Monday, 14 January 2019

Tale 24

 *⚪💢⚪पुष्प = {६०},⚪💢⚪*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*

  महाराजांच्या हातात दारूचा पेला बघून डॉक्टरांच्या मनात आलं, 'हे एवढे ज्ञानी, महायोगी. तरी या व्यसनात का बरं अडकले आहेत ?'
  "अडकलो नाही डॉक्टर, आम्ही कशातही अडकलो नाही." दारूचा घोट घेत घेतच महाराजांनी डॉक्टरांच्या त्या न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. "आणि हे सिद्ध करण्यासाठीच आम्ही प्रथम दारूला स्पर्श केला. बरेच वर्षांपूर्वीची गोष्ट. परिव्राजक होऊन देशभ्रमण करीत असताना आम्ही बंगालमध्ये गेलो होतो. तिथे आमची काही तांत्रिकांशी गाठ पडली. तेव्हा या विषयावर चर्चा करता करता एकानं आम्हाला आव्हान दिलं. म्हणाला, उगीच कशाला योगाच्या आणि 'संयमा'च्या गप्पा मारता ? आमच्या 'पंचमकारां'च्या साधनेनं आम्ही जो 'इंद्रियजय' साधतो तो जमतो का तुम्हांला ? बाकीचं राहू दे... पण मदिरेच्या चार घोटांत तुम्ही झिंगून पडाल !"
  "आम्ही मग इरेला पडलो. म्हणालो, "तसा प्रयोग आम्ही नाही केला अजून. तुमच्यासारखा आमचा अभ्यासही नाही. पण आमची श्रद्धा आहे की, 'मनोलया'नं आम्ही सुद्धा तुमच्याइतकेच अखंड जागृतीत राहू शकतो. चेतनेचा स्तर इतका उंचावतो की तिच्यावर कुठल्याही विषयवृत्तीचा परिणाम होत नाही. ती कुणाच्याही आहारी जात नाही."
  "असं ? मग घ्या ही मदिरा. प्या आमच्या बरोबरीनं. प्रत्यक्ष प्रमाणानंच सिद्ध करा तुमचं विधान."
  "आम्ही हे आव्हान स्वीकारलं. सदगुरुंचं स्मरण केलं आणि दारूचा पहिला पेला ओठाला लावला."
  डॉक्टर विस्मयचकित होऊन सारं ऐकत होते. त्यांनी विचारलं, "मग ? तिचा अंमल -"
  "नाही चढला आमच्यावर. आम्ही त्या तांत्रिकाइतकं मद्य घेऊनही 'सावध' राहिलो. मद्याचा परिणाम होणाऱ्या देहामनाच्या पार जाऊन, 'जागृत' राहिलो.
  आणि मग... अधूनमधून घेत राहिलो."
  डॉक्टरांच्या मनात तरीही एक शंका होती. डॉक्टरांचा आणि महाराजांचा संबंध इतका जवळचा होता की ते आपल्या मनातला कसलाही प्रश्न त्यांना निर्भीडपणानं विचारू शकत असत. आताही त्यांनी विचारलं, "महाराज, आपण ज्ञानेश्वरीला आपला प्राण म्हणता, माउलीचा शब्द प्रमाण मानता.
  तिनं तर स्पष्टच म्हटलंय, 'अलौकिक नोहावें लोकाप्रती'- चार-चौघांसारखं वागावं. मग... ही दारू... सिगरेट... कशाला ? त्या तांत्रिकाच्या आव्हानापुरतं ठीक झालं, पण आता का ? आपली वागणूक अशी विचित्र का ?"
  "कारण ? कारण आम्हांला समाजात घातक ठरणाऱ्या रूढी बदलायच्या आहेत. खरा धर्म एकच- प्रेमाचा. जात-पात, उच्चनीच असं खऱ्या अध्यात्मात नसतं. व्रत-वैकल्य, कर्मठपणा म्हणजे धर्म नव्हे हे आम्हांला लोकांना सांगायचं आहे. स्वार्थापोटी, वासनेपोटी देवघेव करणाऱ्या पाखंडी माणसांचे डोळे उघडायचे आहेत आम्हांला."
  "ते खरं. पण महाराज, हेच काम ज्ञानेश्वरमहाराज, नामदेवमहाराज, तुकाराममहाराज, एकनाथमहाराज या संतांनी सामान्यांसारखं वागूनही केलंच ना ?"
  "होय,पण साधूसंतांची रीत वेगळी. अवधूत-अवलियांची रीत वेगळी. कारण कुणाला गोंजारून कळतं तर कुणाला फटकारून कळतं. कुणाला ओव्यांची भाषा कळते, तर कुणाला शिव्यांची भाषा कळते. म्हणून उपायही निरनिराळे करावे लागतात. तुला एका शब्दात सांगायचं तर ही आहे शाँक ट्रीटमेंट. 'धक्का-तंत्र'. जिथे सरळ साध्या गोड शब्दांची मात्रा चालत नाही तिथं शिव्या द्याव्या लागतात. थोबाडीत माराव्या लागतात. देहामनाला अनपेक्षित असे जबरदस्त धक्के द्यावे लागतात. त्याशिवाय वेड्यांची डोकी ताळ्यावर येत नाहीत.
  तू डॉक्टर आहेस. तुला आमचं म्हणणं पटेल. माणसाला स्वास्थ्य लाभावं हा एकच उद्देश मनात धरून डॉक्टर काम करतात. जशी ज्याची प्रकृती तसं त्याला औषध देतात. वास्तविक औषध एकच असतं. पण कफ, पित्त, वात, यांचा विचार करून त्या औषधाचं 'अनुपात' ठरवावं लागतं. तसंच आहे त्या विश्वनियंत्याच्या योजनेचं.
  माणसाला आपल्या स्वरूपाची ओळख व्हावी, त्यानं अन्तर्मुख व्हावं, स्वतःचा शोध घ्यावा हा परमेश्वराचा एकच उद्देश असला तरी त्यासाठी तो वरवर परस्परविरोधी वाटणाऱ्या व्यक्तींची नियुक्ति करतो. कधी तो सात्त्विक साधूसंतांची नेमणूक करतो, तर कधी लोकांवर कडकपणानं प्रहार करणाऱ्या अवधूत-अवलियांची योजना करतो.
  आणि आम्ही ? आम्ही त्याच्या आदेशानुसार त्रिगुणातीत राहूनही सात्त्विक, राजस, तामस या त्रिगुणांतून खेळ करीत असतो. दिलं सोंग संपादित राहतो. दिली भूमिका रंगवीत राहतो. अभिनय करीत राहतो.
  बस्सऽ, एक लीला... लीला !.. क्रमशः ...

  *🌿 लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी 🌿*

No comments:

Post a Comment