*⚪
⚪पुष्प = {४९},⚪
⚪*
*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची..*.
म्हणून महाराजांनी उच्चारलेला 'रामकाठी' हा शब्द जणू परवलीचा शब्द ठरला. एका क्षणात तो ओढा, तो औदुंबर, तो मारूती आणि फकीरबाबांनी दिलेली 'रामकाठी' सगळं सगळं डॉक्टरांना आठवलं. ओळख पटली. पण त्यांच्या मनातला संभ्रम अधिकच वाढला. कारण कुठे तो सुदृढ, भव्य देहाचा तेजस्वी फकीर आणि कुठे हे समोर बसलेले तारवटलेल्या डोळ्यांचे नि अष्टावक्र शरीराचे शंकरमहाराज ! त्या रूबाबदार फकीरानं असं हे बेढब रूप का बरं घ्यावं ?
असा विचार करीतच डॉक्टरांनी महाराजांना नमस्कार करून म्हटलं, "सगळं आठवतंय. पण महाराज, तुम्ही असे कसे ?"
महाराज नुसते हसले. त्यांनी मोठ्या प्रेमानं डॉक्टरांना आपल्याजवळ बसवून घेतलं.
हे सगळं पाहत असणाऱ्या डॉक्टरांच्या मामांना अतिशय समाधान वाटलं. "नागेशवर कुणा सिद्धाचा वरदहस्त आहे' हे त्याच्या आजोबांचे शब्द खरे झालेले त्यांना दिसत होते. नागेशच्या लौकिक अर्थानं होत असलेल्या विद्यार्जनाहून वेगळ्या असलेल्या परमविद्येच्या अभ्यासाची सिद्धता ती परमशक्ती त्याच्याकडून, त्याच्याही नकळत करून घेत आहे, त्याच्या जीवनात एक अलौकिक अपार्थिव प्रवाह गुप्तपणानं वाहत आहे हे त्यांना आज स्पष्टपणानं जाणवलं.
महाराजांनी डॉक्टरांना विचारलं, "तू डॉक्टर झालास ना ? मग आपल्या शरीराचं काम कसं चालतं हे कळलं असेलच तुला. देहातल्या रासायनिक प्रक्रिया, त्यातली प्राणशक्ती - तिचा प्रभाव, गुणपरिणाम -"
"इतकं खोलवर नाही शिकवीत. स्थूल मनानं कळलंय मला." डॉक्टारांनी मधेच सांगितलं.
"अरे बाबा, आडात नाही तर पोहोऱ्यात कुठून येईल ? त्या बड्या बड्या डॉक्टरांना तरी कुठे माहीत असतात अंतर्गत सूक्ष्म क्रिया ? थांब, आम्ही दाखवतो. बघ. आमच्या देहाकडे नीट लक्ष देऊन बघ."
असं म्हणून महाराजांनी डॉक्टरांच्या दोन भिवयांमध्ये आज्ञाचक्रावर आपल्या अंगठ्यानं दाब दिला. आणि काय आश्चर्य! महाराजांच्या देहातल्या सर्व सूक्ष्म केंद्रांचं काम कसं चालतं हे त्यांना स्पष्ट दिसू लागलं. क्ष किरणांनी दिसावं तसं. ते अवाक होऊन सारं निरखीत राहिले. देहान्तर्गत चालणाऱ्या विश्वनियंत्याच्या अनाकलनीय अगाध कौशल्याचं, सामर्थ्याचं, सृजनतेचं दर्शन घेऊ लागले.
या अनपेक्षित आणि अलौकिक अनुभवानं डॉक्टर जणू एका वेगळ्याच विश्वात गेले.
त्यांना तिथून परत आणण्यासाठी महाराजांनी त्यांना पुन्हा स्पर्श केला.
"अं ? विलक्षण! विलक्षण!" असं म्हणत डॉक्टर डोळे मिटून बराच वेळ स्वस्थ बसले.
जेवणं झाल्यावर दुपारी पुन्हा काँलेजचा विषय निघाला. तेव्हा महाराज म्हणाले, "मिरीकर, तुमच्या नागेशनं एकदा त्यांच्या काँलेजातल्या साहेबाला हरवलं होतं. होय ना रे ?"
"पण, पण ते तुम्हांला कसं कळलं?" डॉक्टरांनी नवलानं विचारलं. पण त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून महाराज म्हणाले, "आपल्या मामामामींना सांग तरी तुझा पराक्रम ! त्याचं तोंड कसं बंद केलंस ते सांग ना."
