*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*
रावसाहेब कथा सांगत होते अष्टावक्रचीच, पण त्यांना आठवण येत होती शंकरमहाराजांची. नगरला सरदार मिरीकरांच्या वाड्यात भेटलेले. वेड्यावाकड्या शरीराचे. वेडसर वाटणारे. स्वतःशीच हसणारे.
रावसाहेबांनी त्यांना नमस्कार केला तेव्हा ते खदखदा हसले होते. त्यांच्या पाठीवर जोरदार थाप मारून म्हणाले होते, "ये राजा, ये. नवनाथग्रंथातला भर्तृहरी तू. तुझी पिंगला मेली. तुला उदध्वस्त करून गेली, पण धीर धर. माउलीच्या ज्ञानेश्वरीनं तुझं आयुष्य उजळणार आहे. तुझी वास्तू ज्ञानदेवीच्या रसानं भरून जाणार आहे. अनेकांना आनंद देणार आहे."
महाराजांच्या प्रेमळ स्पर्शानं आणि आश्वासक शब्दांनी रावसाहेबांना गहिवरून आलं. वाटलं, 'आपलं मन जाणणारं, आपल्याला आपुलकीनं जवळ घेणारं, आशेचा किरण दाखवून धीर देणारं हे कुणीतरी आपलं जवळचं माणूस आहे.
रावसाहेब या आठवणीत हरवलेले असतानाच त्यांचा नोकर आत येऊन म्हणाला, "साहेब, सहस्त्रबुध्द्यांकडून निरोप आला आहे."
"भाऊसाहेबांकडून ? काय म्हणताहेत ?"
"आपल्या प्रधानसाहेबांच्या घरी कुणी शंकरमहाराज आले आहेत. तिकडे त्यांच्या दर्शनाला यावं."
रावसाहेब आनंदानं मोहरून गेले. 'स्मरणात् दर्शनम्। अलभ्य लाभ!!' असं पुटपुटत ते बाहेर जाण्याची तयारी करू लागले. ताईसाहेबांना म्हणाले, "शंकरमहाराज आले आहेत. तुम्हीहि येता का दर्शनाला ? अवलिया आहेत. सिध्द पुरुष आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्हाला मघाशी कथा सांगितली ना त्या अष्टावक्रासारखे आहेत."
एरवी तर असल्या स्वामी-महाराज, असं संबोधून घेणाऱ्या लोकांची ताईसाहेबांना मुळीच ओढ नव्हती, पण अष्टावक्राचं त्यांच्याशी साम्य आहे हे ऐकल्यावर त्यासुध्दा रावसाहेबांच्या बरोबर निघाल्या.
श्री प्रधानांच्या दिवाणखान्यात महाराज बसले होते. दाढीमिशा वाढलेल्या, केस पिंजारलेले, पाय वेडेवाकडे, हातात सिगरेट - आणि ते हात किती लांब - अगदीच बेंगरूळ !
त्यांना पाहून ताईसाहेबांना वाटलं, 'हे कसले सिध्द पुरुष ? यांचं काय दर्शन घ्यायचं ? आपण उगीचच आलो इथे !'
रावसाहेब मात्र अतिशय आनंदात होते. त्यांनी महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं तेव्हा त्यांना थोपटीत महाराज म्हणाले, "ये राजा. राऊ, पण आमची बेबी कुठे आहे ? आमची मीराबाई - जनाबाई -"
"बेबी ? कोण बेबी, महाराज ?" रावसाहेबांनी गोंधळून विचारलं. महाराज मंदसे हसले. बोलले काहीच नाहीत.
नूरींनी नमस्कार केला. मग त्यांनी ताईसाहेबांना पुढे यायची खूण केली. त्या अनिच्छेनेच पुढे गेल्या. त्याबरोबर प्रसन्नपणानं हसत महाराज म्हणाले, "ये बेबी, ये. आम्ही तुझीच वाट पाहत होतो."
ताईसाहेब नवलानं स्वतःशीच म्हणाल्या, 'बालपणी आपली आई आपल्याला लाडानं 'बेबी' म्हणायची. पण, पण माझं हे लाडकं नाव यांना कसं कळलं ?'
महाराजांनी आपल्या मोठमोठ्या डोळ्यांनी ताईसाहेबांकडे निरखून पाहिलं. दृष्टीला दृष्टी भिडवली. ते त्यांच्या हृदयाचा वेध घेत होते. जणू त्यांना आत्मसात करीत होते. आणि राजघराण्यातल्या मर्यादेनुसार सहसा दुसऱ्याच्या डोळ्याला डोळा न भिडवणाऱ्या ताईसाहेब मंत्रमुग्ध होऊन त्यांच्याकडे एकटक पाहत राहिल्या होत्या. जागच्याजागी खिळून राहिल्या होत्या.
महाराजांची मुद्राही गंभीर होती. त्यांच्या डोळ्यांतून करूणा ओसंडत होती. त्यांनी हलकेच आपल्या अनामिकेनं ताईसाहेबांच्या कंठाला स्पर्श केला. त्या दैवी स्पर्शानं ताईसाहेबांची तनुलता शहारली. मोहरली. त्यांना वाटलं, 'आपण आनंदाच्या डोहात डुंबतो आहोत. बुडतो आहोत. विरघळतो आहोत. आपल्या संपूर्ण अस्तित्वाचा लय होतो आहे. आपण उरलोच नाही.'
त्यांचे डोळे मिटले गेले. महाराजही समाधिस्थ होऊन बसले होते. वातावरण एका अनामिक सुगंधानं दरवळलं होतं. मंगलमय शांततेत वास्तू भारून गेली होती.
तिथे उपस्थित असलेले सर्वजण हा क्वचितच कुणाच्या भाग्यानं घडणारा शक्तिसंक्रमणाचा आनंदसोहळा धडधडत्या मनानं अनुभवीत होते.
जरा वेळानं ताईसाहेब भानावर आल्या. त्यांनी डोळे उघडले. समोर महाराज होते. त्यांच्याकडे पाहताच ताईसाहेबांच्या अंतर्मनानं निर्वाळा दिला की, देवळात भेटलेले दिव्य पुरूष हेच आहेत. रूप पालटलंय एवढंच ! ताईसाहेबांचे डोळे आनंदानं झरझर वाहू लागले. त्यांनी महाराजांच्या चरणावर माथा टेकला.
महाराजांनी आपल्या बेंगरूळ हातानं त्यांना थोपटल्यासारखं केलं. पण या वेळी ताईसाहेबांना तो हात अमृताचा वर्षाव करणाऱ्या संजीवक वेलीसारखा वाटला. त्या उठल्या तेव्हा महाराज आपल्या शेजारी बसलेल्या रावसाहेबांच्या मांडीवर थाप मारून उदगारले, "आम्ही बेबीला खाल्ली. पार गिळून टाकली. गिळून टाकली !"....... क्रमशः ...
*_लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी_*
No comments:
Post a Comment