*⚪
⚪पुष्प = {५१},⚪
⚪*
*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*
काय असेल ते असो, डॉक्टरांना फकीरबाबांच्याविषयी जो आदर होता तसा आदर आणि प्रेम तो फकीरच शंकरमहाराज आहेत हे कळूनही त्यांना वाटत नव्हता. त्यांच्या बाह्य वर्तनाचा त्यांना कित्येकदा रागच यायचा. महाराज घरात कुठेही वावरायचे. एकदा ते डॉक्टारांच्या खोलीत आले आणि डॉक्टरांना दारूची घाण आली. त्यांनी पाहिलं, महाराज प्यायलेले होते. डॉक्टरांनी त्यांना खोलीच्या बाहेर काढलं. म्हणाले, "असं पिऊन येत जाऊ नका इथे."
महाराज काही न बोलता शांतपणानं निघून गेले.
पुढे दोन-तीन दिवसांनी ते परत आले. त्यांच्याबरोबर त्यांना मानणारे मोठमोठे प्रतिष्ठित लोक होते. मिरीकर मामाही होते. भाऊंनी त्या सर्वांचे स्वागत केलं. चहापाणी, सिगरेट-सर्व झालं. डॉक्टर तिथेच होते. त्यांच्याकडे बघून महाराज एकदम म्हणाले, "अरे भाऊ, हा तुझा मुलगा दारू प्यायला लागलाय. माहीत आहे का तुला ?"
"छे, छे... मुळीच नाही." डॉक्टर उसळून म्हणाले, "नाही भाऊ, आजपर्यंत मी दारूच्या एका थेंबालाही स्पर्श केला नाही."
त्यावर महाराजसुध्दा ठासून म्हणाले, "हा काय सांगतो ? ह्यानं आत्तासुध्दा दारू घेतलेली आहे."
त्यांचं हे धादांत खोटं बोलणं डॉक्टरांना असह्य झालं. ते ताडकन् म्हणाले, "आपण 'महाराज' असलात म्हणून काय वाट्टेल ते खोटंनाटं बोलाल होय ?"
"अस्सं ? आम्ही खोटं बोलतो काय? घाला रे, याच्या घशात बोट घाला. म्हणजे कळेल खरं काय आणि खोटं काय ते !"
"दुसऱ्यांनी बोटं घालायची गरज नाही. मी स्वतःच उलटी काढतो." असं म्हणत डॉक्टरांनी उलटी काढली.
"हे बघा आता. लावा या उलटीला काडी."
कुणीतरी तसं केलं. आणि काय आश्चर्य! एखाद्या फटाक्यातल्या दारूसारखी ती उलटी भपकन पेटली!
सगळे अवाक होऊन त्या जाळाकडे पाहतच राहिले!
महाराज हसत हसत म्हणाले, "पाहिलंत ? आम्ही तर फक्त चाळीस टक्के अल्कोहोल असलेली पितो, पण हा ओ. पी. म्हणजे नव्वद टक्के अल्कोहोल असलेली दारू पितो!"
हा प्रकार बघून डॉक्टरांना एवढंच वाटलं की, या माणसात काहीतरी विलक्षण शक्ती आहे. पण एवढ्यानं मनात पूज्य भाव थोडाच निर्माण होतो! महाराजांचं विक्षिप्त वागणं, सिगरेट ओढणं, अधूनमधून दारू पिणं, तोंडाला येतील त्या अर्वाच्य शिव्या देणं डॉक्टरांना अगदी आवडत नसे.फकीराच्या आठवणी मुळे ते त्यांच्याशी नीट वागण्याचा खूप प्रयत्न करीत. पण त्यांच्या विषयी प्रेम, आपुलकी, आदर त्यांच्या मनात उत्पन्न झाला नव्हता.
एकदा दवाखान्यातल्या कामानं डॉक्टर थकून घरी आले. त्यांना निवांतपणा हवा होता. पण ते आपल्या खोलीत आले तो खोलीतलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं! त्यांच्या महत्त्वाच्या वस्तू इकडे-तिकडे कचऱ्यासारख्या भिरकावलेल्या. आणि त्या सगळ्या पसाऱ्यात महाराजांचं ध्यान हसत हसत उभं!
शिस्तीनं वागणारे, व्यवस्थितपणानं राहणारे डॉक्टर मनातून अतिशय संतापले. तरीही संयमानं म्हणाले, "महाराज, आपण भाऊंच्या खोलीत जा. मला जरा स्वस्थ पडायचं आहे."
"मग पड ना! आम्ही काय नको म्हणतोय ?"
"मला एकांत हवाय."
"मग आम्ही बोलणार नाही. स्वस्थ बसून राहू."
"तरीही नको. तुम्ही जा इथून." डॉक्टरांचा आवाज त्यांच्याही नकळत चांगलाच चढला.