मामांनीही आग्रह धरला. तेव्हा डॉक्टर सांगू लागले, "वर्गात शरीरशास्त्र शिकवताना आमचे प्राध्यापक डॉ. नोव्हिस म्हणाले, 'भारतीय लोक योगानं शरीरावर ताबा मिळवता येतो असं म्हणतात. पण ते खोटं आहे. सर्वथा अशक्य आहे.' त्याचं हे विधान ऐकून मी ताडकन् उभाच राहिलो, म्हटलं, 'सर, हे अशक्य नाही. खोटं नाही. तर अक्षरशः सत्य आहे.'
त्यांनी विचारलं, 'तुम्ही हे इतकं ठासून कशावरून सांगता ?'
'अनुभवावरून.'
'म्हणजे धनेश्वर, तुम्ही स्वतः योगाचा अभ्यास करता ?'
'होय. थोडासा अभ्यास केला आहे मी योगशास्त्राचा. सर, मी त्याची सत्यता सिद्ध करू शकतो.'
त्यावर डॉ. नोव्हिस आणि वर्गातली सर्व मुलं माझ्याकडे आश्चर्यानं पाहू लागली.
मी सरांजवळ जाऊन म्हटलं, 'आपण माझी नाडी पहावी. ठोके मोजावेत.'
'ओ. के.' असं म्हणत त्यांनी माझ्या मनगटावर आपली बोटं ठेवली. क्षणभरात त्यांचा चेहरा गोंधळल्यासारखा झाला. त्यांनी बोटं उचलली, पुन्हा नाडीवर दाबली. मग आश्चर्यानं उदगारले - 'अरे, हे काय ? अरे तुझी नाडी कशी लागत नाही ?'
पुरी पांच मिनिटं त्यांनी खटपट केली. पण नाडीचा एकही ठोका त्यांना पकडता आला नाही. कारण तो पडतच नव्हता.
'हंऽ आता पहा.' असं मी म्हटलं आणि नाड्या चालू केल्या. त्यांच्या हाताला नाडी लागताच त्यांनी विचारलं, 'हे तुम्ही कसं केलंत, धनेश्वर ?'
मी म्हटलं, 'कसं केलं ते सांगून कळण्यासारखं नाही सर. पण मी काय केलं ते सांगतो. योगाच्या अभ्यासानं साधलेल्या 'संयमा' मुळे माझ्या इच्छाशक्तीने मी माझी रूधिराभिसरणाची क्रिया थोडावेळ थांबवली.'
'पण ती तर अखंड चालू असते ! ती इन्व्हाँलंटरी क्रिया आहे !'
'तरीही तिच्यावर ताबा मिळवता येतो. हीच तर आमच्या योगाची किमया आहे, सर.'
डॉ. नोव्हिससाहेब चक्रावून गेले, म्हणाले, 'माझे शब्द मी मागे घेतो. आम्हा पाश्चात्त्यांना योगविद्या अज्ञात आहे. पण ती आहे, अतर्क्य असली तरी भारतीयांजवळ ती आहे एवढं मात्र आज मला धनेश्वरानं कबूल करायला लागलं आहे.'
ही सगळी घटना सांगून डॉक्टर म्हणाले, "महाराज, योगातला हा प्रयोग मला थोडाफार जमला. पण मला अजून पुष्कळ शिकायचं आहे. त्यातलं मर्म जाणून घ्यायचं आहे."
"तेही कळेल बेटा, तुला." महाराज म्हणाले.
"ते कळेल तेव्हा कळेल. पण आत्ता मला एक सांगा महाराज की, हे सगळं घडलं मुंबईला. ग्रँट मेडिकल कॉलेजात. तुम्हाला हे कसं कळलं ?"
महाराज मनापासून हसले. म्हणाले, "ती आमची गुह्य अशी अंतर्विद्या आहे. तीही सांगून कळण्यासारखी नाही. साधनेनं ती अनुभवावी लागते. सिध्दयोगी भेटला की तो सांगेल तुला तिची साधना."
"पण तसा भेटला पाहिजे ना! अलीकडे बरेचसे लोक आपण सिद्ध आहोत असं दाखवतात, पण आतून अगदी क्षुद्र असतात. बुवाबाजी करून भोळ्याभाबड्या लोकांना नागवतात. खरं-खोटं ओळखणं मोठं कठीण झालंय. अडाणी, अशिक्षीतच नाही, तर सुशिक्षितसुध्दा त्यांच्या जाळ्यात सापडतात. माझे वडील एवढे मोठे वकील आहेत, पण तरीही आताशा कुण्या एका महाराजांच्या कच्छपी लागले आहेत. मला हे कळलं तेव्हा मी त्यांना लगेच पत्र पाठवलं. त्यांना सावध केलंय."
"असं ? बरं केलंस बाबा. काही महाराज वकील आणि डॉक्टर यांनासुध्दा बनवायला कमी करीत नाहीत." महाराज गंभीरपणानं म्हणाले.....क्रमशः ...
*_लेखन श्रीमती मृणालिनी जोशी_*
No comments:
Post a Comment