Monday, 14 January 2019

Tale 11

 *⚪🌿⚪पुष्प = {४८},⚪🌿⚪*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची*. 
 

  डॉ. धनेश्वर हे शंकरमहाराजांचे अंतरंग शिष्य.
  नगरचे राहणारे. यांचा जन्म पारनेरचा. तान्हेपणी एका मोठ्या नागराजाने आपला फणा उभारून त्यांच्यावर सावली धरली होती. त्यांनी त्याला दंश न करता ह्यांचं रक्षण केलं, त्याच्या कृपेनं आपलं बाळ सुखरूप राहिलं म्हणून त्यांच्या आजोबांनी त्याचं नाव नागनाथ - नागेश - असं ठेवलं. ते आपल्या मुलाला नेहमी म्हणत, "रामचंद्रा, हा तुझा मुलगा कृपासिध्द आहे. कुंडलिनीयोग साधण्याऱ्या कुणा नाथसंप्रदायी योग्याचा वरदहस्त याच्या मस्तकावर आहे."
  नागेश डॉक्टर झाला. 'एम.बी.बी.एस.' झाल्यावर त्याला एम.डी. व्हायची संधी आली होती, पण त्यानं ती घेतली नाही. आपल्या गावात, नगरलाच स्वतंत्र दवखाना काढायचा असं त्यानं ठरवलं होतं. पण पैशाच्या दृष्टीनं ते लगेच जमणारं नव्हतं. म्हणून मेडिकल आँफिसरची नोकरी पत्करली. 
  एकदा त्यांना सरकारी कामासाठी बारामतीला जायचं होतं. ते नगरहून रेल्वेने निघाले. गाडी दौंड स्टेशनवर येऊन थांबली. प्रवासी उतरत होते. जढत होते. डॉक्टरांच्या डब्यातही काही माणसं चढली. एक माणूस मात्र डब्यात न चढता डब्यासमोर उभा राहिला. त्याच्याजवळ दोन हमाल होते. तो त्यांना म्हणाला, "तो समोर बसलाय ना गोरा पोरगा, त्याला खाली उतरवा."
  हमाल आत चढले. डॉक्टारांजवळ आले. तेव्हा तो माणूस पुन्हा म्हणाला, "तोच. तोच. उतरवा त्याला.
  "मला ?" डॉक्टरांनी आश्चर्यानं विचारलं. त्यांना कळेनाच की, 'हा असा वेडाविद्रा दिसणारा माणूस कोण, आणि हा आपल्याला गाडीतून खाली का उतरवतो आहे ?'
  "हो. तुलाच."
  "अहो पण का ? आणि मला उतरविणारे तुम्ही कोण ?"
  त्या विक्षिप्त माणसाणं आपले मोठे मोठे डोळे डॉक्टरांच्यावर रोखले. बोलला मात्र काहीच नाही.
  तोपर्यंत हमाल डॉक्टरांचं सामान उचलू लागले होते. डॉक्टारांची सहनशक्ती संपली. ते ताडकन खाली उतरले. त्यांनी स्टेशनमास्तरांकडे तक्रार केली. मास्तरांची आणि डॉक्टारांची चांगली ओळख होती. ते स्वतः त्यांच्याबरोबर डब्याजवळ आले, पण त्या माणसाला पाहताच त्यांचा प्रतिकार करायचा आवेश एकदम थंडावला. ते डॉक्टारांचीच समजूत घालीत म्हणाले, "उतरा ना, डॉक्टर. दुसऱ्या गाडीनं जा पुढे ?"
  "अहो पण का ? मी तिकीट काढलंय. माझा हक्क आहे गाडीत बसण्याचा !"
  डॉक्टारही जिद्दी. ते रेल्वेच्या फौजदाराकडे तक्रार घेऊन गेले, पण फौजदारानंही त्या माणसाला पाहून नांगी टाकली. तो डॉक्टारांनाच "थोडं समजुतीनं घ्या ना, साहेब." असं म्हणू लागला.
  आता मात्र हद्द झाली. धनेश्वर अतिशय संतापले. त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्याला आणलं. पण तोही तसाच निघाला. डॉक्टार आता हट्टालाच पेटले. डब्यात बसून म्हणाले, "मी नाहीच उतरणार. बघू माझ्या मर्जीविरुद्ध मला कोण उठवतो तो !"
  या सर्व प्रकारामुळे डब्यासमोर खूप गर्दी जमली. हा काय गोंधळ आहे, कसलं भांडण आहे, स्टेशनमास्तर, फौजदार कशाला आले आहेत हे पाहायला त्या गर्दीतूनच एक मध्यम वयाचे गृहस्थ डब्याजवळ आले. आत बसलेल्या डॉक्टरांना पाहताच ते नवलानं म्हणाले, "नागेश ! तू ? अरे हे चाललंय तरी काय ?"
  डॉक्टारांनी बघितलं तो समोर त्यांचा मामा - श्री. मिरीकर उभे !'
  त्या दाढीवाल्या माणसानंही मामांना पाहिलं. तो त्यांना म्हणाला, "हा माझं ऐकत नाही."
  "हो... हो... नाही ऐकत ! मी या आगाऊ माणसाचं का ऐकावं ?"
  "तू नकोच ऐकूस त्यांचं ! पण माझं तर ऐकशील ? आपल्या मामाच्या घरी तरी येशील ? इतक्या जवळ आला आहेस तर आपल्या मामीला भेटल्यावाचून जाऊ नकोस. तिच्या हातचे चार घास खा. थोडा आराम कर. आणि मग पुढच्या गाडीनं जा बारामतीला."
