*⚪
⚪पुष्प = {५८},⚪
⚪*
*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*
साधनेसाठी स्थान कसं असावं हे सांगताना आपण पाहिलेल्या वृद्धेश्वराच्या मंदिराचं आणि 'गोमठा'चंच हुबेहूब चित्रण 'ज्ञानेश्वरीत' केलं आहे. बसायला आसन कोणतं असावं याचं वर्णन १८२ व्या ओवीपासून १९१ ओवीपर्यंत केलं आहे.
योगाचे सर्व विधी बाहेरून आत जाणारे आहेत. प्रारंभ बाहेर. अखेर आत. आणि ते योग्यच आहे. कारण माणूस जिथे उभा आहे तिथूनच तो चालायला सुरुवात करतो. म्हणून श्रीकृष्ण अत्यंत करूणेनं अर्जुनाच्या भूमिकेवर येऊन बोलतो आहे. म्हणतो आहे, "अर्जुना, आसन फार उंच नको आणि खोलगटही नको. तर ते 'समतल' असावं. कारण देहाची दोन्ही अंगं-बाजू- समतोल असली की देहावर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव कमितकमी होतो. ताठ बसल्यानं गुरुत्वाकर्षण सरळ रेषेत केवळ मेरूदण्डालाच प्रभावित करतं.
मृगचर्माचं आसन घ्यावं. ते विद्युतप्रवाहाला प्रतिबंध करतं. ध्यान जसंजसं प्रगाढ होत जातं तसतशी देहामध्ये एक अगदी निराळी अशी अंतर्विद्युत उत्पन्न होते. देहात असणारी विद्युत सक्रिय होते. आपल्या शरीरात विजेचं मोठं भांडार आहे. तिच्यामुळेच आपण सर्व क्रिया करतो. आणि तिला जिवंत ठेवण्यासाठी अहोरात्र श्वास घेत असतो. ध्यानावस्थेत देह निश्चल होतो. निष्कंप होतो. इंद्रिये शिथील होतात. विचार थांबतात . त्यामुळे एरवी आपल्या क्रियांमुळे सतत बाहेर फेकली जाणारी वीज आतल्याआत राहाते. एकत्र होते. अशा वेळी जर आपण जिथून वीज बाहेर फेकली जाईल अशा जागी बसलो तर आपल्याला विजेचा धक्का बसेल.
तू पाहिलं असशील की लाकडी खडावा किंवा वीजवाहक नसलेल्या वस्तूंची पादत्राणं घातली आणि विजेच्या तारेला हात लावला तर धक्का बसत नाही. कारण वस्तुतः धक्का बसतो तो विजेमुळे बसत नाही, तर आपल्या देहातील विजेचं वर्तुळ तुटल्यानं बसतो. विजेच्या तारेतून जी वीज आपल्या शरीरात येते तिला जमीन झटक्यानं आपल्याकडे खेचून घेते. म्हणून आपल्याला त्या झटक्याचा धक्का बसतो. लाकडातून वीज प्रवाहित होत नाही. त्यामुळे वीज वर्तुळाकार होऊन परत देहातच जाते. वर्तुळ तुटत नाही.
'मृगाजिन' लाकडासारखंच काम करतं. आणि असं आतल्या आत विजेचं वर्तुळ निर्माण झाल्यानं साधकाला परमशांतीचा अनुभव येतो.
आता या आसनावर कसं बसावं तेही सांगितलं आहे. आसन म्हणजे कमरेखालच्या देहाची बसण्याची पद्धत. आणि कमरेच्या वरच्या भागाची विशेषतः हातांची विशिष्ट स्थिती म्हणजे मुद्रा. त्यांत पाय दुमडलेले, हात जुळलेले असतात. त्यामुळे पुरं शरीर एक विद्युतवर्तुळ होतं. हातापायांच्या टोकदार बोटांतून बाहेर जाणारी वीज आतच फिरते. तिचं एक बाहेरच्या बाहेरच कवच निर्माण होतं आणि अशा स्थितीत साधकाला अंतरआकाशाची यात्रा करणं सोपं जातं."
