Monday, 14 January 2019

Tale 5

 *🌿🌿पुष्प = {४२},🌿🌿*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची..*.

     

  मामा ढेकणे या नावाचे महाराजांचे एक निस्सीम भक्त होते. महाराजांचं त्यांच्यावर फार प्रेम. ते केव्हातरी म्हणायचे, "मामाचं आम्ही पूर्वजन्मातलं देणं लागतो. ते फेडायचं आहे आता."
  मामा खडकीच्या अँम्युनिशन फॅक्टरीत नोकरीला होते. पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी एवढं त्यांचं कुटुंब पुण्याला बाबू गेनू चौकात असलेल्या शिवराम महादेव परांजपे यांच्या वाड्यात बिऱ्हाडानं राहत. सांपत्तिक स्थिती तशी साधारणच. घर लहानसं. रस्त्याच्या बाजूला भिंतीला दोन खिडक्या. त्यांतून आत येईल तेवढाच उजेड. जमीन ओबडधोबड. शेणानं सारवलेली. त्यावर अंथरलेली सतरंजीही जुनीच. भिंतीला टेकून ठेवलेला एक फाटका मळका लोड. भिंतीतल्या कोनाड्यांत आणि खुंट्यांवर बाकीचं सामान ठेवलेलं.
  पण ह्या बाह्य गोष्टींचा विचार महाराजांच्या मनाला कधी शिवायचाही नाही. ते रावसाहेब मेहेंदळ्यांच्या वैभवसंपन्न दिवाणखान्यात ज्या सहजतेनं बसायचे, मोतीवाल्या लागूंच्या घरी पांढऱ्याशुभ्र बैठकीवर ज्या प्रेमानं पहुडायचे त्याच प्रेमानं आणि तितक्याच सहजतेनं ते मामांच्या घरी फाटक्या सतरंजीवरही आरामात बसायचे. लहर लागेल तेव्हा त्यांच्या घरी राहायलाही जायचे.
  असेच एकदा ते अंगात लांब खिसे असलेला सैल कोट, डोक्यावर सोलापुरी फरकँप, पायांत मोजडी पध्दतीचे बूट अशा वेषात मामांकडे आले. 
  आले ते दारातून 'मामी, मामीऽ आम्ही आलो, आम्ही आलोऽ' असं म्हणतच आले. मुद्रेवर मोहक बालहास्य.
  मामामामींनी त्यांचं आनंदानं स्वागत केलं. त्यांना बसवलं. त्यांच्यापुढे चहाचा कप ठेवताना मामींच्या मनात नेहमी येणारा विचार पुन्हा आला. त्यांना वाटायचं, 'आपलं जन्मोजन्मीचं पुण्य म्हणून हे आपल्याकडे येतात. घरच्यासारखे वागतात. आपल्या अडीअडचणीला आपणहून धावून येतात. मायबाप करणार नाहीत अशी माया करतात. नाहीतर त्यांनी प्रेम करावं असं आपल्याजवळ काय आहे ? नाही पैसा. नाही प्रतिष्ठा. नाही बुध्दी. नाही भक्ती. जप नाही. तप नाही. ध्यान नाही. धारणा नाही. काहीही नाही.
  पण ह्यांचं हेच तर वैशिष्ट्य आहे. यांच्या मनात जात-पात, राव-रंक, लहान-थोर असा कुठलाच भेद नाही. त्यांचा नेमका ठावठिकाणा कुणाला कळत नाही. असे अवचित 'आलो, आलो' म्हणत येतात नि चटकन उठून निघूनही जातात. 'सडे' उठतात आणि निघतात. जवळ ना अंथरुण, ना पांघरूण, ना कपडे !'
  महाराजांच्या आगमनाची वार्ता कळताच त्यांच्या दर्शनासाठी माणसं येऊ लागली. दाटीवाटीनं बसू लागली. महाराज खुषीत होते. कुणाला गुद्दे घालीत होते, कुणाला चापट्या मारीत होते, हसत होते. बोबड्या बोलांत काही बोलतही होते. तेवढ्यात कुणीतरी म्हणालं, "मामा! अहो, रस्त्यावर गाडी थांबलीय." मामांनी खिडकीतून डोकावून पाहिलं तो थांबलेल्या गाडीतून रावसाहेब खाली उतरत होते. त्यांच्यामागून आणखी एक अपरिचित गृहस्थही उतरले.
  मामांनी चटकन कोट घातला, डोक्यावर टोपी ठेवली आणि ते या लोकांच्या स्वागतासाठी वाड्याबाहेर आले.
