*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची..*
या अकल्पित घटनेनंतर उभयता पतिपत्नींचं सबंध जीवनच बदलून गेलं. त्यांनी मुंबई सोडली. नाहीतरी गेली काही वर्षे रावसाहेब बँरिस्टरीची प्रँक्टिस करीतच नव्हते म्हणून व्यवसायाचा प्रश्न उदभवला नाही. ते आता आपल्या पूर्वजांच्या पुण्याच्या वाड्यात राहायला आले. ताईसाहेबांना समाधान झालं कारण त्यांना तो वाडा पहिल्यापासूनच आवडत होता.
वाडा होताच तसा ऐसपैस. सरदारकीचं वैभव सांगणारा. पानिपतच्या युध्दात पराक्रम दाखवणाऱ्या अप्पा बळवंतांना श्रीमंत पेशव्यांनी त्यांचा सत्कार करून दिलेला.
पुण्यातल्या ज्या चौकाला त्यांचं नाव दिलं आहे त्या अप्पा बळवंत चौकातच ही भव्य वास्तू उभी होती. वाड्याचं भक्कम असं प्रवेशद्वार शिसवी नक्षीनं सुशोभित केलेलं होतं. हा दरवाजा बहुतेक वेळा बंद असे. त्यात असलेल्या दिंडीदरवाज्यातून रोजची ये-जा चाले. तिथून आत गेलं की उजव्या अंगाला देवडी होती. समोर मोठा चौक होता. तिथली काळी कुळकुळीत फरशी, सुबक नक्षी कोरलेले शिसवी खांब, तेलपाण्याच्या योगानं चकचकीत दिसणाऱ्या तुळया- सगळंच कसं आकर्षक होतं. वाड्याच्या माडीवर जायला चौकातल्या ओट्यापलीकडून एक जिना होता. त्यानं वर गेलं की प्रशस्त दिवाणखाना होता. त्यात सगळीकडे रंगीबेरंगी असे नक्षीदार गालिचे अंथरलेले होते. वर छताला हंडे-झुंबरं झुलत होती. एकूण सगळंच कसं ऐश्वर्यसंपन्न होतं.
रावसाहेब पुण्याला कायमचे राहायला आले आहेत हे समजल्यावर त्यांच्या स्नेह्यासोबत्यांना अतिशय आनंद झाला. कलावंतांची कदर करणारे रसिक गुणग्राही सरदार आबासाहेब मुजुमदार, सरदार रास्ते, सरदार विंचुरकर, सरदार पुरंदरे, जगन्नाथराव पंडित अशी अनेक मातब्बर मंडळी वाड्यावर येऊ लागली. त्याबरोबरच आध्यात्मिक क्षेत्रातील जाणकार माणसं, संत, भगवतभक्त यांची मांदियाळी वाड्यात जमू लागली.
हळूहळू कथा, कीर्तनं, भजनं, प्रवचनं या सर्वांनी मेहेंदळे वाडा गजबजून गेला.
लहर आली की शंकरमहाराज मेहेंदळेवाड्यात येत. एक दिवस ते असेच अचानक आले. रावसाहेब-ताईसाहेब - दोघांनीही त्यांचं आनंदानं स्वागत केलं. चहा पिता पिता महाराज म्हणाले, "राऊ, आज आम्ही इथे का आलो माहित आहे ? आमच्या बेबीचं प्रवचन ऐकायला. ज्ञानेश्वरीनिरूपण ऐकायला."
"काहीतरीच काय ? मला नाही बाई जमायचं !" रावसाहेब काही बोलण्याच्या आत ताईसाहेब उदगारल्या.
"मग आम्हालाही नाही जमायचं इथे राहायला. आम्ही जातो." असं महाराज नुसतं बोललेच नाहीत, तर खरोखरच उठू लागले. तेव्हा त्यांचा हात धरून त्यांना बसवीत रावसाहेब म्हणाले, "नको, नको महाराज. पद्मावती करील प्रवचन. आपली आज्ञा म्हणजे ईश्वरी आदेश. आणि आपली उपस्थिती म्हणजे सदगुरुकृपा !"
