: ⚪
⚪पुष्प = {५७},⚪
⚪
*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*
मंदिराच्या बाहेर आल्यावर महाराजांनी देवळाच्या दर्शनी दरवाजाच्या वरच्या भागात असणाऱ्या तीन देवड्या दाखवून डॉक्टरांना म्हटलं, "या तीन देवड्या म्हणजे आपल्या देहातल्या तीन मुख्य नाड्या आहेत- इडा, पिंगला आणि सुषुम्ना."
"हे नव्हतं माहित मला. मी यांच्याकडे आपल्या पुरातन वास्तुशास्त्राची एक किमया म्हणून कौतुकानं पाहत होतो. मला मोठं नवल वाटतं महाराज, दुपार ढळली की सुर्यप्रकाश या झरोक्यातून आत जातो तो प्रथम वृद्धेश्वराचं दर्शन घेतो आणि मग मावळतीवरून पार्वतीमातेच्या पाया पडून अस्ताला जातो. प्रत्येक झरोक्यातून चार चार महिने ही लीला चालते. हे नेमकं गणित कसं काय कळलं असेल आपल्या पूर्वजांना! आणि आता तुम्ही सांगता आहात की या योगमार्गाच्या द्योतक आहेत म्हणून!"
"आपल्या ऋषीमुनींनी जीवनाचे वेगवेगळे भाग केले नाहीत. लौकीक जीवनात अलौकिकाचा धागा सहजतेनं गुंफून ठेवला आहे. लौकीक-पारलौकिक - सारं काही त्या अस्तित्वाचंच दर्शन आहे. त्याचा चिदविलास आहे."
देवळाच्या समोरच उजवीकडे असलेल्या धुनीतून अंगारा घेत महाराज म्हणाले, "नाथांनी इथे यज्ञ केला होता. तेव्हा श्रीमच्छिंद्रनाथांनी प्रज्वलित केलेला हा यज्ञाग्नी इथे या धूनीरूपात अजूनही धगधगतो आहे. त्या वेळी म्हणे, संतमहंत, राजेरजवाडे, देवदेवता, यक्षकिन्नर, अष्टवसू, अष्टभैरव, अष्टसिद्धी सर्वजण आले होते. यज्ञ संपन्न झाल्यावर सर्व मंडळी आपापल्या स्थानी परत गेली, पण गहिनीनाथ इथे राहिले. कारण त्या वेळी आदिनाथ गोरक्षनाथांना म्हणाले होते, "गहिनीला अनुग्रह द्या. मी त्याचा शिष्य निवृत्तिनाथ होऊन प्रकट होणार आहे."
गोरक्षनाथांकडून दिक्षा मिळाल्यावर गहिनीनाथ विद्याभ्यास करण्यासाठी या गर्भगिरी डोंगरावरच राहिले. या परिसरात नवनाथांचं वास्तव्य आहे. आदिनाथांच्या अवतीभवती त्यांच्या समाध्या आहेत."
"होय महाराज, मी घेतले आहे सर्वांचे दर्शन. कानिफनाथांच्या 'मढी'ला जाताना मला आपण मढीला गेला होतात तेव्हाची हकिगत नवलेकाकांनी सांगितली. मला मोठी चुटपुट लागली. मी त्या वेळी आपल्याबरोबर असायला हवं होतं."
डॉक्टरांना ती सर्व घटना आठवली. नगरला आल्यावर महाराज आपल्या भक्तांना म्हणाले होते, "चला रे, आपण कान्होबाला भेटायला जाऊ या." तेव्हा सर्वांनी एक बैलगाडी ठरवली. महाराजांनी स्वतः ती हाकली. मढीला आल्यावर समाधीपुढे असणाऱ्या धुनीला सर्वांनी नमस्कार केला, पण महाराज उभेच राहिले. म्हणाले, "धुनी आहे, पण अग्नी कुठे आहे ?"
मग त्यांनी 'अल्लख निरंजन!" अशी मोठ्यानं गर्जना केली. आणि आश्चर्य घडलं. त्या दिव्य ध्वनीलहरींच्या आघातानं धुनी आपोआप पेटली.
'ही धुनी आता अखंड चालू ठेवा... हा ज्ञानाग्नी निरंतर पेटता राहू दे." असं म्हणत ते आत दर्शनाला गेले.