  रावसाहेबांच्याबरोबर आलेल्या गृहस्थाचं नाव होतं सर चुनीलाल मेहता. ते मोठ्या हुद्य्यावर असलेले अधिकारी होते. रावसाहेबांचे मुंबईचे मित्र. सात्त्विक वृत्तीचे गुजराती वैष्णव. त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरीत होती. सुशील सहर्धमचारीणी होती. सदगुणी मुलं होती. लौकिक दृष्टीनं संसार अत्यंत सुखाचा होता. पण त्यांना आता ओढ लागली होती अलौकिकाची ! जीवनाचं रहस्य जाणून घेण्याची!! त्यासाठी त्यांनी अनेक यात्रा केल्या. साधूसंतांच्या भेटी घेतल्या. आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन केलं आणि तरीही ते अशांत होते. अतृप्त होते. आत्मसुखाची अनुभूती यावी म्हणून तळमळत होते.
  त्यांची ही तळमळ बघूनच रावसाहेब त्यांना महाराजांच्या दर्शनाला घेऊन आले होते.
  मामांनी त्या सर्वांना 'यावं, यावं' असं म्हणत आदरानं घरात आणलं.
  समोर महाराज पहुडले होते. हातवारे करीत स्वतःशीच काहीतरी बोलत होते. त्यांच्याजवळ जाऊन रावसाहेबांनी प्रणाम केला. महाराज किंचित हसले. रावसाहेबांनी हलकेच म्हटलं, "माझे मुंबईचे मित्र सरसाहेब आपल्या दर्शनासाठी आले आहेत."
  महाराजांनी जमिनीवर अवघडून बसलेल्या सरसाहेबांकडे आणि ताईसाहेबांच्या जवळ बसलेल्या त्यांच्या पत्नीकडे पाहिलं. पण तिकडे दुर्लक्ष करून ते हसत हसत दुसऱ्याच कुणाशीतरी बोलू लागले.
  थोडी वाट पाहून रावसाहेबांनी धीर करीत त्यांना सरसाहेबांच्याविषयी सुचवलं, पण महाराजांनी तिकडे काणाडोळाच केला. 
  रावसाहेब, ताईसाहेब कुणालाच काही सुचेना. काय करावं ? महाराज असं का करताहेत ?
  सरसाहेब तर फारच अस्वस्थ झाले. महाराजांना नमस्कार करण्यासाठी जोडलेले त्यांचे हात थरथर कापू लागले. त्यांना आतून उमाळा येऊ लागला. भावनावेग अनावर झाला.
  आणि त्याच क्षणी त्यांच्या मुखावर महाराजांनी आपली दिव्य दृष्टी रोखली. दृष्टीला दृष्टी भिडली. नुसती भिडलीच नाही, तर सरसाहेबांची दृष्टी तिथेच खिळून राहिली. त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या. अंगावर रोमांच उभे राहिले. ते सर्वांगानं डोलू लागले. थोडा वेळ अशा विलक्षण अवस्थेत गेल्यावर एकदम एक मोठा हुंकार देऊन ते महाराजांच्या पायावर जाऊन कोसळले. त्यांच्या चरणावर आसवांचा अभिषेक करू लागले.
  एकाएकी त्यांचं गौर मुखमंडल अत्यानंदानं उजळून निघालं. कारण त्यांना महाराजांच्या ठिकाणी महाविष्णूचं दर्शन होत होतं. आणि  त्या वैष्णवाच्या मुखातून त्याच्याही नकळत पुरूषसूक्ताचं आवर्तन होऊ लागलं. 
  सर्व मंडळी अवाक् होऊन ऐकत राहिली.
  सरसाहेब हात जोडून त्या विराट पुरूषाचं वर्णन करीतच होते,

"हरी: ओम सहस्त्रशीर्षा पुरूष: सहस्त्राक्ष: सहस्त्रपात्।
 स भूमिं विश्वतो वृत्वाऽत्यतिष्ठतदशाङगुलम्।
 पुरूषं एवेदं सर्वं यदभूतं यच्च भव्यम्। 
 उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति॥२॥
 एतावानस्य महिमाऽ तो ज्यायाँश्च पुरूष:।
 पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि॥३॥"

  मग गहिवरून म्हणाले, "महाराज, आपणच ते... आपणच 

"सर्वत: पाणिपादं तत् सर्वतोऽक्षिशिरोमुखम्। 
 सर्वत: श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति॥"

  सरसाहेब कृतार्थ झाले. पदपिंडाची भेट घडली होती. वस्तुत: त्यांच्यातच असलेलं आत्मधन महाराजांच्या कृपेनं त्यांना लाभलं होतं.
  सरसाहेब घरी गेले तरी दोन दिवस अशा उन्मनी अवस्थेतच होते !---क्रमशः ...

  *लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी*

No comments:

Post a Comment