मग रावसाहेब ताईसाहेबांना म्हणाले, "भिऊ नकोस. जसं सुचेल तसं बोल. दादामहाराजांनी काय सांगितलंय आठवतं ना ? तुझ्या तोंडून सदगुरुच बोलेल."
"ते खरं. पण... पण यांच्यासमोर -"
"ठीक. आम्ही नाही बसणार समोर. आम्ही बसू शेजारच्या पाचखणीत ! चालेल ना ?"
"हंऽ -"
दिवाणखान्यात प्रवचनाला येणारी नित्याची मंडळी जमली होती. व्यासपीठाच्या एका बाजूला रेशमी भरजरी आसनावर कृष्णतुळशीचा भरघोस असा सुंदर हार घातलेलं श्रीविठ्ठलाचं मनोहर छायाचित्र होतं.उजव्या अंगाला श्रीशंकरमहाराजांनी दिलेलं श्रीअक्कलकोट स्वामी महाराजांचं रंगीत छायाचित्र होतं. ते देताना महाराज म्हणाले होते, "ऐकलंस राऊ, हे नुसतं चित्र नाही बरं, प्रत्यक्ष स्वामीमहाराजच येऊन बसले आहेत. यापुढे त्यांचं वास्तव्य इथे अखंड आहे."
श्रीपांडुरंगाच्या दोन्ही अंगाला समया तेवत होत्या. उदबत्या लावलेल्या होत्या.
ताईसाहेबांनी आतल्या खोलीत जाऊन महाराजांना वंदन केलं. त्या त्यांच्या चरणापाशी वाकल्या तेव्हा महाराज हलकेच म्हणाले, "विचार बाहेरचे. खरंज्ञान आतून येतं.स्फुरतं."
श्रीपांडुरंगाला, श्रीस्वामींना आणि व्यासपीठाला वंदन करुन ताईसाहेब व्यासपीठावर स्थानापन्न झाल्या. त्यांनी श्रोत्यांनाही नमस्कार केला.
मनातल्या मनात त्यांनी ज्ञानेश्वरमाउलींना म्हटलं, "आता माझा सर्व भार तुझ्यावर. लेकीला सांभाळून घे.".....क्रमशः ...
*_लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी_*
[1/2, 3:29 PM] Kriya Yog Madam: *
पुष्प = {४१},
*
*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*
पुण्याच्या अभ्यंकर घराण्यावर महाराजांची दोन पिढ्यांपासून कृपा होती. श्री गणेशपंत अभ्यंकर महाराजांचे भक्त. त्यांच्या सहवासात राहिलेले. त्यांची सेवा करणं हाच आपला धर्म आहे असं मानणारे. ते लष्करात नोकरी करीत होते. एकदा त्यांना सीमेवर जावं लागलं. गोळ्यांच्या वर्षावात शत्रूंशी झुंज घ्यावी लागली. त्या युद्धाच्या धुमश्चक्रीतही त्यांना महाराजांचं नित्य स्मरण असे. ते म्हणत, "महाराज आपल्या कृपेचं कवच लेवून लढतो आहे. आता तुम्हीच काय ते करा. तारा वा मारा."
युद्धात त्यांना गोळ्या लागल्या होत्या, पण नवल असं घडायचं की, त्यांच्या पाटलोणीला भोकं पडायची, पण त्यांच्या पायाला मात्र जखमा व्हायच्या नाहीत.
युद्ध संपल्यावर गणेशपंत महाराजांच्या दर्शनाला गेले. तेव्हा महाराज म्हणाले, "तुम्हाला नुसतं धावा करून आमच्या नावानं बोंबलायला काय जातं ? सगळं निस्तरावं लागतं आम्हाला. गोळ्या खाव्या लागतात आम्हांला. बघ... बघ."
