हान देणारे. पण या सर्वांना आपण जिंकू शकतो ते कशाच्या जोरावर ?"
भस्मेकाका एकदम उदगारले, "सदगुरुंच्या जोरावर, विवेकाच्या जोरावर. सदगुरुसारिखा असता पाठीराखा। इतरांचा लेखा कोण करी?"
महाराजांनी समाधानाने मान डोलावली. रघूला माया, ब्रह्म, वासना यांतलं काही फारसं कळलं नाही. त्याला एवढंच कळलं की, सदगुरू म्हणजे आपले महाराजच. ते आपल्याला सांभाळणार आहेत आणि त्यांची सतत आठवण हेच नाम.
एकदा भस्मेकाकाच त्यांना म्हणाले होते की, "रघू, त्यांची सतत आठवण राहणं म्हणजे नाम. ते आपण करावं. महाराजांना फार आवडतं. त्यांनी तसं काव्यही केलं आहे. खरं म्हणजे आम्हाला ते माहीतच नव्हतं. पण एक दिवस नगरच्या सोनावणे मास्तरांना महाराज म्हणाले होते,
"जनार्दन, तुझ्या या भक्तिरसामृतात आमचंही एक भजन घाल."
मग भस्मेकाका स्वतःच ते भजन गुणगुणू लागले...
"नरा संसारी, घे दत्तनाम ललकारी॥धृ.॥
बहुत जन्मींचा तो साठा। म्हणोनी नरजन्माचा हा वाटा।
समजूनी दवडशी का रे नाठा। होई अधिकारी, घे ॥१॥
होई सावध झडकरी देही। तरणोपाय भजनाविण नाही।
शंकरबाबा देती ग्वाही वचन अवधारी, घे॥२॥"...क्रमशः ...
*☘ लेखन: श्रीमती मृणालिनी जोशी☘*
No comments:
Post a Comment