  वडीलधाऱ्या प्रेमळ मामांचा शब्द डॉक्टरांना मोडवेना. ते खाली उतरले. 
  उतरता उतरता त्या विचित्र माणसानं डॉक्टरांचा हात घट्ट पकडला आणि तो मिरीकरांकडे पाहून किंचित हसला.
  डॉक्टारांनी आश्चर्यानं मामांना विचारलं, "तुम्ही ओळखता मामा, यांना ?"
  "होय. हे शंकरमहाराज."
  "तरीच, तरीच सगळे जण यांच्यापुढे गप्प बसले. पण-पण हे माझ्यामागे का लागलेत ?"
  आता या 'महाराज' म्हणवणाऱ्या 'अवतारा'कडे डॉक्टरांनी निरखून पाहिलं. चिंचोळा चेहरा, मोठे डोळे, डोक्यावरचे दाट केस अस्ताव्यस्त, दाढीमिशा वाढलेल्या, हात जरा जास्तच लांब, पायही वेडेवाकडे, पायघोळ धोतर, अंगात फुलशर्ट, त्यावर एक ढगळा कोट. आणि मुद्रेवरचा भाव ? तोही 'ज्ञानियाचा' नव्हे, तर वेड्याबावळ्यासारखाच दिसत होता.
  एकूण प्रथमदर्शनी तरी डॉक्टारांचा त्यांच्याविषयी फारसा चांगला ग्रह झाला नाही.
  याच वेळी महाराज डॉक्टरांकडे बघून हसले. आणि डॉक्टरांना वाटलं की हे हास्य आपल्या ओळखीचं आहे. हे आपण याआधी कुठं बरं पाहिलंय ? 
  घरी आल्यावर महाराज म्हणाले, "बरं का मिरीकर, आम्ही तुमच्या भाच्याला ओळखतो बरं, फार पूर्वीपासून."
  डॉक्टार म्हणाले, "पण... पण मला तर आठवत नाही."
  महाराज खळखळून हसत बोलले, "रामकाठी, रामकाठी तरी आठवतेय का ? की तिलाही विसरलास ?"
  'रामकाठी' शब्दानं डॉक्टरांना सगळं कसं लखकन आठवलं. अगदी काल घडल्यासारखं !
  शाळेत असताना डॉक्टर आणि त्यांचा 'रंगारी' नावाचा एक मित्र संध्याकाळी सावेडी रस्त्याच्या बाजूला फिरायला जात असत. त्या रस्त्यावरून थोडं आतल्या बाजूला गेलं की तिथे एक ओढा होता. त्याच्या काठावर एक औदुंबर होता. त्या वृक्षाच्या पारावर दोघंजण बसत. हरिपाठ म्हणत. कधी विष्णूसहस्त्रनामाचा पाठ करीत. असा त्यांचा क्रम बरेच दिवस चालला होता.
  एक दिवस विष्णूसहस्त्रनाम म्हणत असताना औदुंबरातून एक अत्यंत तेजस्वी दिसणारा फकीर प्रकट झाला. दोघं मुलं चकित होऊन विस्फारल्या डोळ्यांनी त्या भव्य पुरूषाकडे पाहतच राहिली. त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. त्यांची अशी दिङमूढ अवस्था पाहून फकीरानं किंचित स्मित केलं. त्यांच्या जवळ येऊन त्यानं विचारलं, "काय रे, मारूती पाहायचा आहे का ?"
  मुलांनी मानेनंच होकार दिला.
  तेव्हा फकीरानं वर पाहत मोठ्यानं म्हटलं, "या, या. महाराज ! या."आणि नवल घडलं. एक भला मोठा वानर भुभु:कार करीत झाडावरून खाली आला.
  "अरे, असे बघताय काय नुसतं आ वासून ? नमस्कार करा याला."
  दोघांनी त्याला साष्टांग नमस्कार घातला. तो स्वीकारल्यासालखा त्यानं मान हलवली आणि क्षणार्धात तो जसा आला तसा दिसेनासा झाला.
  या अदभूत दर्शनानं मुलं चक्रावून गेली. त्यांना रात्रभर झोप आली नाही की दुसऱ्या दिवशी शाळेत त्यांचं लक्ष लागलं नाही. संध्याकाळ केव्हा होते आणि आपण ओढ्यावर केव्हा जातो असं त्यांना झालं. 
  वाटेत मित्रानं विचारलं, "नागेश, आजसुध्दा फकीरबाबा येईल का रे?"
  "नागेशच्या मनातही तीच शंका होती, पण त्यांची ही शंका दूर करून फकीरबाबा त्या संध्याकाळीच नव्हे, तर रोज त्यांना भेटू लागला. त्यांच्याशी त्यांची अगदी गट्टी जमली. तो त्यांना गोष्टी सांगू लागला. काही विद्या शिकवू लागला. त्यानं डॉक्टरांना एक सिद्धिही शिकवली. त्यांनी ती हस्तगत केली तेव्हा त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत फकीरानं विचारलं होतं, "हिचं नाव माहीत आहे ? अरे, हिला म्हणतात रामकाठी !"
  असा दीड-दोन महिने फकीर येत राहिला. आणि नंतर या मुलांनी कितीही शोधलं तरी तो भेटलाच नाही! ... क्रमशः ...

 *_लेखन श्रीमती मृणालिनी जोशी_*

No comments:

Post a Comment