महाराजांनी आपली मांडी दाखवली. आणि गणेशपंतांना हुंदकाच आला. त्यांच्या मांडीवर गोळ्या लागल्याचे व्रण होते !
गणेशपंतांचे चिरंजीव दत्तात्रेय यांचा जन्मच मुळी दत्तप्रसादातून झाला होता. तेव्हा गणेशपंत गाणगापूरला जाऊन गुरूचरित्राची पारायणे करीत असत. एकदा पारायणाची समाप्ती करून ते मधुकरी मागायला गावात गेले. तेव्हा एका सत्पुरुषानं त्यांच्या भिक्षेच्या झोळीत श्रीस्वामी समर्थांचं छायाचित्रच टाकलं. आश्चर्यचकित झालेल्या गणेशपंतांना तो म्हणाला, "हा गुरूप्रसाद आहे. तुला मुलगा होईल. त्याचं नाव दत्तात्रेय ठेव."
आणि खरोखरच मोठ्या मुलाच्या पाठीवर बारा वर्षांनी त्यांना मुलगा झाला. तोच हा दत्तात्रेय. त्याला लहानपणापासून महाराजांचा सहवास लाभला. महाराज नगरला पुष्कळ वेळा अभ्यंकरांच्या घरी राहत. दत्ता लहानपणी फार भित्रा होता. त्याला अंधाराची फार भिती वाटायची. एकदा महाराज त्याला म्हणाले, "जा रे, आत्ताच्या आत्ता किल्ल्यातील बारमधून आम्हाला 'प्यायचे' घेऊन ये."
"एवढ्या... एवढ्या रात्री ?" दत्ता चाचरत म्हणाला, "अकरा वाजून गेलेत. बार बंद झाला असेल."
"नाही. बारचा मालक तुझ्यासाठी थांबला आहे."
"पण... पण... या अंधारात मी... मी सकाळी आणून देतो ना तुम्हांला हवं तेवढं प्यायला !"
"मुर्खा! जा, आत्ताच जा. आधी जा.
महाराजांचा आवाज चढलेला पाहून दत्ता घाबरला. आपले वडील तरी आपल्याला पाठीशी घालतील या आशेनं त्यानं त्यांच्याकडे पाहिलं, पण तेसुध्दा त्याला दरडावून म्हणाले, "जा. तुला कुणी खात नाही वाटेत."
दत्ता जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडला. त्या काळ्याकुट्ट अंधारात सायकलवरून किल्ल्याकडे निघाला. त्याच्या सर्वांगाला घाम फुटला. निर्वाणीचा उपाय म्हणून तो मोठ्यामोठ्यानं 'श्रीराम', 'श्रीराम' म्हणत कसाबसा बारजवळ पोहोचला. आणि पाहतो तो तिथे महाराजांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच एक पारशी गृहस्थ दारूच्या दोन बाटल्या घेऊन उभा होता. दत्ताला पाहताच तो म्हणाला, "जा जा जल्दीसे जा ! ये बाँटल् बाबाको पहूंचा दे। कितना टाईम लगाया आने में। बाबा ने संदेश भेजा था फोनपर।"
हे ऐकून दत्ता चक्रावूनच गेला. त्याला वाटलं, 'आपल्या घरी तर फोन नाही. मग महाराजांनी फोन कुठून केला ?'
दत्ता घरी परत आला तेव्हा महाराजांनी विचारलं, "काय रे, कुणी अडवलं नाही ना तुला ?" दत्तानं नकारार्थी मान हलवली. त्याच्या हातातल्या दोन्ही बाटल्या घेऊन दारू प्यायच्या ऐवजी त्यांनी त्या बाटल्या जोरात भिंतीवर आपटल्या. मोठमोठ्यानं हसत, त्या फुटक्या बाटल्यांकडे आणि वाहणाऱ्या दारूकडे पाहत ते म्हणाले, "बेटा, तुझी भीती मेली बरं - आम्ही ती फोडून टाकली. तिला पळवून लावली."
आणि तेव्हापासून दत्ताला आयुष्यात कधीच कसली भीती वाटली नाही.