परतीच्या वाटेवर अजून एक घटना घडली. प्रवासात मधेच एका निर्मनुष्य जंगलात महाराज थांबले. ते गाडीतून खाली उतरले. त्यांचे डोळे गरगर फिरू लागले. त्यांनी 'अल्लख' म्हणत जमिनीवर जोरात थाप मारली. म्हणाले, इथे खणा."
माणसं खणायला लागणार तोच जमीन दुभंगली. तिच्यामधून शिवलिंग प्रकट झाले. "हिच्यावर देऊळ बांधा.' एवढंच बोलून महाराज पुन्हा गाडीत येऊन बसले. तिथं देऊळ बांधलं गेलं. आणि महाराजांच्या नावावरुन त्याला लोक 'शंकरेश्वर' म्हणू लागले.
"चल मग आपण आज तिकडेच जाऊ. तिथे समाधीच्या मागे मंदिरातून खाली गेल्यावर त्यांच्या तपाची जागा असलेलं एक भुयार आहे तिथेही तुला नेऊन आणतो."
मग ते दोघेही गर्भगिरीवरची पवित्र ठिकाणं पाहत निघाले. वेगवेगळ्या गुहा पाहताना एका अंधाऱ्या गुहेत गेल्यावर महाराज म्हणाले, "गोरक्षनाथांच्या आश्रमातली ही घुमटगुंफा. त्या समोरच्या जागेवर गहिनीनाथ ध्यानाला बसत असत. त्यांच्याभोवती त्यांचे शिष्यही साधनेला बसत. त्यांच्या बसण्यामुळे, वर्षानुवर्षे एकाच स्थानावर बसल्यामुळे दगड झिजले आहेत. तिथे बसणाऱ्या साधकाच्या बैठकीचा आकार त्यांना आला आहे. डॉक्टर, तुला आठवत नाही, पण तूही त्या काळी होतास."
"काहीतरीच काय, महाराज ?"
"काहीतरी नाही बाबा, खरं सांगतोय."
"मग माझी जागा सापडेल इथे ?"
"सापडायलाच हवी. मात्र ती शोधून काढायचं काम तुझं."
धडधडत्या मनानं मोठ्या उत्सुकतेनं त्या अंधुक उजेडात डॉक्टर एकेका दगडावर बसून पाहू लागले. आणि एका ठिकाणी बसताच आनंदानं उदगारले, "हीच. हीच माझी जागा. माझी जागा सापडली. माझा पुठ्ठा या दगडाच्या आकारात नेमका बसला ! हे माझ्या मापाचंच आसन आहे."
महाराजांनी डॉक्टरांच्या पाठीवरून हात फिरवीत प्रसन्नपणानं म्हटलं, "तू नाथपरंपरेतलाच आहेस याची खात्री पटली ना आता तुला ? डॉक्टर, नाथपंथातल्या अधिकारी पुरुषानं एकदा ज्याला दिक्षा दिली, त्याला तो कधीच अंतर देत नाही. जन्मजन्मांतरीचे लागेबांधे असतात हे. आपला आठशे वर्षांचा ऋणानुबंध आहे बरं."
डॉक्टरांना हे सगळं ऐकून गहिवरून आलं. ते दाटल्या गळ्यानं म्हणाले, "होय महाराज, मी अज्ञानी. मी ओळखलं नाही तुम्हांला. पण आता कळलंय की, मी जन्मोजन्मी तुमचाच होतो. नाहीतर मी तुमच्याशी इतकं वाईट वागूनही तुम्ही मला जवळ कसं केलं असतंत ? आता मात्र खरंच सांगतो मी तुमचे पाय सोडून कुठेच जाणार नाही."
"आदिनाथं मच्छिंद्रंच गोरक्षं गहिनीं तथा।
निवृत्तिं ज्ञाननाथंच भूयो भूयो नमाम्यहम्॥"
अशी प्रार्थना करून डॉक्टरांनी महाराजांच्या पायावर मस्तक ठेवलं. कारण महाराजांच्या सत्यस्वरूपाचं दर्शन त्यांना देवळाच्या गाभाऱ्यात झालं होतं. त्यांची खात्री पटली होती की हे येरंगबाळं, वेडंविद्रं दिसणारं त्यांचं बाह्य रूप जनसामान्यांना भ्रमात टाकणारा एक मुखवटा आहे. त्याआड ज्ञानाची आभा ल्यायलेलं त्यांचं तेजस्वी प्रसन्न मुखमंडल लपलेलं आहे. .....क्रमशः ...
*लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी*
No comments:
Post a Comment