एवढं बोलून महाराज जरा वेळ स्वस्थ बसले. मग म्हणाले, "माऊलींच्या ओव्यांचा अर्थ अनेक पातळ्यांवरून पाहावा लागतो. मी आत्ता सांगितला तो अर्थ देहाच्या अंगानं आहे. पण गुरूपरंपरेप्रमाणे आसनविधी आणि आसनधारणा यांचा अर्थ अधिक खोल आहे. तो वस्तूपेक्षा साधकाच्या मनोवृत्तीशी संबंधित आहे. तो नीट लक्षात घेऊन या ओव्यांचं चिंतन कर.
'आसन' म्हणजे 'आस+न.' मनात कसलिही आस न धरता विषयात रस न घेता निष्काम भावानं बसावं. आस नसलेलं आसन असावं. ध्यान मनाच्या कौतुकानं करावं. मनावर कुठलंही दडपण नसावं. स्थान कसं पाहावं तर -
"तेथ आरागुकेचिनि कोडें। बैसलिया उठों नावडे।
वैराग्यासि दुणवि चढे। देखिलिया जें॥" (६।१६४)
या ओवीत गुरूबोधाचा ठसा सांगितला आहे. त्या बोधाप्रमाणे वागणं म्हणजे 'निश्चळपणा.' तेथे बाहेरचे स्थान शोधायचं नाही, तर ते आपल्या अंतरंगातलं स्थान आहे हे समजून ज्या स्थानाविषयी आपल्याला भक्तिभाव वाटतो त्या स्थानाचं स्मरण करायचं आहे. त्या अधिष्ठानाचं स्मृतिचित्र मनात उभं करून त्यात रंगून जायचं आहे. मग मनाची पांगापांग थांबेल. मनाचं अंतरीचं आसन स्थिर होईल. वृत्तीमधील आशा नाहीशी करून चित्तशुद्धीनं स्थिरसुख साधणं हे आसनाचं मर्म आहे."
हे सारं एकचित्तानं ऐकणाऱ्या डॉक्टरांना महाराजांनी मध्येच विचारलं, "कुशांकुराचं आसन माहीत आहे तुला ?"
"होय. 'कुश' नावाच्या अणकुचीदार गवतानं विणलेलं आसन म्हणजे कुशासन."
महाराज किंचित हसले. म्हणाले, "बरोबर आहे. पण हा झाला सामान्य अर्थ. आतला अर्थ आहे 'कोशांकुर.' स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण या चार देहकोशांचा अंकुर धारण करणारा जो जीव तो कोशांकुर. त्यालाच तळवटी आंथरायचा आणि देहकोशांचा तळ थाटणारी जी विषयवृत्ती ती 'मोडी' म्हणजे नाहीशी करायची."
'इंद्रियांची कसमस मोडे' यातल्या 'कसमस मोडे' याचा अर्थ आहे, देहाला काच आणि मनाला माज देणारी विषयांची प्रवृत्ती नष्ट करायची.
'धूतवस्त्र' म्हणजे शुद्ध चित्त. वसत्रा म्हणजे वासना आणि धूत म्हणजे शुद्ध. अंत:करणाची विषयस्मृतीची ओढ दूर करून तिथे असलेली चोखट सदबुद्धी जागी केली की जिवभावाची आत्मस्वरूपाविषयीची धारणा सुरू होते. ती समतल राहण्याची काळजी जीव घेतो. तिथे अभिमान (उंचपणा) शिरला तर अंग डोलू लागेल. विषयप्रवृत्ती घुमू लागेल. आणि 'नीचता' म्हणजे शून्यता आली तर 'नेणीव' होईल. जाणीव राहणार नाही. हा पंथराजाचा सहजयोग आहे. राजयोग आहे.
अन्त:करणशुद्धी आहे योग. स्मरण आहे योग. संतुलन आहे योग. समर्पण आहे योग.
एकाग्र चित्तानं सदगुरुस्मरण करावं. कृपासिद्धांची प्रेममुद्रा आठवावी. त्यांना हृदयाच्या आसनावर बसवावं. गुरूंच्या साक्षात सान्निध्याचा अनुभव आला की त्या प्रेमौघात साधकाचा अहंभाव पार विरघळून जातो. त्याची धारणेची क्रिया सुरु होते. सगळं सहज घडतं..... क्रमशः ...
*लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी*
No comments:
Post a Comment