दत्ता लहान असतानाची गोष्ट. एकदा महाराज गणेशपंतांना म्हणाले, "मी तुझ्या दत्ताला थोडे दिवस गावाला घेऊन जातो. तुझं काय म्हणणं आहे ?"
"माझं म्हणणं काय असणार, महाराज ? दत्ता तुमचाच आहे. तुम्ही त्याचा हात धरता आहात त्यात मला कसली चिंता ? उलट मी ते आमचं भाग्यच समजतो."
नंतर नगरमधील आपल्या शिष्यांना घेऊन महाराज गिरनारला निघाले. बरोबर दत्ताही होता. ते सर्वजण गिरनारच्या पायथ्याला आले आणि तिथे भवनाथ महादेवाच्या मंदिरात मुक्काम करून दुसऱ्या दिवशी त्यांनी पर्वत चढायला सुरुवात केली. 'अष्टावक्र' महाराज एकदम सरळ उभे राहिले. त्यांच्या अंगात जणू शक्तिसंचार झाला. दत्ताला खांद्यावर घेऊन ते झपाझप वर निघाले. शिखरावर जायचं म्हणजे दहा हजार पायऱ्या चढायच्या. सामान्य माणसाला निदान सात-आठ तास तरी लागतात तिथे पोचायला, पण महाराज केवळ चार तासांत तिथे पोचले. गुरुपादुकांना दंडवत घालून तिथे थोडा वेळ ध्यानस्थ बसले. मग दत्ताला त्यांनी तिथंच बसवलं. आणि ते पादुकांच्या डाव्या बाजूनं दरीत उतरले. समोर एक टेकडीसारखी मोठी शिळा होती. महाराजांनी मोठ्यानं 'अल्लख निरंजन' म्हटलं, तेव्हा शिळा सरकली. महाराज आत गेले आणि थोड्या वेळानं परत बाहेर आले. शिळा पूर्ववत् झाली.
दुसऱ्या दिवशी काही साधूंनी गव्हाच्या आट्याची पोतीच्या पोती वर आणली. तेलातुपापासून सगळा शिधा आला. स्वयंपाकाची मोठमोठी भांडीही आली. महाराजांनी स्वतः विस्तव पेटवला. पिठाचे मोठमोठे गोळे करून त्या झगरांत रोटासारखे ते खमंग भाजले. दुसरीकडे भजी तळली गेली. श्रीदत्तप्रभूंना सर्वांचा नैवेद्य दाखवण्यात आला. मग दुपारी महाराजांनी शंख फुंकून सर्वांना भोजनाचं निमंत्रण दिलं. "पधारिये महात्मा. भोजनके लिये पधारिये।" असं म्हटल्यावर अंतराळातून काही महात्मे आले. त्या दरीतल्या शिळेआडच्या गुहेतूनही एक अत्यंत तेजस्वी सिद्धपुरुष वायुमार्गाने शिखरावर आला. इतरही अनेक साधू आले. दुपारी बारा वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत पंगती उठत होत्या. एकेका साधूंने सत्तर-सत्तर गोळे खाल्ले. महाराज स्वत: आग्रह करून सर्वांना वाढीत होते.
त्या मंडळींना एका भक्तानं विचारलं, "तुमचा आहार इतका कसा?" तेव्हा त्यांतले एक महात्मा म्हणाले, "आम्ही सर्वांच्या हातचं भोजन स्वीकारीत नाही. वायुभक्षण करून राहतो. पण क्वचित एखाद्या अवधूतानं आम्हाला निमंत्रण दिलं तर आम्ही येतो आणि असं आकंठ भोजन करतो."
सर्व मुनी, महात्मे, सिद्ध तृप्त झाले. महाराजांना आशीर्वाद देऊन स्वस्थानी परत गेले. महाराजांबरोबर गेलेली मंडळी मात्र हे सारं बघून थक्क झाली. हा आटा, भांडी, लाकडं - सगळं सामान कुठून आलं, आणि जेवण झाल्यावर भांडी कुठे गेली, पाण्याची व्यवस्था कशी झाली, दिव्यांची सोय कुणी केली ते एक शंकरमहाराजच जाणे !