तरीही महाराज तिथून हलेनात. आपल्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी डॉक्टरांकडे रोखून पाहत म्हणाले-
"का ? आम्ही का जाऊ ? हे घर तुझं एकट्याचं थोडंच आहे ? आमचंसुध्दा आहे."
आता मात्र डॉक्टरांचा राग अनावर झाला. ते महाराजांना अक्षरशः खोलीबाहेर ढकलीत म्हणाले, "जा, जा. जा आधी तुम्ही."
त्या जोरदार धक्क्यानं महाराजांचा तोल गेला. ते जिन्यावरुन गडगडले. ते पाहूनही डॉक्टरांनी त्यांना सावरलं नाही. उलट खोलीचं दार घट्ट लावून घेतलं. त्यांचा त्यांच्यावर ताबाच राहिला नाही. अतिसंतापानं त्यांचं डोकं भणभणून गेलं. ते बेशुद्ध होऊन खाली पडले.
असा किती वेळ गेला कोण जाणे!
पण ते जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा त्यांना जाणवलं की, आपलं डोकं कुणाच्यातरी मांडीवर आहे आणि एक मायेचा हात आपल्या केसातून फिरतो आहे. त्यांना एकदम आईची आठवण झाली. पण... पण ती कशी येईल ? मग ? मग हा हात कुणाचा ? खरोखरच कुणी आहे, की हा आपल्या भरकटलेल्या मनाचा भास आहे ?
डॉक्टरांनी मोठ्या कष्टानं डोळे उघडले. आणि... आणि त्यांनी ज्या व्यक्तीला पाहिलं तिला पाहून त्यांना विलक्षण धक्का बसला.
डॉक्टरांनी रागावून ज्यांना ढकलून दिलं होतं ते शंकरमहाराजच त्यांना मांडीवर घेऊन प्रेमानं थोपटीत होते.
डॉक्टर ताडकन् उठून बसले. त्यांनी गोंधळून विचारलं, "तुम्ही ? पण तुम्ही आत कसे आलात ? जिना कसा चढलात ?"
महाराज नुसतं हसले. म्हणाले, "आमचं राहू दे रे. तू कसा आहेस ? इतका संताप चांगला नव्हे, बेटा."
डॉक्टरांचे डोळे भरून आले. त्यांना पश्चाताप झाला. वाटलं, रागाच्या तिरीमिरीत आपण काय करून बसलो हे ! या अपंग जिवाला आपण निर्दयपणानं ढकलून दिलं. तो पडतोय हे पाहूनही त्याला सावरलं नाही. आणि तोच प्रेमळ क्षमाशील जीव आपल्याला, "तू कसा आहेस ?" म्हणत मायेनं गोंजारतो आहे.
डॉक्टरांना स्वतःचीच अतिशय लाज वाटली. छे,छे! आपण 'डॉक्टर' तर नाहीच, पण 'माणूस' म्हणवून घ्यायचीही आपली लायकी नाही. यांची क्षमा तरी आता कुठल्या तोंडानं मागावी ?
खरं तर महाराजांनी मला जोड्यानं मारायला पाहिजे होतं. त्यांचा तो अधिकारही होता. पण त्यांनी रागाचं उत्तर प्रेमानं दिलं. मी किती नतद्रष्ट, त्यांचं मन ओळखू शकलो नाही.'
अपराधीपणाच्या भावनेनं डॉक्टरांना हुंदका अनावर झाला. ते एखाद्या लहान मुलासारखे हमसून हमसून रडू लागले. महाराजांनी त्यांना जवळ घेतलं. प्रेमानं कुरवाळलं. त्यांच्या कृपासिध्द स्पर्शानं डॉक्टर अंतर्बाह्य बदलून गेले. त्यांना जाणवलं की, आईपेक्षाही ही माया अधिक अथांग आहे. निरपेक्ष आहे. हिनं आपल्याला पदरात घेतलं आहे. आपल्या सगळ्या गुणदोषांसकट आपलं म्हटलं आहे. त्याला धुऊन पुसून स्वच्छ करते आहे.
हीच आपली सदगुरुमाउली.
दौंडला 'आपैसे' भेटलेली.
आपला हात घट्ट धरणारी.
आपण त्यांचा हात धरला असता तर तो कदाचित त्यांच्या बाह्य वर्तनाकडे पाहून सुटलाही असता. पण तो त्यांनीच स्वतः धरला आहे. माझी इच्छा असो वा नसो, तो आता कधीच सुटणार नाही. आता महाराज नागेशाचे आणि नागेश महाराजांचा. यापुढे आपलं जप, तप, ध्यान, मोक्ष सारं काही हेच.
त्या भाग्यवान क्षणी डॉक्टर महाराजांचे झाले ते अखेरच्या श्वासापर्यंत.....क्रमशः ....
*_लेखन :श्रीमती मृणालिनी जोशी_*
No comments:
Post a Comment