तेव्हापासून दत्ताला गिरनारची आणि दत्तगुरुंची एक प्रकारची ओढ लागली. तो मोठा झाला तरी तिथले साधू-संन्यासी, महाराजांनी त्यांना दिलेली मेजवानी, त्यांनी केलेला 'अल्लख निरंजन'चा पुकारा या सर्व गोष्टी त्याच्या मनात घर करून राहिल्या. तो अधूनमधून गिरनारला जाऊ लागला.
दत्ता मिळवता झाला. आता त्याचं लग्न करावं असं गणेशपंतांनी ठरवलं. दत्ताची आई वधूसंशोधन करू लागली, पण दत्ता म्हणाला, "तुम्ही उगाच ही खटपट करू नका. मला लग्न करायचं नाही. संसारात पडायचं नाही."
त्याचं हे बोलणं गणेशपंतांनी फारसं मनावर घेतलं नाही. त्यांना वाटलं, मुलं बोलताना बोलतात असं, पण एखादी सुंदर मुलगी समोर आली की होतात लग्नाला तयार ! ते मुली पाहतच राहिले.
त्यांची ही खटपट बघून दत्ता एक दिवस उठला आणि सरळ गिरनारला गेला.
महाराजांना हे कळलं तेव्हा ते स्वतः दत्तस्थानी गेले. त्याला थोडंसं दटावून म्हणाले, "मुकाट्यानं लग्न कर. तुला लग्न का करायचं नाही ते आम्हाला माहीत आहे. पण लग्न केलंस तरच तुला जे हवं आहे ते सगळं मिळेल. एरवी नाही."
दत्ता परत आला. तो संसाराला लागला. आता त्याला सगळे 'अण्णा' म्हणू लागले होते.
अण्णांची महाराजांवर दृढ श्रद्धा होती. त्यांनी महाराजांची निरलसपणानं अखेरपर्यंत सेवा केली. त्यांना आईपेक्षासुध्दा महाराजांविषयी अधिक जिव्हाळा वाटत होता. त्यांचा आधार वाटत होता.
विवाह झाल्यावर ते आपली पत्नी सुशीलाबाई यांना महाराजांची थोरवी सांगून म्हणाले, "हे बघ, मला माहित आहे माझी आई शिस्तीची आहे. थोडी कडक स्वभावाची आहे. तुला जर केव्हा काही त्रास झाला, मनाला वाईट वाटलं तर तू आपलं मन त्यांचेजवळ मोकळं करीत जा. दु:ख एक त्यांनाच सांगायचं. दुसऱ्या कुणालाही नाही."
सुशीलाबाईंनी मान हलवली. म्हणाल्या, "ते खरं. पण एक सांगू का? मला तुमच्या त्या महाराजांची भिती वाटते. त्यांचे ते मोठे डोळे, शिवाय त्यांचं विचित्र वागणं, ते आले की थरकाप होतो माझ्या जीवाचा."
"छे... छे, ही मनातली भीती अगदी काढून टाक. ते फार प्रेमळ आहेत. सुखदुःखात तेच आपला आधार आहेत. आपल्याला सांभाळणारे आपले सदगुरू आहेत. त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेव."
पतीच्या या आश्वासक शब्दांचा प्रत्यय सुशीलाबाईंना लवकरच आला. महाराजांच्या विषयीची त्यांची भीती तर गेलीच, पण आता पतीप्रमाणेच त्याही त्यांच्या निस्सीम भक्त बनल्या. अडीअडचणीला त्यांचा धावा करू लागल्या.
आणि महाराजांनीही त्यांच्यावर आपल्या कृपेचं छत्र अखंड ठेवलं. देह ठेवल्यावरही ! समाधिस्थ झाल्यावरही !!.......क्रमशः ....
*_ लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी_*
No comments:
Post a Comment